Saturday, December 31, 2011

३१ डिसेंबर २०११


असाच अजून एक दिवस उगवेल ...  अगदी असाच मावळेल पण... 
कालसुद्धा असाच उगवला होता ... अन उद्या सुद्धा त्यात काही फरक होईल असे नाही... 
अनादी काळापासून हे असेच होत राहिलेय .. अन जगाच्या सो कॉल्ड अन्तापर्यंत हे असेच राहील... 

मग अट्टाहास कसला हा...सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस.. अन नववर्षाचे स्वागत... 
कित्येक पोस्टस, कित्येक शुभेच्छा, कित्येक SMS या जगाभवती फेऱ्या मारत असतील,
वर्तमानपत्राचे रकाने, अन शुभेच्छापत्रांची दुकाने ओसंडून वाहत असतील ... 
अन कहर म्हणजे बेगड्या मुखवट्यांचे हुकमी हसू घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या कानाला हे शब्द या दिवसभरात स्पर्श करून गेले असतील ... 

मग का अजून एक पोस्ट...  म्हणून सकाळ पासून केलेला कंटाळा... दर वर्षीचे रुटीन म्हणून डायरीवर एक नजर फेकून बंद केलेले शेवटचे पान... 
अन झरकन मनावर एक ओरखडा... रिकाम्या पानाचा... शेवटचे पान... शेवटचा दिवस.. २०११ चा...
शेवटाचा...  समारोपाचा.. गतवर्षाच्या जमाखर्चाचा.. दिवस-रात्रीच्या पलीकडे आयुष्याचा एक कालखंड जो उलटला.. त्याच्या ताळेबंदाचा .. 

अन जेव्हा या विचारासरशी पुन्हा एकदा डायरीची पाने उलटली... त्या क्षणी जाणीव झाली की कृतज्ञता मानावी इतक्या छान गोष्टी या वर्षात पदरी पडल्यात... वर्षाच्या सुरुवातीलाच अनुभवलेले... एक माणूस म्हणून विविध शक्यतांची दारे उघडणारे सेशन ... अन त्याच शक्यतांचा पाठलाग करताना.. स्वता:चा शोध घेत आत आत जाताना... पुन्हा गवसलेले वेडे वेडे व्यसन.. शब्दांनी खेळण्याचे व्यसन... भावनांना जोजावून लाडावून गेयरूप देण्याचे व्यसन ... 

कॉलेजमध्ये असताना ... नंतरच्या काळात नोकरीच्या अधे मध्ये कधी.. कधी आनंदून कधी हिरमुसून...  कधी अंधुक आशेत कधी काळोख्या निराशेत लिहिलेल्या नोंदी जुन्या डायरीमध्ये पाहून, वाचून परत डायरी मिटून ठेवायचे.. अशी किती वर्षे दरम्यान उलटली... बाहेरचा संवाद वाढत गेलेला कामानिमित्त, दैनंदिन जगण्याच्या आमिशात पण आतला संवाद कुठेतरी मनाच्या तळाशी गप्पसा उदास एकटा... 

कित्येक वर्षाने त्या डायरीला एका नवीन रुपात नवीन साजानिशी परत एक गळामिठी दिली ती याच वर्षात.. 
चारोळ्या... कविता.. मुक्तक अश्या विविध रुपात मनातल्या भावना मांडताना आंतरजालावर एक अस्तित्व.. स्वर्णिम सखीचे.. अन या प्रयत्नांना एक आत्मीय सोबत ... तुम्हा सर्वांची ... कौतुक करणारी, कान ओढणारी.. हवीहवीशी वाटणारी.. 

असे हे उमलते सुगंधी स्वत्व सापडणे हे या वर्षाचे किती सुंदर ऋण... या ऋणातून उतराई व्हायचेच नाहीये... पण जाताजाता सरत्या वर्षाला कृतज्ञतेचे एक अर्ध्य नक्कीच... 

उद्या पुन्हा तीच पहाट होईल... तीच सकाळ अन तशीच संध्याकाळ पण होईल... पण या क्षणी थांबून एक धन्यवाद तुम्हासाठी... या आशेसह की येणारे नवे वर्ष सर्वांसाठी उन्नतीचे सौदार्हाचे अन आनंदाचे जावो !!!! 

भक्ती आजगावकर 
Thursday, December 22, 2011

सहेला रे...


ओ SSSS.... सहेला रे... 

मूर्तीवर पळी पळी अभिषेक करणारा हात जरासा थांबला... त्या लाल आवरणात गच्च लपेटलेल्या मनाला एकवार साद घातल्यासारखा तो आवाज.. "सहेला रे".... झटक्यात जाणीव की अजून आत काहीतरी जिवंत आहे... एका क्षणाचीच ... एका क्षणात कंपन पाऊन परत स्थिर होणाऱ्या तंबोऱ्याच्या तारेगत मन परत दगड... पुन्हा अभिषेकाची धार मूर्तीवर त्याच गतीत सुरु झाली... परत तेच नि:शब्द आवर्तन... पुन्हा तोच अडकलेला श्वास ... पुन्हा तेच अंधारे भवताल ... 
आताश्या हे असे का होतेय.. एका शिळेगत जगणे अंगवळणी पडल्यावर पुन्हा ही जाणीव... जिवंत असल्याची पुन्हा एक आठवण ... का.. कशासाठी... ??
" आ... मिल गाये ... सहेला रे......sss " 


"सप्त सुरन की बेल सजाये ...... "
परकरी वयात नवरोबा म्हणून चिडवून घेताना अस्सा राग आलेला सगळ्यांचाच... कसे नाक उडवत चिडवतात सगळे... अन हा पण का असा मागे मागे करतो.. पण, पंडितराव गुरुजींकडे सा गिरवताना, तिरपा डोळा करून भुवई उंचावून पाहिल्या क्षणी ओंजळभर चिंचेचे आकडे दाखवलेस न, त्या क्षणी कुठे तरी रुजवात होती का या नात्याची ... खेळताना, भांडताना बाजू घेताना .. उघडलेल्या तळव्यावर केवड्याची सुरेख पात ठेवताना .. आरशात बघून कुंकू लावताना उमटलेल्या प्रतिमेतून हसू सांडताना ..


" आ ssss आ ... मिल गाये... जनम जनम का संग ना भूले... "


लाल आलवण मानेभवती घट्ट लपेटून घेत पाऊले आपसूक घाटावरच्या मंदिराकडे वळली...एकेक चिरा ढासळत असलेल्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यात उदास एकच दिवा जळत होता... तो ही अधुरा, भवातालचा अंधार विझवायला... वाऱ्याच्या झोताबरोबर झगडण्याची त्याची अपुरी धडपड... अन या कशाचाच मनावर न उमटणारा ओरखडा.. 


"सहेला रे ssss .. सहेला रे..." 

मोरपीस फिरवल्यागत एक शहारा अंगभर उमटून गेलेला.... आंब्याच्या आडव्या फांदीवर बांधलेल्या झोक्यावर झोके घेताना... सुरात सूर मिसळून गाताना... पहिल्यांदा हातावर ठेवलेला हात लाजून काढून घेताना... किती क्षण ... किती ताना ... किती झोके.. तुझे माझे.. 
गाणे शिकण्यासाठी तुझा इंदूरला जायचा निर्णय... अन वेड्यागत वाडाभर भिरभिरून शेवटी माजघराच्या उंबरठ्यावर अडखळलेले पाऊल... किती आणिक काय बोलू असे झाले असताना तुझे दिलाश्याचे शब्द... "तुझ्यासाठी आहेच मी ..नेहमीच असेन. येईन न परतून लगेच...!!" आभाळभर भरारी घेणाऱ्या गाण्याला गवसणी घालायचे तुझे स्वप्न अन माजघरातून पडवीत, अंगणातल्या मोहरलेल्या तुळशीपासून मागल्या दारच्या बहरणाऱ्या शेवग्यापर्यंत माझे जगणे तुझ्या शब्दाभवती पिंगा घालणारे.. हिरव्या काकणातून अन गर्भरेशमी लुगड्यावरून हळुवार हात फिरवताना लाजून चूर झालेले... 

" जनम जनम का संग ना भूले... अब के मिले तो बिछुर न जाये... "

पुन्हा पुन्हा ही रात्र येते.... दिवसच्या दिवस अख्खा एका आवर्तनासारखा संपतो... तारीख बदलते.. ऋतू बदलतात... अवचित पुन्हा जुन्या आठवणीचे दोन चार शिंतोडे तेवढे मनावर पडून जातात... पण ही रात्र... डोळे रोखून पाहत असल्यासारखी... सावज हेरून दबा धरून बसल्यासारखी.. दर दिवसाच्या शेवटी पुन्हा एकदा कोंडीत पकडणारी... अंतहीन ...कोरडीठाक .. माहेरी असताना आजीच्या मऊ लुगड्याची शिवलेली गोधडी पांघरली की साऱ्या आयुष्यावर एक सुरक्षित माया जाणवे... आजकाल सारे आयुष्यच उघड्यावर पडलेय का..?? अन त्याचेही काही सोयरसुतक वाटू नये हे का... ??? 

श्वासाची एक अखंड माळ कळतनकळत चालू राहावी अशी... एखादी उचकी.. एखादी कळ.. एखादीच वेदना..जगण्याशी बांधून ठेवणारी एक तरी खूण.. रंगाच्या गंधांच्या या पसाऱ्यात इतके अलिप्त रंगगंधहीन होऊन जावे जगणे... सुरांच्या अविनाशी सागरातून तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी एकही धून हाती लागू नये ... ???

"सहेला रे ..." माळेचे मणी ओढत रात्र संपलीय ... पुन्हा एक आवर्तन सुरु... पुन्हा एका चौकटीचा प्रवास सुरु ... दुसऱ्या रात्री पर्यंतचा!!! 

"आ मिल जाये... सहेला रे... "

दीपदानाचा दिवस आठवतोय का ??... घाटावरच्या देवळात साऱ्या गाभाऱ्यात, मंडपात अन घाटावरही.. जिथे तिथे पणत्यांच्या चिमुकल्या वाती अंधारावर राज्य गाजवताना... देवळाच्या आवारातल्या दीपमाळा तेजाळत आकाशाकडे उन्नत पाहताना...अन घाटावर पायऱ्यावर बसून लाटांवर दिवे सोडून देताना...
सोबत होतास न तू... आहेस... अजून आहेस... 
आश्वासक सोबत... 

या लाटा अजून हेलकावताहेत.. त्या पणत्या वाहत दूर किनाऱ्याला लागल्यात का... तुझ्या किनाऱ्याला?? 
थंडगार पाण्याचा स्पर्श पावलाला... आत्म्याला त्या परमात्म्याचा स्पर्श असाच होत असावा का ?? 
"सहेला रे ... अब के मिले तो बिछुर न जाये... !!! "


ही रात्र संपलीय आता ... सहेला रे...सहेला रे... !!! 


- भक्ती आजगावकर 


छायाचित्र आंतरजालाहून साभार!! 

प्रेरणा : गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची "सहेला रे" ही अप्रतिम कलाकृती 
इथे ऐका...

Monday, November 7, 2011

कवडसेहे असेच व्हायचे होते का ... 

आपल्याच नकळत श्वासासोबत आपण ही जगत जातो सामोरा आलेला क्षण.. आजूबाजूच्या घटनांना कवेत घेऊन.... धावत कधी .. कधी धडपडत... अन या धडपडीत कधी तरी गवसलेला तू... 

आठवतं का तुला... भांडलोच होतो चक्क आपण..(म्हणजे मी!!).. पहिल्या भेटीत... ते पण एका रिक्षावरून.. वरून कोसळणारा पाऊस अन ऑफिसची महत्वाची मिटिंग .. त्यात एकाच रिक्षामध्ये शिरलेले आपण दोघे.. मी तर पूर्ण आवेशात तुला बाहेर काढायलाच तयार ... "पण ठिकाण एकच न तर एकत्र जाऊ" या तुझ्या बिनतोड उत्तरावर मी गपगार... खरेतर त्या भांडणात जिंकण्यापेक्षा.. त्या क्षणाची गरज म्हणून !!! 

अन त्यानंतर अवचित झालेल्या गाठीभेटी... कधी हो ना करता करता सुरु झालेले कॉफीसत्र ... कधी दिले घेतलेले मोबाईल नंबर्स ...अन फोरवर्डस वाचता वाचता कधीतरी सुरु झालेला संवाद ... अन या सर्वांत तु कधी जगण्याचा एक भाग बनत गेलास हे देखील कळले नाही ... सकाळ तुझ्या गुड मॉर्निंगने झाली नाही तर चुकल्याचुकल्या सारखे व्हावे.. अन दिवसभरात केव्हाही एक हक्काचा श्रोता म्हणून मी तुझ्या आश्रयास यावे... इतके सहज ..इतके सुभग ..सोपे सोपे से होऊन गेले होते .. 

पण हे सारे तुझ्यासाठी एका छान मैत्रीचा भाग होता .. तुझ्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा सहज आविष्कार..!!
 .. 
कधीतरी बोलता बोलता निघालेला तुझ्या लग्नाचा विषय ...अन गोठून गेलेले मी... 
म्हणजे तेव्हाही आपल्यात काय आहे न पुढे काय बदलेल याचा अंदाज नव्हताच म्हणा.. पण तुझ्याशिवाय पुढे काय याचा विचारच येईना..!!
कसलेसे अनोळखी काहूर घेऊन परतलेले मी.. 

स्वत:शीच या सारया गोष्टींचा ताळमेळ मांडायला बसले तर आठवणींचा धबधबाच कोसळला मनभर ... 
कितीतरी जुळलेल्या आवडीनिवडी सहज शेअर केल्यासारख्या... 
गप्पा, गाणी, भटकणे, खाणे.. कविता, गझला, अभंग, दोहे... सूर ताल ठेका लय .. कसले कसलेच वावडे नव्हते... 

उलट श्वासासह निरंतर सुरु असेल असे गाणे जणू जगण्याचाच भाग होते... दिवसाची सुरुवात अन शेवट सुद्धा गाण्यानेच करण्याची कल्पना तुझीच ... त्यावरून दिवसाचा मूड जोखण्याचे कसब असेच मुरत गेलेले तुझ्यात माझ्यात.. अन त्याच शब्दांच्या आश्रयाने त्या त्या दिवसाची मलमपट्टी पण ... आनंदाला आनंदाची दिवेलागण, विजयाला कौतुकाची थाप अन हळव्या दुखऱ्या क्षणाला दूरवरून का होईना पण "मी आहे"चा आधार ... 

कितीतरी अनवट कवितांचा अर्थ असा तुझ्या सोबत बोलता बोलता कळला होता.. 
कितीदा तरी गुलमोहर तुझ्या न माझ्या साक्षीने फुलला होता 
कितीतरी संध्या तुझ्या न माझ्या अश्या सोबतीने भिजल्या होत्या ... 
अन कितीतरी पाऊसरात्री स्वप्नासह रुजल्या होत्या ..

पण.. तरीही तू माझा होतास..? तुला कधीच कळले नाही का रे...? माझे शब्द कधीच बोलले नाहीत तुझ्याशी..?? नजर कधी ओझरते देखील हितगुज सांगून गेली नाही ... ? की हे सारे कवडसेच होते माझ्याच अपेक्षांचे? प्रकाशाची दिशा बदलली कि बदलून जाणारे .. 

तू तर अजून ही तसाच ... तेवढाच ओढाळ...स्नेहाळ... तेवढाच आत्मीय ...

अन मी ..? सलील् सीमेवर उभी ... !!! 


- भक्ती आजगावकर 

Thursday, October 27, 2011

दिवाळी ...


दिवाळी ...
दिपवाळी .. दीपावली ... दिव्यांच्या ओळी  ... 
      प्रकाशाचा उत्सव ..
          ज्योतींचा महोत्सव ... 

किती उजळून निघतो सारा आसमंत .. लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी .... 
साध्या मातीची पणती ..पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते पराकोटीचा अंधार ... 

अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली इक तळपती झेप ...
एक झळकती ज्योती शलाका ... एक मंद तेवणारी वात.. 
तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत ... 
चिमुकला पण आशादायी ..

हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे ही इच्छा ... 
येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा... 
अन ही दिवाळी तुम्हा साऱ्यासाठी खूप खूप खूप आनंद ... सुख समृद्धी ...अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह .... 


उजळली वात, फाकला प्रकाश 
उटण्याचा गंध भारले आकाश .. 
मांगल्य घेउनी आली ही दिवाळी 
जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी!!! 

- भक्ती आजगावकर 

Tuesday, October 18, 2011

मनस्वी ..

एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ...
आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी...
उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ...
वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ...
मनात निराश.. हतबल झालेली ???
खरेच का ??? हतबल???

तसाच "ती" चा प्रवास...
"मनस्वी ... "
नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना... कौतुकाचे तुषार झेलताना ..
शिस्तीचा अन परंपरेचा हात धरून आखून दिलेल्या मार्गावर चालताना..
नकळत कधी तरी सहेला रे च्या तानेत गुंग होताना... गिरकी मारून समेवर अल्लद परत येताना ...
सह्याद्रीच्या अवाढव्य विस्तारापुढे नतमस्तक होताना .. शिवाजी महाराजांची दमदार ललकारी ऐकून थरारून जाताना..
समुद्राच्या अगणित लाटा पावलावर लपेटताना .. क्षितिजाचे सारे रंग मनात मिसळताना ...
जिभेवर पाणीपुरीची अख्खी पुरी चाखताना...
असे जगण्याचे सगळे धागे घेऊन उभे आडवे महावस्त्र विणता विणता ... साऱ्याचा भावनांचा एक झुला करून त्यावर मनसोक्त झोके घेताना ...
हे विसरून जाते ती...
की तो झुला एक क्षण असाच आभाळात उंच उंच जाईल.... त्या झुल्याला झोका देणारा मायाळू हात अलवार निसटेल.. अन आपण आभाळात...

कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या प्रमाणे चौकट का ही???

आधाराचे सगळेच बंध सुटल्याची ... अधांतरी... कुठे पोहोचणार... कसे पोहोचणार... आधार असेल का त्या .. "त्या"च क्षणाला... कुणाचा आधार... कसा असेल... समजून उमजून घेईल का तो...  की नाकावर आपटणार आपण... एका अनोळखी नात्याची...सप्तपदीची.. अशी जीवघेणी पहिली ओळख...

पण "ती"..  मनस्वीच ती ...
या गदारोळात...  त्याच झुल्यावर अजून ही हसतेय... त्याच आभाळाला अजून खुणावतेय... स्वप्ने समोर दड्लीयेत तिची...
अन साथीला शिदोरी ...
त्या सगळ्या जगण्यावर आसुसून प्रेम करण्याची... स्वतःचे १००% प्रयत्न देण्याची ...
पडलो धडपडलो तरी परत उठून चालू पडण्याची उभारी मनाला देण्याची... नात्यांच्या बंधांवर विश्वास ठेवण्याची ...

त्याच शिदोरीवर अल्लड आयुष्याची एक पाऊलवाट अलगद उतरेल निळ्या आभाळात... तिला हव्या असलेल्या स्वच्छ आभाळात... स्वप्नांच्या रंगीबेरंगी क्षितिजावर...!!!


ताजा कलम : 
ही कहाणी सुफळ संपूर्ण का ??
नाही... अश्या कहाण्या सुरूच राहतात न... 
"ती" चा प्रवास असाच सुरु निरंतर !!! 


भक्ती आजगावकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार!!

Wednesday, October 12, 2011

कोजागिरी पौर्णिमा


"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ... लक्ष्मीची चंचल पाऊले ऐकायला जागे राहणाऱ्या आशादायी मनुजाची ...


कोजागिरी पौर्णिमा ...
पूर्ण चंद्राचे कौतुक आणि उत्सव चांदण्यांचा ...
मोत्यासारख्या लख्ख प्रकाशात न्हायलेल्या रातीचा...
कुटुंबीय, आप्त अन मित्रांसोबत हसत खेळत गप्पा मारत केलेल्या जागरणाचा ...
शुभ्र चांदण्यात चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या नैवेद्याचा ..
आणि सगळ्यांसोबत घालवलेल्या या तास दोन तासाच्या मैफिलीचा ....
सोबत सुरेल आठवणीतल्या कवितांची ... भेंड्या लाऊन म्हटलेल्या चांदण्या रात्रीच्या गाण्यांची ..
पेटी वरल्या एखाद्या सुरावटीची अन ... उत्स्फूर्त अश्या टाळ्यांची सुद्धा...

