Thursday, November 7, 2013

दिवे लागले रे !!!


दिवाळी ... दिव्याच्या ओळी...
अगदी अगदी समजू लागल्यापासून भुरळ घालणारा ... मोहवणारा ... नुकतीच येऊ येऊ म्हणणारी गुलाबी थंडी आणि त्यात येणारा हा दृष्ट लागण्याजोगा सण...
रोषणाई... उल्हास... लगबग.. सान-थोरांपासून सगळ्यांनाच स्वत:च्या उन्मेशात सामाऊन घेणारा...
आठवडाभर खपून बनवलेला दिवाळीचा फराळ..

भल्या पहाटे उठवून अर्ध्या उघड्या डोळ्यातली झोप उडतेय न उडतेय तोवर नारळाच्या दुधाने केसांना केलेले मालिश आणि सुगंधित उटण्याने चोळून घातलेली अंघोळ....
नव्या कोरया वस्त्रांची मोडलेली घडी...


अंगणभर पणत्या...वाऱ्यासंगे डौलाने झिरमिळ्या मिरवणारा मोठ्ठा आकाशकंदील.. ठिपक्या ठिपक्यांनी जोडत अंगणभर उमललेली रंगांची पखरण... रांगोळी... 
विविध दिवाळी अंकामधली शब्दांची/ रेषांची आतिषबाजी ...
सगळेच आपण अगदी बालपणात पोहोचतो अलगद...
दिवाळी आधीची साफसफाई... रंगरंगोटी...
स्वयंपाकघरात लुडबुड करत केलेली मदत ... करण्यातली अन चव घेण्यातली देखील.. 
कंदील कसा करावा यांच्या खलबतांची आणि रात्रीचा दिवस करत तो साकार करण्याची
किल्ले करणे... दिवाळीच्या कपड्याची आणि सोबत बाकी अलंकारांची जमवाजमव ...
किती आणि फटाके मागायचे आणि मग ते कुणी कुणी मिळून वाजवायचे यांचे प्लान्स ...
भाऊबीजेला कोण आधी ओवाळणार....आणि कुणाला काय भेटवस्तू मिळणार याचे आडाखे ..

वर्षानुवर्ष अलगद टप्प्या टप्प्याने मोठे होऊन जातो आपण...
सगळ्या गडबडीत मधेच केलेली लुडबुड, कधी मदत करता करता ....
एक दिवस असाही येतो... कि मग आताच्या धावपळीत... असंख्य कामाच्या चढाओढीत, हाती असलेल्या वेळेत डोक्यातल्या कल्पना आणि हातातल्या कामाची सांगड घालत कुठेतरी तेच जुने दिवस साकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करून पाहावा हि उर्मी देखील हाच सण घेऊन येतो...
मग ते एका दिवसात तीन तीन पदार्थ हातावेगळे करणे असो... की धावत पळत इंटरनेटवर कंदील शोधत, पिताश्री आणि बहिणीला मदतीला घेऊन तो करून पाहणे असो...

किंवा मग ठिपक्या ठिपक्या पलीकडे कधीतरी गेरूने रंगवलेल्या चौकोनावर प्राणसखा कृष्ण साकारणे असो....
असो...

दिवाळीची धामधूम संपली देखील... पण दिवाळीच्या शुभेच्छा जुन्या होत नाहीत न....
माझा कंदील अजून त्याच जोमाने लहरतोय... दारापुढे बहिणाबाई आणि मी मिळून घातलेली रांगोळी चमकतेय आणि फराळाच्या पदार्थांनी अजून डब्यांचा तळ गाठला नाही तोवर...

या दिवाळीच्या उर्मीच्या शुभेच्छा तुमच्यासाठीही ...
"तुम्हा सर्वांना हि दिवाळी आणि विक्रम संवत्सरी नवीन वर्ष सुख समाधानाचे समृद्धीचे आणि अपार आनंदाचे जावो... तुमच्या सारया मनोकामना पुरया होवोत" या सदिच्छा सोबत... शुभम भवतु !!!!

Happy Diwali!!!

- भक्ति आजगांवकर 

Tuesday, March 26, 2013

कुणा एकीने जमवलेली श्रद्धांजली ..


तो गेला...
एक वर्ष होतेय आज ...

तरी तो गेला तेव्हा थांबला नाही सूर्य
चंद्रानेही ढाळले नाही अश्रू रक्ताचे …
क्षणार्धात वीज नाही कोसळली ... फुलांनी टाकल्या नाहीत माना …
आवेगाने पृथ्वीची चाल नाही बदलली …

आत आत खोल वाटले होते तसे, थांबले नाही श्वास माझे …
तुझ्या जाण्याच्या कल्पनेनेच जशी थिजले होते … तशी कोसळले नाहीच मी ..

