कविता...
आरसे महालात अवचित डोकवावे ..अन चहूदिशांनी आपल्या प्रतिमा सामोऱ्या याव्या .. साऱ्या अक्षरातून आपलेच हुंकार जाणवावेत.. अन कडव्या कडव्यातून आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब दिसावे तसेच काहीसे कवितांचे उमगणे...
उमलणे अंतरात ..
कवी "ग्रेस" यांच्या सारख्यांच्या कविता म्हणजे तर पाण्यावर सोडून दिलेले चिमुकल्या ज्योतींचे दिवेच जणू...
लाटेवर वाहतील ... वाऱ्यासह त्याच्याच दिशेला पांगतील ...
जे ओंजळ पसरतील, त्यांच्या हातीसुद्धा लागतील..
मग त्या दिव्यांनी तुमच्या मनातील अंध:कार दूर होवो ..
किंवा मग भरून आलेल्या भावनांच्या कोठाराला आग लागो ..
सारे सारे त्या ओंजळ पसरणाऱ्या व्यक्तीचे ...
अश्याच एका कवितेच्या समजण्याचा ... अहं ... कळण्याचा ... नाहीच,,, उमगण्याचा प्रवास ..
या हृदयीचे त्या हृदयी असाच ,... एवढाच ..
बाकी शब्द कवीचे... जाणीवा ज्याच्या त्याच्या ..
अनुभव ज्याचे त्याचे .. अन प्रत्यय तो हि ज्याचा त्याचा ...
असाच एक प्रत्यय .. अलवार जुईच्या हिंदकळण्याचा ...
कवी "ग्रेस" यांची कविता ..
राजपुत्र आणि डार्लिंग
थांब. उसळू नकोस लगेच अशी या नकारावर
शांतपणे ऐक. दातातून सोड्वून घे ओठ.
किती घट्टपणे बोटे गुंतवितेस? किती गुन्तवलेस स्वत:ला या प्रेमाच्या पाशात् ।।
किती आवेगाने धरून ठेवलेस हे प्रीतीचे बन्ध
या पहाडाची एकट एकट बेटे काय सहज झाली असतील?
पहाडा सारखा सतत तुझ्या सोबत असण्याचा... अचल अविचल असण्याचा ध्यास मोडून हे विखरून पडणे आलेय नशिबात.. हे विलग होणे जीवघेणेच ....
परक्यासाठी रडू यावे तसे काय समुद्र सहज जमले असतील? हृदय पिळवटून निघावे तसे हे अश्रुंचे समुद्र उगीच का झालेत...
गुलाब वाळायला लागले की बेटांचा जीव जागेवर नसतो पोरी,..
दिलेल्या शपथा..घेतलेल्या आणाभाका... चोरून दिले घेतलेले अन मनात अजून ताजे असणारे गुलाब या अश्या परिस्थितीच्या झळांनी वाळायला लागले की ते छिन्न विच्छिन्न हृदय जागेवर कसे राहील... !!!
- कवि ग्रेस
स्वैर रसस्वाद: भक्ती आजगावकर
स्वैर रसस्वाद ... भारी (जड जड!)
ReplyDeleteahem... i was missing that Jad Jad :)
ReplyDeleteनेणत्या शब्दांची सलगी होण्यास वेळ लागत नाही.. ग्रेसांच्या कवितेचा शोध घेताना अवचितपणे तुह्या या ब्लॉगवरच्या पोस्टवर आलो. ग्रेसांच्या कवितेअगोदर तू दिलेली छोटीशी प्रस्तावना फार आवडली. मोजक्या शब्दांत थेट अर्थ पोहोचवणं अगदी सगळ्यांनाच जमतं असं नाही. तुला ते सहज जमलंय, हे प्रांजळपणे सांगावसं वाटलं म्हणूनच लिहीत आहे.
ReplyDeleteमनापासून लिहिणारे आवडतात. लिहीत राहावे, वाचत राहीनच.