....

पण.. अशी ही पहिलीच कोजागिरी नाही का...
दूर... एकांतात... आपल्या माणसांपासून दूर वेगळ्याच शहरात ...
आपल्याच आभाळात फुलून आलेल्या या पूर्ण चंद्राचे ..शरद पौर्णिमेचे कौतुक फक्त मनातल्या मनात...
आभाळ तेच... चांदणे तेच... चंद्र ही तोच... अन पौर्णिमा ही तीच..
पण घर... आपली गच्ची... आपली माणसे... अन कोजागिरीचा सोहळा ... हे सगळेच दूर...
फोन वर शुभेच्छा देता घेताना... वरकरणी हसून एखादा smily वाक्यात पेरताना ... स्वत:ला समजावणीचा सूर स्वत:चाच...
पण अंतर्यामी कोजागिरीची साद का अपूर्ण... का मनातल्या भावनांचे सावट या शुभ्र चांदण्यावर ही पडलेले..

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...
अपने रात की छत पर कितना तनहा होगा चांद... !!!शब्दसुरांच्या चांदण्याची अशी बरसात करून..कालच काळाच्या पुढे निघून गेलेले जगजीतजी यांची आठवण आल्याशिवाय ही रात्र सरत नाहीये.. गीत - गझलांची ही कोजागिरी मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांवर अशीच बरसत राहील हे नक्की..
जगजीतजी...तुम्हाला चांदण्यांचीच श्रद्धांजली !!!


- भक्ती आजगावकर

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...

छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!


Sunday, October 2, 2011

We must Learn to walk alone ...!!
We must Learn to walk alone ...!!  जीवनात किती वाटा किती प्रवाह येऊन मिळतात ..
एका उत्कट बेभान लाटेला आभाळ मोकळं पुढे जायला ...
क्षितिजावर रेंगाळणारे लखलखते तारे, अगणित नक्षत्रे आतुर आपल्याला कवेत घ्यायला..
सळसळत्या प्रवाहासोबत वाहत जातो आपण.. वेडावत जातो.. वागवत जातो अंगांगावर सूर्यास्ताचे अगणित वेडे रंग...
सोनेरी, केशरी, पोवळी, गुलाबी आणिक निळे जांभळे रंग नेऊन सोडतात एका गडद काळोखी छायेत...
या साऱ्याच वाटांवर सोबती नाही मिळत नेहमीच... म्हणूनच ... we must learn to walk alone ...!!!

बहराच्या जडभाराने झुकलेली गुलमोहराची फांदी खुणावते तेव्हा तो बहर अनुभवावा एकट्यानं ...
सहज वळणावर भेटावं रातराणीच्या सुगंधानं अन श्वासभर हुंगून घ्यावं ते ही एकट्यानं...
घरी जाताना अचानक क्षितिजावर सूर्याचे सहजी अस्त होणं समजून घ्यावं एकट्यानंच ...
दाटून येणारा आवंढा अन भिजू भिजू पाहणारे डोळे या सोबत मनात रुंजी घालणारं "थोडासा बादल थोडासा पानी... और इक कहानी ...दो नैना औsssर इक कहानी" या सोबत गहिवरून यावं तेही एकट्याने...

आणि एका क्षणी वेड्या सलीलसीमेवर उभं राहून जन्म मृत्यूची ओढाताण भोगावी ती ही एकट्याने.. फक्त एकट्यानेच !!!

" देखिये तो लगता है,
जिंदगी की राहों में इक भीड चलती है ...
सोचीये तो लगता है, भीड मे है सब तनहा !!!
देखिये तो लगता है...
जितने भी ये रिश्ते है.. कांच के खिलोने है,
पल मे टूट सकते है...
इक पल मे हो जाये... कौन जाने कब तनहा !!!

देखिये तो लगता है,
जैसे ये जो दुनिया है.. कितनी रंगी महफिल है..
सोचीये तो लगता है,
कितना गम है दुनिया मे.. कितना जख्मी हर दिल है
वो जो मुस्कुराते थे,
जो किसी के ख्वाबोंमे अपने पास पाते थे
उनकी नींद टूटी है
और वो है अब तनहा ..."
- One of the master pieces from Jawed Akhtar

शेवटी ज्याचं त्याचं गाणं एकट्यानचं म्हणायचं.. उत्कटतेनं ओसंडून जगण्यावर असं प्रेम करायचं आणि आठवणींचा गोफ विणत राहायचं ... रिक्त मनात स्वतचं अस्तित्व सांभाळत... एकट्यानं !!!!

-हिंदी कविता सौजन्य : जावेद अख्तर (Title song of Hindi Serial तनहा )
-
- भक्ती आजगावकर

Tuesday, September 20, 2011

I still stand there...Moment come & moment goes
I remember... I held you close..
what a beautiful day it was
serene beach and engaging trance..
that long trail....hand in hand
and those foot prints on warm sand..
that lovely glance... the sense of belongingness
those magical moments... of togetherness..!!

..... 

yet  moment come .. & moment goes
I stand there, holding memories close
Days pass swift... but the night remain
the dark around soul deny to feel pain
I search those foot prints on empty beach
Just to find... washed off traces wherever sight reach

....

today on beach alone i stand
my mind follows you on foreign land 
I listen the joy that wind carry
yet in hope.. that distance we bury  
the mind knows the fact... that you wont return
yet heart keep saying .. you might turn
yet moment come and moment goes
I still stand there holding you close... !!! 

Bhakti Ajgaonkar


Thursday, September 8, 2011

वे मलंग "मेरा" इकतारा !!


एखादे गाणे कानावरुन तरळून जाते .. अन भिनतेच मनात....
कानात रुणझुणते..ओठावर गुणगुणते ...
"साँग ऑफ डे" होते..

ते फक्त ऐकून नाही..
कुठेतरी आतली भावना हलवून जाते ... कुठेतरी त्या दिवशीच्या आठवणीना हळवी फुंकर घालते ...
कधी मनातल्या आसवांना मूक सोबत करते...

जे नैना करूँ बंद बंद
बह जाये बूँद बूँद
बह जाये बूँद बूँद
तडपाये रे ...
क्यूँ सुनाये गीत मल्हार दे ....

वे मलंग "मेरा" इकतारा
वे मलंग "मेरा" इकतारा !!!

असा मनाचा इकतारा बेसूर होत असताना सात सुरांची इक तार झंकारून देते...ऐन उन्हाळ्यात मल्हाराचे गीत छेडून देते... म्हणून.. सॉंग ऑफ डे !!!!


भक्ति आजगावकरFriday, August 26, 2011

कुछ दिल में है


वह मोड़ कोई अनजाना था
कुछ गुजर गया.. कुछ दिल में है !!
सदियों से थमा जमाना था 
कुछ गुजर गया.. कुछ दिल में है !!

एक पेड़ जिनके शाखोंपर 
फूलोंके सपने खिलते थे .. 
काँटों का अपना फ़साना था 
कुछ बिखर गया.. कुछ दिल में है !! 