साऱ्या जगण्याची मदार तुझ्यावर असल्यागत आयुष्य धावून सुद्धा आले 
नाही अंगावर…

चालू राहिले तसेच दिवस रात्रीचे चक्र ...
अर्ध्य दिल्यागत सुखदु:खांचे कणकण झिरपणे चालूच आहे जगण्यात ..
ऊन सावलीचे अपरंपार प्रेम अजून सजवतेच आहे चंद्रफुलाची नक्षी..
एक फांदी मोडली तरी नवीन झाड नव्या फांदीची आस सोडली नाहीये पक्ष्यांनी ..

पण मग...
आत कुठेतरी ती व्याकूळ संध्या अजून जागी आहे..
सन्यस्त सुखांच्या काठी वळवाचा पाऊस भिजवतो आहे विदेही मनाला ..
कितीही अडगळीत लपण्याचा प्रयत्न केला तरी....
गर्द वनराईचा हलके हलके दाटून येणारा अंधार अजून बुडवतोच आहे..

आता कळले ...
सृजनाच्या पैलतीरावर जोडलेली आकाशाची नाळ झाला होतास तू..
अनावर कालिंदीतटाच्या राधेचा असीम शृंगार ..
आणि, 

तुझ्या जाण्याने माझा कृष्ण माझा सखा हरपलाय  !!!

- भक्ति आजगांवकर

वाचनीय अजून काही...

कविता
कविता माझी ... !!
नीलमयी!!

Thursday, March 21, 2013

फुलाचे मनोगत

पावसात भिजलेले तन मन माझे
उगीचच रुसण्याचे बहाणे हे तुझे
क्षणार्धात विरतील दुराव्याचे ढग
एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...


वारा कसा वेडापिसा फिरे भवताली
नकळत आज अशी सांज ओली झाली
एकाकी का वाटे तिथे पावसाळी नभ
एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...


अंगांवर दाटे अशी थेंब थेंब नक्षी
ओली पिसे झटकुनी गाती किती पक्षी
नाव तुझे घेउनिया पुकारते जग
एकदाच परतुनी माझ्याकडे बघ ...


सुगंध या उरातील सांगते स्मरून
गळतील पाकळ्या या एकेक करून
मातीपाशी जीवनाचे निर्माल्य सुभग
तेव्हातरी एकदाच माझ्याकडे बघ ...!!!


- भक्ती आजगावकरFriday, March 8, 2013

पदर ...


पदर ...
नक्षीदार पदर ...
रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा
वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला...
सौभाग्याचे लेणे होऊन आदरार्थी डोक्यावरून दुसरया खांद्यावर रुळलेला ..
आपल्याच जीवाच्या गोळ्याला पाजताना कधी अलगद मायेची पाखर झालेला..

अश्या पदराचे किती पदर येऊन चिकटलेले बाईपणाला
देवीपणाची झूल पांघरून पुतळा करून ठेवणारा ...
कधी गर्भातच नशिबाची रेघ पुसणारा ...
उंबरठ्याआड चेहरा लपवत जगणारा ..
जातायेता कधी कुत्सित नजरांनी थेट पदराच्याही पलीकडे स्पर्श करू पाहणारा ..
नाहीतर मग त्याच हातानी पदर फेडून स्त्रीत्वाचा मानभंग करणारा ...

ह्या अश्या निर्वस्त्र देहाकडे उठलेल्या तुझ्या नजरेला कधी हे कळलेच नाही की,
दोन चार शारीरिक भिन्नत्व ... काही हार्मोन्सचा फरक .. या पलीकडे तुझ्या आणि माझ्या देहात काडीमात्र फरक नाही...
सांगाडा, देह, रूप, रंग अश्या वरवरच्या गोष्टींपलीकडे ..
एक मेंदू, एक हृदय, एक मन... तुलाही आहे... मलाही ...
जाणीवा, अस्मिता, स्वप्न आशा.. या सारयांची गोळाबेरीज करून जे जगणे होते.. तेही तुझ्याच सारखे...
घर अंगण कुटुंब गोतावळा... त्यातही तसूभर फरक नाही... नव्हताच..
मग हे अवडंबर कशाचे...
आदिम काळापासून जेव्हा त्या पदराचे अस्तित्वच नव्हते...
त्याही काळी तू होतास...अन मी ही होतेच ...
कदाचित त्याच काळात परस्पर सन्मानाचे युग असावे..
शारीर जाणिवांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती.. एक माणूस म्हणून जगण्याचे भान असावे ... असावे का? 


आता या क्षणाला... या युगात ..
अश्या विविध अर्थी पदराचे कितीसे पापुद्रे अजून ओरबाडावे लागतील..
किती देहांना अजून विदेही व्हावे लागेल...
की मग या समाजपुरुषाला जाग येईल... कधी ?? 


कधी, तू आणि मी मधले हे बाईपणाचे अंतर मिटेल ..
दुय्यम असल्याची... "भोग्य" अशी वस्तू झाल्याची जाणीव मिटेल ..
एक माणूस म्हणून लिंगनिरपेक्ष जगण्याची अपेक्षा करता येईल...
कधीतरी येईलच ...
त्यावेळी हा असा "एखादा"च दिवस विशेष करावा लागणार नाही...

जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा ३६५ दिवसांसाठी ...

- भक्ती आजगांवकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार