Thursday, July 14, 2011

नियती

..
थरथरत्या हाताने ठेऊन आलेले ते पाकीट...
चोर नजरेने पुन्हा एकदा वळून पाहताना अपराधीपणाचा परत एकदा वार अंगप्रत्यंगावर  ,,,
परत परत मनाची चलबिचल होत असतानासुद्धा डोळ्यासमोर आलेले भुकेले चेहरे आपल्याच मुलांचे... त्यांची फाटकी दप्तरे अन फुटलेल्या पाट्या...
यात त्यांचे सारे बालपण करपून चालल्याची एक धारदार जाणीव...

आपल्या कोणत्याच प्रयत्नांना यश नको पण निदान पोटा पुरता पसा??? तो हि नाकारत चाललीय हि नियती...का... ???
अन मग आता हे काम... हा सूड स्वत:वर... दुनियेवर कि नियतीवर... नक्की कोणावर..???

अन कसले हे काम... काय असेल त्या पाकिटात... वाईटसाईट काही काम तर नसेल.. काय करून घेतील... पण भुकेल्या मुखी दोन घास देणारे काम... वाईट कसे असेल ...मनाचा हिय्या करून विचारावे तरी फक्त ओरडा बसला... नको त्या गोष्टीत नाक न खुपसण्याचा ..

निदान एका गोष्टीचे सुख आहे .. घरापासून दूर आलोय ... ठिकाण हि नवीन आहे... ओळखीचे नाही ..      
पण काय होईल त्या पाकिटाचे .... हा प्रश्न अधुराच राहील ...

पुरे... सध्या जेवण घेऊन घरी जावे आधी ... त्याशिवाय पोटाची न मनाची भूक भागणार नाही...

.....
.....
.....

हे काय... बायको एकटीच घरात ... मुलं कुठेयत ...
"वस्तीतल्या ताईने मुलांना फिरायला नेलेय... का.. कुठे...??
परत कधी येणार ?? ... हे काय..मी खाऊ आणलाय न.... उघडला पण नाहीये अजून... कधी याल रे बाळानो... निदान आज तुम्हाला पोट भर जेवताना पाहू दे...

कधी याल.. किती उशीर...??
अन हे काय... हे वस्तीवाले.. सगळेच का एकत्र... काय हा कोलाहल..  काय झालेय काय...?

देवा... ताई अन मुलं कुठेयत ... कुठे गेली होती नेमकी ...

अरे देवा... हातातला खाऊ ... माझी मुलं ...
हे सारं जग माझ्या भोवती का फिरतंय... !!!!

- भक्ती आजगावकर


आज मुंबई बॉम्बस्फोटाच्या मिषाने... त्यात बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली... अन त्यातल्याच एका विचाराचे हे तरंग...  
आज पहिल्यांदा.. लिहिताना आनंद होत नाहीये... :(

2 comments: