Wednesday, October 3, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३

दिवस तिसरा


हा दिवस शुभ्र सकाळचा...

किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा...

सकाळी सकाळी अंगणात घातलेल्या सड्याचा ... अन उंबरठ्यावर रांगोळीच्या सुबक ओळींचा..

देव्हारयातल्या गणोबाला-बाळकृष्णाला न्हाऊ माखू घालण्याचा... अन शांत सुंदर वातीच्या निरांजनाचा..हवेत अलवार विरणारया उदबत्तीच्या वलयांचा ...


घरासभोवतालच्या जास्वंदी, चाफा, शंकासूर, मोगरा, सोनटक्का आणि अश्याच वेगवेगळ्या फुलांचा ...


अंगणातल्या झाडावर गिरक्या मारणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांचा ...
ऐटीत फिरणाऱ्या चतुरांचा ..
शोधक नजरेने टिपलेल्या फुलपाखरी अळ्यांचा, सुरवंटाचा, अन कुसुर्ड्याचा पण ..

जरा अंगण उतरून समोरच्या तळ्यावर मारलेल्या फेर फटक्याचा ...


दाडोबाचे तळे किती भरलेय...मागच्या वर्षीच्या खंड्याची जोडी अजून तिथेच आहे का हे शोधण्याचा...वेड्या राघुंच्या कमानदार भराऱ्या पाहण्याचा.. मागच्या माडांवर पोपटांचा थवा किती कलकलाट करतो ते ऐकण्याचा..

तळ्यातले मासे अजूनही त्याच लडिवाळपणे पायाभोवती जमतात का हे पाहण्याचा...


तळ्यामागच्या शेतातली सापाची जोडी अजून आहे का, बेडूक अजून फुगलाय का हे जाणण्याचा ..
सकाळ सकाळी वाफाळत्या चहाचा...
आणि थोडक्याच वेळात चुलीवर रटरटणाऱ्या भाताच्या पेजेचा ..
तोंडाला पाणी सुटेल अश्या लोणच्याच्या मोठ्या फोडीचा ..

हाच दिवस... वेंगुर्ल्याचा बाजारात जायला तयार होण्याचा...
सारया सामानाची यादी करण्याचा... अन यादीत कोकण स्पेशल भाज्या लिहिण्याचा ..
सगळ्या भावंडाच्या बाजार मोहिमेचा..

पण अर्ध्या रस्त्यात (वेंगुर्ल्याचा वर्ल्ड फेमस) नानाच्या भज्यांचा आस्वाद घेण्याचा ..मग मजल दरमजल करत पायी पायी बाजारात जाण्याचा ..


अन मग कोकण स्पेशल भाज्या, वस्तू आणि गणपतीच्या आगमनासाठी सुसज्ज झालेल्या मंडईचा ..

वाली, कच्ची केळी, दोडका, भेंडी, केळफुले, पडवळ, कारले, भोपळ्याचा खापा, चवळीच्या पानांचे वाटे, लाल माठ, अळू
शहाळी, नारळ, फणस, पपनस, वेलची केळी, कमळ, तेरडा, जास्वंद, चाफा, चमेलीचे गजरे, अबोलीचे वळेसर, कन्हेर, डेह्लीया, दुर्वा बेल, कोकम, कोकमतेल, सुपारी, चिंच, भात, कुळीथ, पोहे, काजू, खाजे अश्या सारया कोकण स्पेशल वस्तूंनी बहरलेल्या बाजाराचा...मग सारया मंडईतून आपल्या यादीतील वस्तू घेत फेरया मारण्याचा..
पण यात मासळी बाजार वर्ज्य बर का..
श्रावण - अधिक मास असे सोवळे महिने लांबले तरी मासळीबाजारात चुकूनही न जाण्याचा..
दिवस.. घरी परत येऊन पुन्हा एकदा घरात रमायचा..
उतरती उन्हे घराच्या कौलावरून सरकू लागली कि दाटून येणाऱ्या अंधारासोबत आठवणी झेलण्याचा...
याच घरा-दाराने माझ्या आजीला - पणजीला वावरताना पाहिले असेल...
माप ओलांडून घरात येताना... खळखळून कधी हसताना.. कधी गुपचूप अश्रू टिपताना..
या वस्तूंना, वास्तूला त्यांचा मायेचा स्पर्श झाला असेल ...
बाबा - काका - आत्या .. यांच्या जन्माच्या, वाढण्याच्या कितीतरी क्षणाच्या मूक साक्षीदार म्हणून या भिंती उभ्या असतील ... कितीक वेळा या सर्वाना वाढताना, धडपडताना, पडताना अन सावरताना हि पाहिले असेल... आजोबांच्या कामाच्या समाजकार्याच्या कहाण्यांनी हि कौले फुशारली असतील... या सारयाच अंगावर रोमांच उभे करणाऱ्या क्षणांचा ...

असा हा दिवस ... हलके हलके संध्याकाळच्या कातरवेळेत विरघळणारा  ....

- भक्ती आजगांवकर

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २ 

2 comments:

  1. चित्र सुंदर झाली आहेत... खंड्या ला लय लांबून टिपलाय!
    माशे अगदीच भारी! आणि चाफा न बोलता बराच दरवळणारा!

    ReplyDelete
  2. अहो.. स्वत: काढलेली चित्र आहेत... गोड मानून घ्या महाराजा... :)

    ReplyDelete