एक मंजर वो भी सुहाना था
लहरें साहील को चूमती थी..  
अब एक अकेला साहील है 
कुछ बह सा गया.. कुछ दिल में है !! 

आंसू की अपनी कहानी है 
पिछले सावन की निशानी है .. 
उस दर्द से रिश्ता पुराना है 
कुछ भूल ही गया.. कुछ दिल में है !!!

भक्ति आजगावकर


Tuesday, August 23, 2011

श्यामा


दु:ख दाटते रोमरोमी
अंधार दाटतो गात्री
"श्यामा" झाली राधा
सोसुनी श्याम विरही रात्री !!!

शाम विरही रात्रीचा
अवघा एक सहारा
अंधार सारा मनात
नयनात शुक्र तारा ... !!!

शुक्र तारा बोलतो
आस हि मोडू कशी.. .
श्वास या हृदयी जसा
मुरली धून भिनली तशी !!

धून एक अंतरी
कृष्ण कृष्ण कृष्ण नाम ..
विसरले कालिंदी ला
विसरले गोकुळ ग्राम !!


नित्य गोकुळी आता
कृष्ण रास चालतो ..
भक्तीच्या ऋणी कान्हा
नाव राधाकृष्ण लावितो !!!

- भक्ती आजगावकर


छायाचित्र आंतरजालाहून साभार!! Saturday, August 13, 2011

भावकणिका

कोऱ्या राहिलेल्या पानांचीच
माझी  एक वही आहे...
त्या त्या वेळच्या मौनाने
ते स्वताहून दिलेली सही आहे ...!!!

- भक्ती आजगावकर 

Friday, August 12, 2011

जीवन!!


अक्सर यही होता है .. 
पता नही चलता कहां जाना है.. कब जाना है 
और जिन्दगी गुजर जाती है ...!! 
बिलकुल उन लहरों की तरह .. 
न कोई स्वतंत्र अस्तित्व होता है उनका...
न कोई आदि न अंत ..!!
बस आती है और बहा ले जाती है .. 
हम देखते रहते है और समझ नाही पाते,  
के कब हम उनमे समा गए ..!!
बस हाथ आती है..
कुछ स्वर्णमयी रेत और कुछ जलबिंदु 
वो भी हाथ से फिसलते हुए .. 
कभी कभार कोई सीपी भी,  
और मन में आशा सी जगती है ...
के शायद कोई मोती हो ..!! 
बस बहता है.. बहता जाता है जीवन 
और पता नही चलता कब .. 
अपनी सीपी बंद करने की घड़ी आ गयी ..
कब मिट जाना होगा हमें ... !!
सचमुच किसी को खबर नही होती 
कोई सीपी अपने आप में मिटकर 
इस अथांग सागर में कब गुम हुई .. !!
बस आसपास कुछ बुन्दोंमे हलचल सी होती है ... 
पर पल दो पल में ही वो स्वयं में घुलकर 
बना लेती है खुद को इतना विशाल ..
के कोई कमी न रहे...  
बस फिर नयी बुँदे नयी लहर 
और जीवन बहता रहता है .. !!! 

- भक्ति आजगावकर 
Monday, August 8, 2011

तगमगका ही अशी तगमग 
आणि वेडा अट्टाहास.. 
कातरल्या वेळी अश्या 
मनी चांदण्याचा भास !!

यायचे न आज कुणी
वाट वाहे सुनी सुनी.. 
तरी वारा रुंजी घाले 
अडवितो अर्धा श्वास !! 

मानेभोवती स्वत:च्या  
आपलाच करपाश.. 
सोसवेना आता तरी 
नव्या वेदनेचा ध्यास !!

अष्टौप्रहर असा हा 
खेळ चाले प्राक्तनाचा.. 
माझ्या श्वासासंगे चाले  
तुझ्या आठवांचा रास !!! 

- भक्ती आजगावकर 
Saturday, August 6, 2011

Without You!!!

Day started with hope to see you today
& see the road is taking me opposite way !!
Life has always so much to offer..
Why sometimes we beg to differ !!! 
Why the singing bird don't entertain anymore
Why the rainbow don't flaunt the colorful cover...
Why the blissful morning yet don't shine bright
Why one find shelter in dark of night...
Why the mere existence doesn't seem to be "Me"
The only reason i can find is "YOU" are not with me !!! 

- Bhakti Ajgaonkar 


Wednesday, August 3, 2011

"कॅफे कॉफी डे" - हिंदीसारे कॉफीप्रेमी अन "कॅफे कॉफी डे" प्रेमीं को समर्पित ....   

हलके से आंखोंसे छुटे.. ये दिल कॉफी पे जा बैठे 
कितने सपने जीवन के.. इस झाग मे खिले और टुटे

दु:ख के एक घुट जैसी.. एक्स्प्रेस्सो की कडवी जंग.. 
कॅपुचिनो की साथ हरदम शक्कर, दुध और क्रीम संग   

लॅंटे की मनमोहक खुशबू कॉफी का असली खुमार 
पंचेद्रीयोन्से मजे लो ये स्वर्ग ही जैसे धरती पर 

ऐसे सिखाये इक कप कॉफी जिने का ढंग.. समझो तो 
माहोल "कॅफे कॉफी डे" का.. इक बार आजमाओ तो !!!   

- भक्ती आजगावकर

Tuesday, August 2, 2011

"कॅफे कॉफी डे"


सार्‍या कॉफीप्रेमी अन "कॅफे कॉफी डे" प्रेमींसाठी समर्पित ....  

अलगद निसटुनी डोळ्यामधुनी हृदय तरंगे कॉफी वरती  
कितीक स्वप्ने आयुष्याची फेसावर उमलती न विरती !!!

गंध कडक हा एक्स्प्रेसो चा कडू घोटासह दु:ख जरी 
कॅपुचिनो ची सदैव सोबत साखर दुध न क्रीमसोबती !!! 

लॅंटे चा एक घोट मनस्वी गंध चव कॉफीची खरी 
पंचेद्रीयांनी उपभोगावी स्वर्गच जणू धरेवरती !!! 

अशी शिकवते एकच कॉफी जगण्याची रीत ही न्यारी 
माहोल "कॅफे कॉफी डे" चा मिठ्ठाससे क्षण स्मरती !!!  

- भक्ती आजगावकर


Monday, July 25, 2011

बाबूजी !!!

परब्रम्ह हे भक्तांसाठी.. मुके ठाकले भीमेकाठी 
उभा राहिला भाव सावयव .. जणू कि पुंडलिकाचा...  
कानडा राजा पंढरीचा ... !! 

आम्हा साऱ्या संगीतभक्तांसाठी सुद्धा हा सूरतालाचा पुंडलिक जणू बाबूजींच्या रुपात उभा राहिला... त्यांच्या स्मृतीदिनी (२५ जुलै १९१९  - २९ जुलै २००२) त्यांच्या गीतांचा अमृतकलश मनामनात हिंदकळला नाही तर नवलच... 

