Tuesday, October 9, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5


दिवस पाचवा..


हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत ..
पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेची..


साजिरया मुर्त्या अन पूजेचे सामान, उपासाची शहाळी, फळे यांच्या खरेदीची लगबग...
आणि त्या बरोबर खरेदी कोकणातल्या खासमखास गणपतीच्या माटी (माटवी)ची ..
गर्दीने फुललेल्या बाजारात सर्वत्र साम्राज्य या माटीच्या सामानाचा...

न पाडता उतरवलेले नारळ, मुळासकट असलेले हळदीचे रोप, लाल माठाचे मूळ, तेरड्याचे रोप, विड्याची पाने, सोललेल्या सुपारया यांच्या सोबत हिरव्या-भगव्या सालासकट सुपारया, कमळाची नाजूक फुले, विविध प्रकारची रानफुले, केळी, काकड्या, चिकू यांच्या सोबत फुल-पत्री-फळे-शहाळी यांची बाजारात रेलचेल असते.. सोबत हरिणीची नाजूक फुले..   
जड पिशव्यांनी अन माटीच्या सजावटीच्या चर्चा करत घरी येतो दिवस...

घरातल्या पुरुष माणसांची जेवणं आटपली की मग दिवस सुरु करतो हरतालिकेच्या पूजेची तयारी ...
सकाळपासूनचा निर्जळी उपास .. 
घराभोवतालची पाच तऱ्हेची पत्री जमा करणे.. पूजेच्या जागेवर नवीन सारवण, सुबकशी रांगोळी अन मग.. पाटावर महादेवाची पिंडी, हरतालिकेच्या सुंदर मूर्त्याची मांडणी, त्यांची हळद कुंकू, महादेवाचे कापसाचे पांढरे अन देवींच्या हळद कुंकवाने रंगलेल्या वस्त्रांनी, फुल-पत्रीनी, दुधाच्या नैवेद्याने यथासांग पूजा झाली कि मग उतरत्या उन्हाच्या साक्षीने उपासाची शहाळी आणि केळ्याचे थोडे खाणे ... 
अन मग पुन्हा दिवस रमतो तो भिंतीवरच्या चित्राला फाईन टच द्यायचा .. 

माटीच्या तयारीचा ... आंब्याचे टहाळे आणून धुवून पुसून लहान मोठे वर्गीकरण करून ठेवायचा..
केळीच्या सोपाचे धागे काढून त्याने मग या सारया वस्तू माटीला बांधायचा मोठा कार्यक्रम पार पाडतो हा दिवस....
पण अजून संपत नाही हा दिवस...
खरेतर संध्याकाळचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथे गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात येणारे गणेश .. 
उन्हे सरता सरता हाक येते ती मूर्तीशाळेत जायची... वाडीतले सारे गणपती हे एकमेकांच्या सोबतीने एकत्रच येतात घरी मुर्तीशाळेतून...
नागपंचमीच्या सुमारास गणपतीचा आसनाचा पाट न्हेऊन दिला जातो पारंपारिक मूर्तीशाळेत.. मूर्तीची रचना, आकार, रंगसंगती सारे मूर्तिकार स्वत: ठरवतो... परंपरेनुसार, रूढीनुसार वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा...अजून ही तशीच... अजून गणपतीचे सुपर मार्केट उघडले नाहीयेत इथे ..


विड्याची पाने, सुपारी, गणपतीचे रेशमी वस्त्र या तयारीनिशी मग मूर्तीशाळेत अवतरतो दिवस...  सुंदर सुंदर मूर्त्यांच्या रांगांतून, विविध रूपातल्या गणेशमूर्ती हारीने मांडून ठेवलेल्या असतात ..  आपापल्या पाटावर स्थानापन्न .. नवी वस्त्रे नवे रंग मिरवीत.. कुठे मोर, कुठे उंदीर, कुठे नंदी तर कुठे आपल्या सिंहासनावर आरूढ.. कधी मोरपिसाच्या कोंदणात, कधी जास्वंदफुलाच्या मखरात ..  स्नेहाळ डोळ्यांनी जग पाहत आपल्या आगमनाची वर्दी तृतीयेलाच धाडतात ...अन मग तो दिवस, विडा, सुपारी पाटावर ठेवत, रेशमीवस्त्राने गणेश मूर्ती आच्छादत घरी घेऊन येतो... अन नव्या नवलाईच्या मूर्तीचे जवळून निरीक्षण अन कौतुक करत संध्याकाळ निवते..
मग दिवस लांबवतो स्वत:चे तास...  बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी...
तांदळाच्या आसनावर गणपतीचा नारळ, तश्याच आसनावर महादेवाचा नारळ आणि हळदीचे, माठाचे मूळ, तेरडा, कांगला(गौरीचे हात म्हणून ज्याची फुले ओळखली जातात) वगैरे सारे रोप-पत्री एकत्र करून त्यावर फोटो बांधून, मंगळसुत्रासोबत उभी करायची गौर... 


समोर समया, लामणदिवा, तुपाचे निरांजन, आरतीचे ताम्हण, धुपारती, उदबत्तीचे झाड असे सारेच आप आपल्या जागी जाऊन आलबेल बसते..

देवांना वस्त्र, समयांना वाती, हळद कुंकू अबीर गुलाल, गंध, फुले, दुर्वा, बेल, तुळशी, हार.. फळांचा नैवेद्य.. सकाळच्या ताज्या नैवेदयाची काही तयारी.... अश्यात कधी घड्याळाचे काटे धावत राहतात त्या दिवसाला हि कळत नाही..
दमला भागला दिवस अंथरुणावर पडतो तो देखील उद्या पहाटे लौकर उगवायचे हे मनाशी ठरवूनच... 


- भक्ती आजगांवकर 

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४

9 comments:

 1. सुंदर वर्णन..आणि ह्या भागात तू जी छायाचित्र दिली आहेस ती खूपच आवडली..रंगीत आणि बोलकी..

  ReplyDelete
  Replies
  1. :)
   धन्यवाद श्रिया..
   क्षीणसा प्रयत्न ग कोकण अन तिथला गणेशोत्सव शब्दात पकडण्याचा..
   अन छायाचित्रे रंगीत असणारच न.. कोकण किती विविधरंगी आहे .. :)

   Delete
 2. आता पुढल्या भागात आरतीला हे आलोच!
  छान वाटतीये ओळख कोनकोनातल्या गणेश उत्सवाची!

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
  2. पुढल्या भागात नक्की आरती अभिषेक..
   मी फक्त आशा करू शकते की या शब्दातून कोकणातल्या गणपतीचा त्या माहोलाचा एक शतांश भाग तरी दिसेल.. :)

   Delete
 3. Aajvar maati sajalelich pahili hoti...bt tyatalya sarv vastunchi itki mahiti navhati..mast vatal vachun...n sarv pics tar aprateem!

  ReplyDelete
 4. धन्यवाद चंद्रलेखा... :)
  हो माटीचे सामान किती वेगवेगळे..रंगीबेरंगी.. माटी सजवणे हा पण एक मस्त भाग आहे सगळ्या सोहळ्याचा .. तू पण अनुभवले असशीलच..

  ReplyDelete
 5. गणेश विसर्जनावेळी "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या"चा गजर तू खरा करून दाखवला आहेस. तुझ्या ब्लॉगवर महिनाभराच्या आत पुन्हा गणेशोत्सव अनुभवतोय. सणाचे सगळे वातावरण आणि ते देखील फोटोसाहित. अगदी प्रत्येक क्षण तू जिवंत केला आहेस. हळवं व्हायला झाले आहे. Hats Off!!!

  ReplyDelete

 6. धन्यवाद सिद्धार्थ .. अन ब्लॉगवर स्वागत .. !!
  अन कोकणातला गणेशोत्सव हा सोबत असतोच न वर्षभर.. चाकरमानी मुंबईत कितीही रमत असला तरी या लाल मातीची ओढ मनात असतेच
  आणि ह्या पोस्ट्स म्हणजे निमित्त आहेत ती ओढ शब्दबद्ध करण्याची...

  ReplyDelete