Monday, October 1, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २


दिवस दुसरा...




मुक्कामाला पोहोचण्याचा...
श्वास भरून कोकणचा वारा पिऊन घेण्याचा ...
खाली वाकून लाल मातीला स्पर्श करून नाळ पुन्हा पुन्हा जोडून घेण्याचा...








नुसत्या लवलव पापणीने सभोवतालचा हिरवा गारवा अनुभवण्याचा ..
झिरमिर पाऊस आणि श्रावणाचे ओसरते ऊन दोन्हीचा मिलाफ समोरच्या डोंगररांगांवर झेलण्याचा..







घराच्या उंबरठ्यावर क्षण दोन क्षण हळवे होण्याचा..

गेल्या वर्षी दिलेल्या निरोपानंतर पुन्हा कौलारू घर डोळ्यात साठवून घेण्याचा...
सामान ठेवताक्षणी अंगण, पडवी, माजघर, मधलेघर, धान्याची खोली, स्वयंपाकघर, मागची खोली, मागचे अंगण, परसातली आंब्याची वाडी...सगळ्या-सगळ्याची एक प्रदक्षिणा करण्याचा..




दारातला भू-भू कुठे.. घरातल्या माऊ किती यांची गणना करण्याचा ...
शोधक नजरेने अंगणातले पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा ...
राघू, मैना,, टिटवी, कोकीळ, कोकिळा, हळद्या, शिंजीर, शिंपीण, खंड्या, कोतवाल यांच्या आवाजावरून फांद्यावर त्यांचा शोध घेण्याचा...



जुने घर किती आपले आपले तरी किती श्रांत-क्लांत दिसते ... शुभ्र पांढरया केसांच्या आजीने दरवाजात उभे राहून आपली वाट पहावी..  प्रेमाने कुशीत घ्यावे.. सुरकुतले हात चेहऱ्यावरून मायेने फिरवावे तसे.. हे अनुभवण्याचा ..


हाच दिवस...
मोठ मोठे रुमाल तोंडावर बांधून अरेबियन ललना होण्याचा...
सगळ्या खोल्या, भिंती, पार कौलापर्यंत साफ सफाईचा ..
माजघर, मधली गणपतीची खोली, पडवी नव्याने रंगवण्याचा ..
सारे सामान सारया जागा धुवून पुसून लख्ख करण्याचा ..
मागील वर्षाची सुट्टी संपता संपता झालेली चूल पेटवण्याची सवय, अजून ताजी आहे का ते जोखण्याचा... विहिरीचे पाणी शेंदता येतेय का ते आजमावण्याचा...
अन दमून भागून उभा दिवस काळोखात आडवा होण्याचा...











- भक्ती आजगांवकर

12 comments:

  1. फोटो मस्त!मला तर गोवा आठवलं.

    ReplyDelete
  2. अल्मोस्ट गोंये काका...वेंगुर्ल्याचे आहेत न ते (फोटो आणि मी पण) .. :)
    ब्लॉगवर स्वागत अन आभार...
    अजून ५-६ भागात येतोय वेंगुर्ला अन तिथला घराचा गणपती भेटीला...
    वाचून अवश्य कळवा कसे वाटले...

    ReplyDelete
  3. मी हरवूनच गेले होते ग.........अशीच,गणपतीला गेले होते कोकणातल्या गावात...हे वर्णन तुझे वाचून परत जावेसे वाटले.
    येत्या वर्षी अगदी नक्की जमवणार..गावातले जुने घर आपल्या जाण्याने किती खुलत असेल! आणि धावपळीच्या आपल्या जगापासून थेट इथपर्यंतचा आपला प्रवास...गरजेचाच आहे ग..
    भक्ती सगळे फोटो खूप आवडले..हिरवेगार आणि सुंदर कोकण!

    ReplyDelete
  4. :)

    श्रिया... हो घर तर आनंदतेच... अन आपण पण पुन्हा नव्याने री-चार्ज होऊन येतो... :)
    नक्की जमवच आता..

    ReplyDelete
  5. बालपण सोडून 'शिकले', 'सवरले', 'शहाण', 'मोठे', 'समजूतदार'-पणाचा चा जो एक बुरखा ओढलेला असतो ना माणसाने, त्या मागे हा असाच एक मी लपलेला असतो ...

    ReplyDelete
  6. खूप सुंदर ....आहेच आपल कोंकण ......हिरवेगार आणि सुंदर जबरदस्त!!!!!!!!!
    .....

    ReplyDelete
  7. :)
    असाच मी शोधण्याचा एक प्रयत्न अभिषेक...

    ReplyDelete
  8. :)

    खरेय सुदर्शन..
    ब्लॉग वर स्वागत...

    ReplyDelete
  9. छान आहेत सगळेच फ़ोटो (गणपतीतले) आणि लिहिलंय पण मस्तच :)

    ReplyDelete
  10. धन्यवाद अपर्णा...
    अन ब्लॉग वर मनापासून स्वागत ..!!

    ReplyDelete
  11. helloo..bhakti mavshi..
    sagle photos ani likhan khupch khupch mast ahe...vatchana agdi me te swatha anubhavtey asach vatat ahe..!! :D
    & photos tar match ahet.:)

    ReplyDelete
    Replies
    1. तनया.. :)
      तुम्ही पण मजा करता न परेलला गणपतीत .. :)

      Delete