भूपाळी, भक्तीगीत, अभंग, बालगीत, भावगीत, हळुवार प्रेमगीत, विरहगीत, करुणगीत, लावणी, वीरश्रीपूर्ण युद्धगीत आणि प्रतिरामायण जणू असे गीत रामायण !!! अश्या साऱ्याच चित्रपट संगीत अन सुगम संगीत यात संगीत दिग्दर्शन अन गायन करून हिंदी अन मराठी दोन्ही रसिकांच्या मनात अजरामर झालेले बाबूजी...   

तर हा ह्ळूवार स्वराचा, अवीट गोडीच्या चालींचा अन शाश्वत आनंदाचा "ज्योती कलश" या पुढे ही पिढ्यानपिढ्या असाच "छलकत" राहणार यात काही शंका नाही... 

तुमचे कौतुक म्हणजे पुन्हा ज्योतीने तेजाची आरती ..!! 
सूर तुमचे, चाल तुमची अन आवाज ही तुमचा... आमची फक्त अंजली .. भावनांची,  स्मृतींची अन श्रद्धेची   !!! 

- भक्ती आजगावकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!

Saturday, July 23, 2011

अर्ध्य धन्यवादाचे !!!

स्वर्णिम सखीचे मनोगत ...  


1 Month and 10 Days.... 
33 posts 
500 + visitors 
1000 + pageviews... 
44 comments 
18 Followers 


Seems all play of numbers ...  
but somewhere inside, one knows the value of those numbers... 


Its not only figures... it depicts the love you get from your friends,  known.. unknown friends..  the support to your effort of expressing self.. the acceptance of your creative side .. the token of appreciation... also the non-ending expectation of betterment..


Those are not just numbers... It certainly multiplies the joy of reciprocation beyond the happiness of self expression....  


Before i addup the my familier way of saying Thanks ....


a humble thanks to all of you - दीपक, अभिषेक, हेरंब, स्वानंद and कल्पेश  for almost pushing me to Blogworld :) 


कविता ...

पहिले कडवे कधी कॉलेज मध्ये असताना केले होते...
आज कविता पूर्ण झालीय....
रास रंगलाय शाम विरही रात्रींचा .. :)
प्रसव वेणा कवितेच्या...अन आनंद सृजनाचा ... त्या शामसुंदरा साठी ...राधेसाठी... अन माझ्यासाठी !!

तुला कळवतेय कारण या साऱ्यात तू सुद्धा तुझी ओंजळ कधीतरी रिती केलेली ...
गोकुळात ...कालिन्दीत ... अन वर्षे सरली तरीही कालिंदी वाहती आहे...
पुढचे ठाऊक नाही.. पण आजचे अर्ध्य आज द्यायला हवे....

धन्यवाद !!!

- भक्ती आजगावकर

Friday, July 22, 2011

आस

ओंजळीत तुझ्या मोगऱ्याची फुले 
दिली कुणी नी घेतली कुणी.. 
सुगंध माझ्या भोवती परिमळे
आले कुणी अन गेले कुणी ..!! 

नभांच्या किनारी धरेचे उसासे 
क्षितीज हा भास वाटे जरी..  
शब्दातुनी रक्त सांडे कुणाचे 
व्यथा जुनी वेदना ही जुनी..!! 

दिशांध वारा गुज सांगे कुणाचे 
हुंकार हे दाटती अंतरी.. 
अज्ञात काहूर हृदयात माझ्या
अनोळखी चेहऱ्यांचे ऋणी..!! 

अगतिकतेचे हे पाश भवती
सुरावाचुनी जशी बासुरी.. 
देई विसावा अखेरच्या क्षणाला 
असे आस ही माझिया मनी..!! - भक्ती आजगावकर Tuesday, July 19, 2011

इक बातचीत


हम : 
अब क्या बताये उनको हम 
उनकी आंखोंसे दुनिया देखते है
गैरत भी है.. मुहोब्बत भी हमको
जवाब-ए-इश्क को शर्म के परदे मे रखते है !!! 

वो
वो देखते हैं दुनिया हमारी आँखोंसे'
और हम दुनिया में उन्हिको देखते हैं|
वो शरमाके पलके झुका लेते हैं,
और हम उनकी आँखोंमें देखने को तरसते हैं !!!

हम :
उनकी दुनिया हमसे है
और हमारी भी उन्ही से...
सपनो से भरी है हमारी आँखे..
और उन्हे शिकायत झुकी पलको से !!!

वो
शिकायत यही झुकी पलको से
के हमारे ख्वाब नही दिखते ...
जवाब तो सारे साथ लाये है...
उनके सवाल ही नही दिखते..!!

हम :
वो शिकायत करे, पसंद है ...
वो इनायत करे, पसंद है...
जिंदगीका साथ है.. रुठना मनाना
वो हमारे साथ है... पसंद है !! 


 - भक्ती आजगावकर 
(Thanks Vinayak for वो देखते हैं दुनिया हमारी आँखोंसे...)  


कविता

कविता... 

आरसे महालात अवचित डोकवावे ..अन चहूदिशांनी आपल्या प्रतिमा सामोऱ्या याव्या .. साऱ्या अक्षरातून आपलेच हुंकार जाणवावेत.. अन कडव्या कडव्यातून आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब दिसावे तसेच काहीसे कवितांचे उमगणे... 
उमलणे अंतरात ..

कवी "ग्रेस" यांच्या सारख्यांच्या कविता म्हणजे तर पाण्यावर सोडून दिलेले चिमुकल्या ज्योतींचे दिवेच जणू...
लाटेवर वाहतील ... वाऱ्यासह त्याच्याच दिशेला पांगतील ... 
जे ओंजळ पसरतील, त्यांच्या हातीसुद्धा लागतील.. 
मग त्या दिव्यांनी तुमच्या मनातील अंध:कार दूर होवो ..
किंवा मग भरून आलेल्या भावनांच्या कोठाराला आग लागो .. 
सारे सारे त्या ओंजळ पसरणाऱ्या व्यक्तीचे ...

अश्याच एका कवितेच्या समजण्याचा ... अहं ... कळण्याचा ... नाहीच,,, उमगण्याचा प्रवास .. 
या हृदयीचे त्या हृदयी असाच ,... एवढाच .. 

बाकी शब्द कवीचे... जाणीवा ज्याच्या त्याच्या .. 
अनुभव ज्याचे त्याचे .. अन प्रत्यय तो हि ज्याचा त्याचा ... 

असाच एक प्रत्यय .. अलवार जुईच्या हिंदकळण्याचा ... 

कवी "ग्रेस" यांची कविता .. 

राजपुत्र आणि डार्लिंग

थांब. उसळू नकोस लगेच अशी या नकारावर 
शांतपणे ऐक. दातातून सोड्वून घे ओठ.
किती घट्टपणे बोटे गुंतवितेस? किती गुन्तवलेस स्वत:ला या प्रेमाच्या पाशात् ।।
किती आवेगाने धरून ठेवलेस हे प्रीतीचे बन्ध 
या पहाडाची एकट एकट बेटे काय सहज झाली असतील? 
पहाडा सारखा सतत तुझ्या सोबत असण्याचा... अचल अविचल असण्याचा ध्यास मोडून हे विखरून पडणे आलेय नशिबात.. हे विलग होणे जीवघेणेच .... 
परक्यासाठी रडू यावे तसे काय समुद्र सहज जमले असतील? हृदय पिळवटून निघावे तसे हे अश्रुंचे समुद्र उगीच का झालेत... 
गुलाब वाळायला लागले की बेटांचा जीव जागेवर नसतो पोरी,.. 
दिलेल्या शपथा..घेतलेल्या आणाभाका... चोरून दिले घेतलेले अन मनात अजून ताजे असणारे गुलाब या अश्या परिस्थितीच्या झळांनी वाळायला लागले की ते छिन्न विच्छिन्न हृदय जागेवर कसे राहील... !!! 

- कवि ग्रेस


स्वैर रसस्वाद: भक्ती आजगावकरMonday, July 18, 2011

शुभेच्छा

रस रंग स्पर्श गंध
जाणिवेचे अगणित बंध 
शाश्वत आनंदाचे कंद 
तुमच्या साठी ... :)

भक्ती :)

Sunday, July 17, 2011

बूंद


दवबिंदु सा जीवन सारा 
युही बह जाना है 
बस एक बार मगर 
कमल दल पर नहाना है 

बैठू मैं जरा गौर से 
और लगु मोती जैसा 
कितने पल का है जीवन 
ये फिर क्यों गिनना है 

नीर बनके बहु 
आस ये मन में अभी 
तृषार्त की प्यास को 
एक बूंद से बुझाना है 

बारिश की बूंद हो जाऊ 
या आंसू की इक बूंद 
दया रहे मन में भरी 
फिर गगन को छुना है 

- भक्ती आजगावकरSaturday, July 16, 2011

जाग

क्षितिजाच्या रेषेवर
नव्या पहाटेची साद..
दुलईत निजलेली
शांत झोप चाळवावी  !!

पेंग टाकुनी पहाटे
झाडपाने व्हावी जागी..
दवबिंदूच्या स्पर्शाने
अन काया मोहरावी !!

पंख पंख चिंब चिंब
थरारुनी रानपक्षी..
पाचूहिरव्या रानात
निळी लकेर उडावी !!

असा बरसावा ऋतू
जाग अस्तित्वाला यावी..
राठ खोडाला फुटावी
नवी जाणीव पालवी !!!

- भक्ती आजगावकर 


- भक्ती आजगावकरसुबह


क्षितीज के किनारेपे  
नयासा इक सवेरा 
मिठीमिठी नींद मे
कुछ करवटे चाहिये !!

फुलपत्ते खिले है 
नयीनयीसी सुबह 
ओस कि बुन्दोमे 
तन भीगना चाहिये !!

पाखपाख गिलागिला
भिगाभागासा ये पंछी
हरे हरेसे जंगलमे
सूरकी लकीर चाहिये !!

ऐसे बरसो ओ मेघा
जाग जाये अस्तित्व
उदास मन की शाखपे
नये पत्ते खिलने चाहिये !! 

 - भक्ती आजगावकर 


Thursday, July 14, 2011

नियती

..
थरथरत्या हाताने ठेऊन आलेले ते पाकीट...
चोर नजरेने पुन्हा एकदा वळून पाहताना अपराधीपणाचा परत एकदा वार अंगप्रत्यंगावर  ,,,
परत परत मनाची चलबिचल होत असतानासुद्धा डोळ्यासमोर आलेले भुकेले चेहरे आपल्याच मुलांचे... त्यांची फाटकी दप्तरे अन फुटलेल्या पाट्या...
यात त्यांचे सारे बालपण करपून चालल्याची एक धारदार जाणीव...

आपल्या कोणत्याच प्रयत्नांना यश नको पण निदान पोटा पुरता पसा??? तो हि नाकारत चाललीय हि नियती...का... ???
अन मग आता हे काम... हा सूड स्वत:वर... दुनियेवर कि नियतीवर... नक्की कोणावर..???

अन कसले हे काम... काय असेल त्या पाकिटात... वाईटसाईट काही काम तर नसेल.. काय करून घेतील... पण भुकेल्या मुखी दोन घास देणारे काम... वाईट कसे असेल ...मनाचा हिय्या करून विचारावे तरी फक्त ओरडा बसला... नको त्या गोष्टीत नाक न खुपसण्याचा ..

निदान एका गोष्टीचे सुख आहे .. घरापासून दूर आलोय ... ठिकाण हि नवीन आहे... ओळखीचे नाही ..      
पण काय होईल त्या पाकिटाचे .... हा प्रश्न अधुराच राहील ...

पुरे... सध्या जेवण घेऊन घरी जावे आधी ... त्याशिवाय पोटाची न मनाची भूक भागणार नाही...

.....
.....
.....

हे काय... बायको एकटीच घरात ... मुलं कुठेयत ...
"वस्तीतल्या ताईने मुलांना फिरायला नेलेय... का.. कुठे...??
परत कधी येणार ?? ... हे काय..मी खाऊ आणलाय न.... उघडला पण नाहीये अजून... कधी याल रे बाळानो... निदान आज तुम्हाला पोट भर जेवताना पाहू दे...

कधी याल.. किती उशीर...??
अन हे काय... हे वस्तीवाले.. सगळेच का एकत्र... काय हा कोलाहल..  काय झालेय काय...?

देवा... ताई अन मुलं कुठेयत ... कुठे गेली होती नेमकी ...

अरे देवा... हातातला खाऊ ... माझी मुलं ...
हे सारं जग माझ्या भोवती का फिरतंय... !!!!

- भक्ती आजगावकर


आज मुंबई बॉम्बस्फोटाच्या मिषाने... त्यात बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली... अन त्यातल्याच एका विचाराचे हे तरंग...  
आज पहिल्यांदा.. लिहिताना आनंद होत नाहीये... :(

Wednesday, July 13, 2011

क्षणिका

असा बरसावा ऋतू
जाग अस्तित्वाला यावी
राठ  खोडाला फुटावी
नवी जाणीव पालवी  !!!

- भक्ती :)

Monday, July 11, 2011

विठ्ठल

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभावे ... !!!!

जीवनाच्या या अखंड वारीच्या प्रवासात तुमची साथ सोबत अखेरच्या श्वास पर्यंत राहो... देवळाचा कळस पाहून तुला उराउरी भेटण्याचा आनंद मानणाऱ्या वारकरयाची निस्सीम भक्ती अंतरंगी भिनत राहो... तुझ्या नामाचा गजर कानात घुमत राहो ...तुझ्या अस्तित्वाचा परिमळ अवघे जगणे सुगंधित करो ... ही प्रार्थना ... !!!

