Thursday, October 4, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४

दिवस चौथा
हा दिवस तसा आरामाचा...
सुशेगात उठण्याचा...
कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. तळ्याच्या काठावर बसून शांतता अनुभवण्याचा..
फिश- थेरपी करून घेण्याचा.. 
बसल्या बसल्या मस्त पक्षीनिरीक्षणाचा ...
लांब टांगा टाकत चालणाऱ्या टिटवीचा... मनमोहक गिरक्या घेऊन पुन्हा आपल्या झाडावर येणाऱ्या वेड्या राघूंचा.. 
संथ तळ्यावर अवचित झेप घेऊन मासा पकडण्यात तरबेज खंड्याचा... जोडीजोडीने येऊन फुलातल्या मध पिणारया शिंजीरांचा ..

कुहूकुहू साद घालणाऱ्या कोकिळाचा .. आणि ठिपकेदार अंग मिरवत झाडावर कावळ्यांच्या घरट्याचा माग घेणाऱ्या कोकिळेचा..
तळ्यात अंघोळ करून नंतर उन्हात पंख चमकावणाऱ्या हळद्याचा .... आणि पुन्हा पुन्हा तळ्यात डुबक्या मारून मग झाडावर झगा फलकारत बसलेल्या पाणकोंबडीचा ...
दिसलेल्या एका घरट्याचा ...अन त्यात कोण राहून गेले असेल या कुतूहलाचा देखील..

चालता चालता खाली वाकून, थोडे झुकून पाहिलेल्या किड्या-कीटकांचा... नवनवीन रान-फुलांचा.. वेगवेगळ्या रंगाच्या ढंगांच्या फळांचा.. बियांचा.. पानांचा.. ...कोवळ्या उन्हात चमकणारे चतुरांचे पंख पाहण्याचा...
स्वयंपाकघरातून उठणाऱ्या हाकेचा..अन "आले ग" म्हणत पाय अजून जिथल्या तिथे रमण्याचा.. 
चूल पेटवताना झालेल्या पुरेवाटीचा .. वाटण घाटण - फोडण्या अश्या मदतीचा..अन स्वयंपाक घरात लुडबुड करता करता केळफुलातून गणपती साकारण्याचा..  

निवांत जेवण, शेजारयांची हालहवाल, खाली बागेतून आंब्याच्या झाडांची विचारपूस अश्या आळसावलेल्या क्षणांचा ..
आंब्याच्या झाडाला असलेल्या आवडत्या आडव्या फांदीवर विसावण्याचा...
लहानपणी घेतलेल्या झोक्यांची आणि तिथे बसून मारलेल्या खूप साऱ्या गप्पांची आठवण ताजी करण्याचा ..


अन मग गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु करण्याचा.. 

पूर्वापारच्या समया, लामणदिवा, निरांजन, तांब्या, ताम्हण, पळी-पंचपात्रे यांना कपाटातून काढून धुवून पुसून लख्ख करण्याचा ..
गणपतीच्या नैवेद्याचे लाडू पेढे बनवायचा... भजन मंडळींसाठी आलेपाक बनवून ठेवायचा...

 
तेव्हाच लगबग सुरु होते ती गणपतीच्या मागची भिंत रंगवण्याची.... कोणते चित्र... कशी चित्ररचना... रंग रंगोटी कशी...
मातीच्या भिंती असलेल्या कौलारू घरात, शेणाने सारवलेल्या जमिनीवर.. नव्या पिढीचे लॅपटॉप आणि त्यातल्या गुगलवर चित्राच्या शोधात जग धुंडाळण्याचा ..  

मग तो दिवस.. खलबते करून शेवटी एक चित्र निवडायचा... अन भिंतीवरच्या गेल्या वर्षीच्या चित्रावर जड अंत:करणाने पांढरया रंगाचा ब्रश फिरवायचा.. 

मग भिंतीचे मोजमाप.. त्यावरच्या खाणाखुणा... पहिल्या चाचपडत्या रेघा ...अन मग सरसर उतरत जाणारया चित्राचा तो दिवस ...
घरातल्या लहान मोठ्या प्रत्येकाचाच हात त्याला लागलेला...
कधी चित्र काढताना.. कधी रंगवताना.. कधी शेडींग करताना .. चेहरयावरचे प्रकाश सावलीचे खेळ दाखवताना ..
चित्रातले आसन.. दाग दागिने.. चित्राचे बाकीचे बारीक-सारीक तपशील भरताना.... घरातल्या सगळ्यांचा हात लागतो त्या भिंतीला ..  नव्या चित्राने झळाळतो मग हा दिवस .. 


- भक्ती आजगांवकर


दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३

8 comments:

 1. Replies
  1. धन्यवाद अन ब्लॉगवर स्वागत मंगेश ..!!

   Delete
 2. जुन्या चित्राला पांढर फासून, पुन्हा नवीन काढतांना काय अवस्था/विचार होते?

  ReplyDelete
  Replies
  1. एकीकडे दोन दिवस खपून काढलेल्या चित्राला तिलांजली..अन दुसरीकडे या वर्षीचे नवे चित्र मनासारखे उमटेल ना... किती सुंदर दिसेल याची उत्कंठा... अशी दुहेरी ओढ असते..
   पहिला ब्रश जेव्हा ओढला जातो चित्रावर तेव्हा कमालीचे वाईट वाटते हे खरे... पण नविन चित्र पूर्ण होते तेव्हाचा आनंद मात्र मात करतो त्या भावनेवर ...

   Delete
 3. दिसलेल्या एका घरट्याचा ..अन त्यात कोण राहून गेले असेल या कुतूहलाचा देखील..मस्त लिहीलयंत! माझ्या मनाने केव्हाच भूतकाळात......Thanks ! ब्लॉग सजवलायतही छान !

  ReplyDelete
 4. धन्यवाद संदीपजी...
  ब्लॉगवर स्वागत.. :)

  ReplyDelete
 5. मस्त! तो केळफुलाचा गणपती पण एकदम छान आहे हा!

  ReplyDelete
 6. :)
  स्वागत गौरी...
  १० मिनटात बनवलेला आहे तो केळफुलाचा गणपती.. सगळे पार्टस त्याचेच आहेत.. :)

  ReplyDelete