Thursday, November 7, 2013

दिवे लागले रे !!!


दिवाळी ... दिव्याच्या ओळी...
अगदी अगदी समजू लागल्यापासून भुरळ घालणारा ... मोहवणारा ... नुकतीच येऊ येऊ म्हणणारी गुलाबी थंडी आणि त्यात येणारा हा दृष्ट लागण्याजोगा सण...
रोषणाई... उल्हास... लगबग.. सान-थोरांपासून सगळ्यांनाच स्वत:च्या उन्मेशात सामाऊन घेणारा...
आठवडाभर खपून बनवलेला दिवाळीचा फराळ..

भल्या पहाटे उठवून अर्ध्या उघड्या डोळ्यातली झोप उडतेय न उडतेय तोवर नारळाच्या दुधाने केसांना केलेले मालिश आणि सुगंधित उटण्याने चोळून घातलेली अंघोळ....
नव्या कोरया वस्त्रांची मोडलेली घडी...


अंगणभर पणत्या...वाऱ्यासंगे डौलाने झिरमिळ्या मिरवणारा मोठ्ठा आकाशकंदील.. ठिपक्या ठिपक्यांनी जोडत अंगणभर उमललेली रंगांची पखरण... रांगोळी... 
विविध दिवाळी अंकामधली शब्दांची/ रेषांची आतिषबाजी ...
सगळेच आपण अगदी बालपणात पोहोचतो अलगद...
दिवाळी आधीची साफसफाई... रंगरंगोटी...
स्वयंपाकघरात लुडबुड करत केलेली मदत ... करण्यातली अन चव घेण्यातली देखील.. 
कंदील कसा करावा यांच्या खलबतांची आणि रात्रीचा दिवस करत तो साकार करण्याची
किल्ले करणे... दिवाळीच्या कपड्याची आणि सोबत बाकी अलंकारांची जमवाजमव ...
किती आणि फटाके मागायचे आणि मग ते कुणी कुणी मिळून वाजवायचे यांचे प्लान्स ...
भाऊबीजेला कोण आधी ओवाळणार....आणि कुणाला काय भेटवस्तू मिळणार याचे आडाखे ..

वर्षानुवर्ष अलगद टप्प्या टप्प्याने मोठे होऊन जातो आपण...
सगळ्या गडबडीत मधेच केलेली लुडबुड, कधी मदत करता करता ....
एक दिवस असाही येतो... कि मग आताच्या धावपळीत... असंख्य कामाच्या चढाओढीत, हाती असलेल्या वेळेत डोक्यातल्या कल्पना आणि हातातल्या कामाची सांगड घालत कुठेतरी तेच जुने दिवस साकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करून पाहावा हि उर्मी देखील हाच सण घेऊन येतो...
मग ते एका दिवसात तीन तीन पदार्थ हातावेगळे करणे असो... की धावत पळत इंटरनेटवर कंदील शोधत, पिताश्री आणि बहिणीला मदतीला घेऊन तो करून पाहणे असो...

किंवा मग ठिपक्या ठिपक्या पलीकडे कधीतरी गेरूने रंगवलेल्या चौकोनावर प्राणसखा कृष्ण साकारणे असो....
असो...

दिवाळीची धामधूम संपली देखील... पण दिवाळीच्या शुभेच्छा जुन्या होत नाहीत न....
माझा कंदील अजून त्याच जोमाने लहरतोय... दारापुढे बहिणाबाई आणि मी मिळून घातलेली रांगोळी चमकतेय आणि फराळाच्या पदार्थांनी अजून डब्यांचा तळ गाठला नाही तोवर...

या दिवाळीच्या उर्मीच्या शुभेच्छा तुमच्यासाठीही ...
"तुम्हा सर्वांना हि दिवाळी आणि विक्रम संवत्सरी नवीन वर्ष सुख समाधानाचे समृद्धीचे आणि अपार आनंदाचे जावो... तुमच्या सारया मनोकामना पुरया होवोत" या सदिच्छा सोबत... शुभम भवतु !!!!

Happy Diwali!!!

- भक्ति आजगांवकर 

5 comments:

 1. भक्ती खूप छान लिहितेस. तुला आणि सर्व घरातील मंडळींना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

  ReplyDelete
 2. :).
  तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्रिया !!

  ReplyDelete
 3. छान आहे! शुभेच्छा तुम्हा सर्वांना पण
  फोटो काढावेत तर तुम्हीच!

  ReplyDelete
  Replies
  1. :)

   धन्यवाद
   तुमची दिवाळी सुखाची असेलच वर्ष ही सुखाचे जाओ !!!

   Delete
 4. खूप छान लिहिलंय, मस्तच. अजून लिहा, वाचायला आवडेल. माझ्या स्वतःच्या कविता व गझलसाठीही मला ब्लॉग सुरु करावासा वाटतो, तुमच्यासारखे ब्लॉग बघितले की ,पण मुहूर्त मिळत नाहीय. त्यातून इथे वाचणारे जरा कमीच. पण तुम्ही लिहित राहा. चांगले लिहिताय.

  ReplyDelete