फोटो आंतरजालाहून साभार ...

Sunday, July 10, 2011

कॉफी ..!!!


काही काही कनेक्शन्स अगदी जुळून आलेले असतात न... जणू एकमेकासोबत असावे असेच... असेच एक गहिरे नाते... आपण अन कॉफी यांचे ..  

धुंद कोसळता पाउस.. खोलीचा आवडता कोपरा.. आभाळ दाखवणारी फ्रेंच विंडो .. द्रुत लयीत आलेली शुभा मुदगल यांची तान.... नी हातात दरवळत्या कॉफीचा मग ... 
स्वर्ग स्वर्ग धरेवर म्हणतात .... तो अजून वेगळा असतो का.. 

आठवणींच्या लडी एकवार उलगडू लागल्या की किती विविध रंगी गुंता होत जातो स्वत:भवती...  किती तलम रेशमी धागे उलगडत जातात बांधून ठेवलेले ते क्षण, ते बंध, ते स्पर्श... 

किती अन कशी, ही अशी कॉफी साथ करत राहते आपल्याला.. आपल्या जगण्याचा एक भाग बनत..

कधी परीक्षेच्या रात्रींत डोळे फाडून अभ्यास करताना... वेलदोड्याच्या वासासोबत आईची माया जाणवून देणारी... 
कधी कॉलेज मधून लेक्चर बंक करून अश्याच पावसात घेतलेली... मैत्रिणींच्या घोळक्यात ...गप्पात ... सगळ्यांच्या हातात फिरत हाती रिकामा मग कधी आला हे सुद्धा न कळलेली ... अन मग कॉलेज च्या कट्ट्यावर सवयीची होऊन गेलेली .. 
कधी सगळ्यांना चुकवून, धडधडत्या हृदयाने अन थरथरत्या हाताने पकडलेला तो सिसिडी चा मोठ्ठा कप... "हातातून तो कप सुटेल की ओंजळीतून हृदय" अशी त्या कॉफीवरच्या क्रीमच्या नक्षीत हरवलेली ...
कधी एकटेपणात त्याच घोटाघोटातून "प्रिय" च्या सुगंधी आठवणी जागवणारी ...मनात रुंजी घालत सारी संध्याकाळ श्यामविरही करणारी... 

इतकी जिव्हाळ्याची साथ देते कॉफी... शेवटच्या थेम्बा पर्यंत ... डोके भन्नाट उलट सुलट फिरत असताना अन टोकाचे विचार आजूबाजूला पिंगा घालत असताना .. जिवलग मित्रासारखी सोबत करणारी.. समजावणारी ..अन संपता संपता आपले विश्व ताळ्यावर आणणारी सुद्धा...  किती पेल्यातली वादळे याच कॉफीमग मध्ये शमतात.. 

अशी प्रत्येकासाठीच आठवणीनी मधुर बनलेली कॉफी ... या कॉफी पुराणात सरतेशेवटी आठवतोय तो शांताबाई यांनी केलेल्या एका जपानी हायकुचा भावानुवाद .... 

"कॉफी हाउस
प्रत्येक टेबल भवती 
स्वतंत्र पाऊस ..." 

एकच कॉफी हाउस पण प्रत्येक टेबल वर नवीन माणसे...  अन त्यांना भिजवणारे त्यांचे क्षण .. अनुभव, त्यांच्या आठवणी, स्वप्ने.. गप्पा ..अन अजून कितीतरी शेअरिंग ... असा हा प्रत्येकाचा स्वतंत्र पाऊस ... 

अश्या तुमच्या आठवणींचा पाऊस एव्हाना तुमच्याही भोवती सुरु झाला असेल न..  

सो Enjoy.. तुमची कॉफी अन तुमचा पाऊस माझ्यासोबत !!! 
:) 

- भक्ती आजगावकर 

फोटो आंतरजालाहून साभार 

क्षणिका

पहिल्या पावसात चिंब 
भिजावसं वाटतं..
कात टाकून हिरवंगार
रुजावसं वाटतं..

भक्ती :)

   
कधीकधी आपलं गुपित
आपल्यालाच नव्याने कळतं
कोणताही प्रहर असो
तेव्हा डोळ्यात चांदणे फुलतं !!

भक्ती :)

Wednesday, July 6, 2011

कविता माझी ... !!अगम्य किंवा सुगम ...कधी मूर्त कि अमूर्त ..
शब्दातून जे मांडले ...माझ्या मनीचे आवर्त.. !!

संथ जलाशयापरी... नितळ से पारदर्शी ..
क्वचित विस्कटलेलं ..वादळ गरगरतं..!!

जाईजुई फुले कधी.. अल्लद हिंदकळली ..
वटवृक्षाची सावली.. कधी अपार घनगर्द ..!!

झुळझुळता झरा जणू.. उत्फुल्ल खळाळता ..
अन वैशाख वणवा.. सदा अंतर्यामी तृषार्त..!!

गूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची ..
शब्द शब्द माझे तरी......  अनुभूती तुमची सार्थ !!!
   


- भक्ती आजगावकर Sunday, July 3, 2011

पाऊस ...

पाऊस ...

अस्सा भरारा वारा सुटतो अन् सारा आसमंत वादळून जातो ..
आपण वेड लागल्या गत पाहत राहतो...
पाऊस ... वेडा पाऊस...
चिंब करणारा.. स्वप्ने जागवणारा...
वाट पाहायला लावणारा... अन् न चुकवता “प्रिय”च्या आठवणी घेऊन येणारा...
दुरून आकाशवाट चालून येतो अन् भिजवतो...
अन् आपण भिजत राहतो..
धारांमधे ... आठवणीच्या गारांमधे ...

कसे सांगणार... कसे उत्तर देणार ...
"You are enjoying rain without me... :( "
"अरे वेडू ... I am missing YOU... with Rain!!"
:)

असे हे आठवणींचे आवर्त सुरू होते.. सार्‍या भावनांचा कल्लोळ ..
अन् ते शमवायची ताकद सुद्धा त्या पावसाकडे..
किती वाट पाहावी.. किती झेलावे ... किती भिजावे…अंतर्बाह्य …

कुणी धाडिले हे घनु जांभळे
कुणी वेढिले हे ऋतू कोवळे
नभातून वाहे व्यथा मुक्त हळवी
डोळ्यातूनी अन् हसू साकळे !!!

"तू न मी" हातात हात घेऊन तळव्यावर पाऊस झेलताना
ठाऊक असतील त्याला.. कोसळणार्‍या सार्‍या रात्री..
पापण्यांवर आणून परतवलेला सारा पाऊस..
बरसलेल्या सार्‍या आठव सरी

पण या वेळी मात्र पाऊस तुझा न माझा असणार न...
तुला स्पर्श करून माझ्याकडे येईल तो... चिंब करायला..
तुझे श्वास घेऊन येईल.. मृदगंध होऊन भारायला..
अन् तू होऊनच बरसेल.... अंतर्बाह्य …

:)

- भक्ती आजगावकर