भावकणिका !!

नज़र अशी रुद्ध होते
हिरमुसते गहीवरते
अन रिकाम्या घरातून
एकटीच भिरभिरते !!!

-भक्ती :) 




माझी मोहरली जाई
तुझा चाफा निष्पर्ण 
साद घालता आर्जवी 
का रे राहते अपूर्ण 

-भक्ती :) 

क्षितीजाचा अबोला तुझा
माझी असीम धरा जरी
चल शब्दांनी भरुन टा़कू
तुझ्यामाझ्यातली अबोल दरी...

- भक्ती :)

जेव्हा आठवणींची फुले बरसतात
अस्वस्थ मनाच्या अंगणात सारी..
असू द्यावे एक समाधान मनात
उद्या यायची आहे पहाट न्यारी..!! 

- भक्ती :) 

असा बरसावा ऋतू
जाग अस्तित्वाला यावी
राठ खोडाला फुटावी
नवी जाणीव पालवी !!!

- भक्ती :)

अश्या सलील सीमेवर झुलणे का ... 
अश्या आंदोलनांनी हलणे का... 
आपण आपण आपलेच तरी.. 
इतके अनोळखी जगणे का..!! 

- भक्ती :) 

शोध घेतसे कुणी प्रवासी भटके दारोदारी
कल्पतरूची अशी कल्पना बाळगे तव उरी
जग धुंडाळुनी दमला.. कुणी सांगा त्याला तरी
कल्पतरूची एकच फांदी उमले.. परी ... अंतरी !!!!

- भक्ती :)

पहिल्या पावसात चिंब 
भिजावसं वाटतं.. 
कात टाकून हिरवंगार 
रुजावसं वाटतं.. 

भक्ती :) 

कधीकधी आपलं गुपित
आपल्यालाच नव्याने कळतं
कोणताही प्रहर असो
तेव्हा डोळ्यात चांदणे फुलतं !!

भक्ती :)

तळव्यात तुझ्या मोगऱ्याची फुले... 
दिली कुणी घेतली कुणी... 
मनास माझ्या हे सुगंधी खुळे... 
आले कुणी गेले कुणी ..!!! 

भक्ती :) 

बहर कधी ओसरेल सांगता येत नाही ..
प्रहर कधी उलटेल सांगता येत नाही ..
अजून ही पहाट आहे चांदण्याची ..
चंद्र कधी निसटेल सांगता येत नाही... !!!

भक्ती :)

मूर्त थोडे..अमूर्त थोडे .. 
थोडेसे मागोवा घेणारे.. 
अस्पर्श भावनांचे इशारे.. 
खुल्या शब्दातून देणारे ...!! 

भक्ती ... :) 

"तू तुझा आहेस...ठीक आहे
तू माझा असावास हा आग्रह नाही ...
कारण तुझे असणेच इतके छान आहे..
की तिथे तुझा माझा हा विग्रह नाही ..."

- भक्ती :)

3 comments:

  1. :) chhaan aahet... kaahi agamya se!

    ReplyDelete
  2. हळुवार भावनांचे त्याहूनही हळुवार अशा शब्दांतून आविष्करण-छान!!

    ReplyDelete