दिवस सहावा...
अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच...
मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आता अजूनच पूर्ण वाटते...
गणपतीच्या आसपास सारवणाचा एक हात नव्याने अन मग सुरेखशी रांगोळी उमटते आसनाभोवती, आजूबाजूला अन उंबरठ्यावर... घरासमोर ..
"उठी उठी गोपाला" अशी आर्जवी सूर आसमंतात घुमत कानात रुंजी घालतात...
रंगीबेरंगी फुले सकाळीच उमलून येतात .. बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी..
समया आपल्या वाती तेजस उजळतात .. लामणदिवे स्निग्ध प्रकाशाने मूर्तीला न्हाऊ घालतात ... उदबत्यांचा मधुर सुवास मंद मंद पिंगा घालतो...
आन्हिकं अन तयारी आटपून नव्या कपड्यानिशी सारेच तयार गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी ..
त्याआधी हरतालीकेला दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग उत्तरपूजा केली जाते... अन समोरच्या तळ्यात विसर्जन ....
मग गुरुजी येऊन यथासांग पूजा सांगून मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करतात ..
मंत्रोच्चारणाने गणपतीची खोली भारून जाते... टाळ अन टाळ्यांच्या संगतीने प्रथमेशाची आरती सुरु होते ...
इथे स्वयंपाकघरात नैवेद्याच्या जेवणाची लगबग कधीची सुरु झालेली असते ..
पाच प्रकारच्या भाज्या, गोडे वरण, सुगंधी भाताच्या मुदी, घरी कढवलेले तूप, वर तुळशीचे पान अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदक...
नारळाचे खोबरे, गुळ, वेलची, जायफळ याने सिद्ध सारण अन तांदळाच्या पीठाची शुभ्र उकड...
या दोन्हीचे मन लाऊन बनवलेले सुबक मोदक .. मोद देणारे... गणपतीचे खास आवडते... पारीच्या नीटस पाकळ्या काढून अन हलक्या हाताने त्या पाकळ्या वर जोडून सुंदर मोदक करणे हे आता आजच्या पिढीकडे पण पोहोचलेले..
नैवेद्याची पाच खाशी केळीची पाने मांडून, गणेशाचे २१ मोदकांचे अन त्या सोबतच उंदीर मामांचे, गायीचे पान मांडून रीतसर आचमन करून नैवेद्य दाखवला जातो... अन दिवस मग पंगतीला बसतो ..वाफाळत्या मोदकाच्या शेंडीला जरा हलवून धारेला जागा करत सारणावर साजूक तूप अलगद बसते... अन आग्रह करकरून पानात वाढले जाते...
आरतीच्या सुरेल आवाजावर, गणपतीच्या आसपास वावरत, आल्यागेल्याना प्रसाद वाटत रेंगाळत राहतो हा दिवस...
समयीचे तेल पाहत, नवीन उदबत्या लावत, मूर्तीकडे डोळे भरून पाहत वेळ कसा सरतो तेही कळत नाही...
मूर्तींचे दागिने- भिकबाळी, चांदीच्या दुर्वांचा हार, लालचुटुक जास्वंदीचे फुल, नवीन आणलेल्या कंठ्या, हातातले गुळ भरलेले चांदीचे मोदक, संध्याकाळचे नवीन फुलांचे हार, दुर्वांच्या जुड्या विसावतात गणपतीच्या अंगाखांद्यावर .. मूर्ती अजून तेजस अजून राजस वाटत राहते.. आपली आपलीशी वाटत राहते...
अन मग दिवस वाट पाहतो ती सर्व घरात जाऊन पहिल्या दिवशी भजन करणाऱ्या मंडळींची... कान कानोसा घेत राहतात टाळ मृदुंगाच्या आवाजाचा... अन वाडीतील एकेक घरी गणपतीसमोर भजन करून भजनी मंडळी आपल्या घरी ठाकतात ... इतक्या सारया माणसांचे एका तालात एका सुरात भजन सुरु होते... टाळ मृदुंगाचा ठेका, टाळ्यांचा गजर आणि रंगणारया आरतीबरोबर आणि "घालीन लोटांगण वंदिन चरण" च्या टिपेला पोहोचणारया तालासोबत दिवस खुश होऊन जातो... भजनकरींना आग्रहाने आलेपाक वाटतो ... स्वत: वाडीतल्या बाकी घरात जाऊन भजनात सामील होतो...
संपूच नये असे वाटते का या दिवसाला..??? उत्सवी मंगल भावना घेऊन तृप्त असतो हा दिवस...
Mala agadi Ganapati la tujhya barobar tujhya ghari aalya sarakha watatay.......
ReplyDeleteधन्यवाद सुजाता.. :)
ReplyDeleteखरेच कधीतरी ये सोबत :)
अगदी अगदी... सगळं वर्णन कसं अगदी अचूक उतरलं आहे. मोदक तर लाजवाब :D
ReplyDeleteसिद्धार्थ ..
ReplyDeleteमोद देणारे ना :)
मूर्ती विलोभनीय! इथे चॉकलेट खातोय, तरी मोदकाने मोहविलेच, अस काही पहिल्यांदाच! आणि निव्वळ शब्दांतून भजनाच रोमांच अंगावर आलंय...
ReplyDeleteगणेशाची सारी रुपेच भारी मोहक ना...
ReplyDeleteमाझ्या बहिणीने कार्यशाळेत छोटासा गणपती बनवला .. पहिल्यांदा.. पण तो हि किती क्युट दिसतो...
आणि भजन, खेळे हे सर्व श्रवणीय आहेच.. आपलेच आहे.. आपण लक्ष दिले पाहिजे फक्त... अवघ्या दहा मिनिटाचे भजन होते ते घरी... पण सारा माहोल बदलून जातो घराचा... खूप खूप कौतुक केल्यासारखे वाटते आपल्या गणपतीचे..
अवांतर : आम्हाला पण चॉकलेट :P
वाह क्या बात है ...कोकणात एक चक्कर मारून आलो ..वाचता वाचता ...!!
ReplyDeleteजम्या !!!