Sunday, June 17, 2012

म्हातारी


किती म्हातारी... ?
"म्हातारी" ... "म्हातारीच ..." 
किती म्हातारी ..असे नसते न ...
नुसती म्हातारी असते... वय नसतेच तिला ..  
असलेच तर त्याचा लेखाजोखा नसावा कुणाकडे.. 
उद्देशहीन ... वाऱ्यावर उडणारी ..
ठिकाणा माहित नाही ...
रस्ता ठरवलेला नाही ..
का... तेही तिला माहित नाही ... 
कधी एखादी झुळूक अल्लद घेऊन जाते सोबत ... 
कधी चुकार वारा उडवून लावतो फांदीवरून... 
कधी ढळत्या संध्याकाळी दमून विसावते सागरतीरावर ..
कधी उगवतीला पुन्हा एकदा स्वार लाटांवर .... 
घर असते का तिला... आपली माणसे... 
आठवण येत असेल... ?? परतीचे मार्ग खुणावत असतील?? 
कसलेसे बंध ओढत असतील का मागे... नसणाऱ्या पायांना  ... 
की नसलेल्या शरीरात मन सुद्धा नसेल जराही..
नुसताच शुभ्र केसांचा एक इवलासा पुंजका  .. 
एक खडबडीतसा चेहरा ... कान नाक डोळे .. काही काही नसलेला...  
तरी त्या सटवीला भाळ तरी कसे सापडले असेल असे भटक्या आयुष्याच्या रेषा ओढायला...  
नाही म्हणायला .. कधीतरी कुणाचेतरी लक्ष जातेच .... 
अन एक चमकदार रेघ उमटते ..एक स्मित ..
उडणाऱ्या म्हातारीला पाहून... 
तेवढेच एक श्रेयस.. आयुष्याचे.. 
बाकी सारे निरर्थकच ... 
अंतहीन प्रवास .. उडण्याचा ..  
म्हातारी असण्याचा .. 

- भक्ती आजगावकर  




छायाचित्र आंतरजालाहून साभार!!


15 comments:

  1. धन्यवाद निखील न योग :)

    ReplyDelete
  2. शब्दातीत.... फार विचार करायला लावणारं

    ReplyDelete
    Replies
    1. म्हातारी आहे ती ... विचार करेल सुद्धा अन करायला लावेल सुद्धा.. :)
      ती हा... मी नाही ...

      प्रतिक्रियेबद्दल धन्स!!

      Delete
    2. विचार करेल की नाही ते माहीत नाही, करायला लावला आहे मात्र, हे खरं...
      (काय बुवा ह्या कल्पना भारी अचाट असतात, कुठून कुठून सुचतात काय माहिती)

      Delete
    3. कसला विचार... सांगून टाका बर पटकन.. :)
      कल्पना... त्या म्हातारीगत उडतच असतात आजूबाजूला.. हातात येत नाही तो भाग अलाहिदा :D

      Delete
  3. व पु म्हणतात,

    एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राह्यलेला नाही. कापसाच्या म्हतारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हतारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत. (व पु काहीच्या काही भारी लिहितात)

    आता म्हातारी नक्की कशी! (असतात की नाही कल्पना अचाट)

    ReplyDelete
  4. उडणारी म्हातारी कल्पनाच विशेष आहे! आणि त्यात सखी तुझे काव्य....मस्तच!

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      उडणारी म्हातारी तर असतेच न ... माझी कल्पना नाही ती ..
      लहानपणापासून अश्या उडणाऱ्या म्हातारयांचे आकर्षण होतेच ...पण काळाबरहुकुम आता एक पदर ममत्वाचा जोडलाय... अनुभवातून असेल कदाचित...

      तुला आवडले हे ऐकून छान वाटले ..
      :)

      Delete
    2. अग त्या रुईला उडणारी म्हातारी म्हणतात न ती कल्पना विशेष वाटते...

      Delete