Thursday, May 31, 2012

गाठ - एक ओवी !!पहिली माझी गाठ, 
गाठ देवापायी..
माया असू द्यावी,
लेकीवरी ..!!

धागा धागा मऊ,
रंग रंगांचा खेळ.. 
आयुष्याचा वेळ,
जात असे..!! 

संस्काराची शिदोरी,
भावनांसी ओढी.. 
नात्यांची या गोडी,
जन्मजात ..!!

विणण्यात हात मग्न, 
धागे उभे नि आडवे.. 
गाई ईशाचे गोडवे,
मुख सदा..!!  

मनी रंग उजळ,
विणावा सुखाचा..  
गहिरा दुखा:चा,
असू द्यावा..!! 

गाठ गाठ जोडी,
धागे अपुऱ्या श्वासाचे.. 
सकल आयुष्याचे, 
महावस्त्र ..!!

कधी तुटला संपला, 
कधी गुंतला स्वत:त..
जप कौशल्य हातात, 
जोडण्याचे..!! 

कधी चुके टाका, 
चुकतेची कधी वीण ..
उसवुनी पुन्हा शिवण,
सावरावे..!! 

गाठ गाठ अशी,
उकलावी नीट..
नको निरगाठ,
आयुष्याची..!! 

भक्ती आजगावकर 


प्रकाशचित्रातील विणकाम स्वत: केलेले ..अन भरतकाम मातोश्रीनी :)