ओंजळीत तुझ्या मोगऱ्याची फुले
दिली कुणी नी घेतली कुणी..
सुगंध माझ्या भोवती परिमळे
आले कुणी अन गेले कुणी ..!!
नभांच्या किनारी धरेचे उसासे
क्षितीज हा भास वाटे जरी..
शब्दातुनी रक्त सांडे कुणाचे
व्यथा जुनी वेदना ही जुनी..!!
दिशांध वारा गुज सांगे कुणाचे
हुंकार हे दाटती अंतरी..
अज्ञात काहूर हृदयात माझ्या
अनोळखी चेहऱ्यांचे ऋणी..!!
अगतिकतेचे हे पाश भवती
सुरावाचुनी जशी बासुरी..
देई विसावा अखेरच्या क्षणाला
असे आस ही माझिया मनी..!!
- भक्ती आजगावकर
No comments:
Post a Comment