Tuesday, June 28, 2011

तुमचे सुद्धा होते का असेच...
एक दिवस असा छान उगवतो... 
ट्रेन मध्ये वाऱ्याची खिडकीऐसपैस जागा अन हातात आवडीचे पुस्तक...  
गाडीक्षण अन आपले विचार  .. सारेच एका दिशेत एका वेगात धावत असतात... 
समांतर .....
जाणीवच नसते आपल्याला..
आजूबाजूच्या कोलाहलाची.. गर्दीची...किती स्टेशन्स मागे गेले त्याची ..  
आपण मग्न असतो आपल्याच विश्वात ...


अन मग एक जादू होते... 
अचानक कुठूनसा मोगरयाचा वेडा सुवास भरून टाकतो आपले भवताल ... 
डझन दोन डझन गजरे घेऊन आलेली असते एक गजरे विकणारी बाई ... 
अन तिच्या हातात ते गजरे घमघमत असतात...


वेडावून टाकणारा ... जुन्या आठवणी जागा करणारा.. मोगरा... 
कधी देवाच्या पायाशी वाहिलेली मोजकी फुले.. कधीतरी आईच्या अंबाड्यावर माळलेला गजरा.. 
दिली-घेतलेली मोगऱ्याची अर्धोन्मीलित कळी... 
किती सुगंध मनात एकत्र जागवतो हा मोगरा... 
मनात आठवणीचे तरंग उठवत अल्लद पुढे जाणारा..  

मागचा पुढचा काही विचार  करता आपण विकत घेतो ते गजरे...
अन भरून घेतो अवघ्या श्वासात ... हुंगून घेतो भरभरून ... 
पुन:प्रत्ययाचा आनंद घेत... विसावतो त्या क्षणावर .. अलवार .. 

अन मग पुढच्याच वळणावर नवीन बाई ... हातात सोनचाफा दाखवत... 
आपण हसून दाखवतो तिला हातातले गजरे... अन हलकासा नकार... 
कळत नाही तेव्हा...त्या क्षणाला... की कसला जीवघेणा नकार दिला असतो आपण स्वतःलाच !!

बाई पुढे सरकते... डब्बाभर हिंडून त्या फुलांचा सौदा करते...  
अन आपला जीव वर खाली... पर्समधून नाणी काढून हातात खेळवत आपण नजर लावून असतो.. 
की कधी तिचे लक्ष जातेय... अन कधी मी चुकीची भरपाई करतेय ... 

पण असे व्हायचेच नसते.. 
तिचे काम संपवून ती विसावते एका कोपऱ्यात... आवराआवर करून निवांत वारा खाते... 
गळी फुले निमूट तिच्या पिशवीत आपला गंध आवरून सावरून बसतात... 

अन आपल्या हातातल्या नाण्यांना मग काडीची किंमत उरत नाही...
हिरमुसून परत जातात ते पर्स मध्ये.... 
ओंजळभर मोगऱ्याचे गजरे घेऊन सुद्धा सोनचाफा बाजी मारून गेलेला असतो... 
मनातला सल निवळता निवळत नाही...

असे का होते.. तुमचे सुद्धा होते का असेच... 

ता. : आपले स्टेशन येते... आपण उतरायला दरवाज्यापाशी जातो... 
तिथे एक वेडा अर्धामुर्धा सोनचाफा टाकून गेलेली असते  ती बाई... 
तिच्या लेखी त्याला भाव नसतो येणार .. पैश्यात... :)  
आपण उचलतो तो वेड्यासारखा ... तो अर्धामुर्धा चाफा अन पूर्ण वेडे आपण ... 
येतो घरी एकमेकांना साथ करत.... खुशीत...  :)


13 comments:

 1. होते कधी कधी
  जेव्हा चालता चालता अचानक तो सुगंध हळूच स्पर्शून जातो. :)

  सोनचाफा सहीच ! आपल्या गावच्या मारकेटमध्ये नेहमी बघायचो मी :)

  ReplyDelete
 2. सही.. शेवट तर मस्तच !

  ReplyDelete
 3. अगदी अचूक पकडलीऐस 'घालमेल'... मस्तच ...

  ReplyDelete
 4. एक म्हणजे एक नंबर.... "अन आपल्या हातातल्या नाण्यांना मग काडीची किंमत उरत नाही... हिरमुसून परत जातात ते पर्स मध्ये.".. जीवनच सत्य कधी कधी चुटकी मध्ये असत तर कधी कधी आभाळ भर मावत नाही ...तस वाटल वाचून ... हेरंब म्हणतो तसा शेवट तर मस्तच ... नाहीतरी आपली फिलोसोपी च आहे... जो पर्यंत शेवट गोड नाही तोपर्यंत तो शेवट नाही! काय!
  माणसाच्या आठवणी ह्या वासाशी जोडलेल्या असतात, अस काहीस संशोधन झालेलं आहे... म्हणूनच अभ्यासाची जागा सुगंधित असावी अस म्हणतात ते ... का वेड लावी जीवा हा मोहक गंध! का?का?का?! :)

  ReplyDelete
 5. aga kay surekh lihites muli....:) afaat...
  tujha aaapan ek sangraha karu tayar...:)

  ReplyDelete
 6. खूप सुंदर..

  ReplyDelete
 7. अर्ध्य धन्यवादाचे.. सर्वांसाठी ..
  :)

  ReplyDelete
 8. सुंदर लिहीलं आहेस.... शेवट अगदीच मस्त!!!

  मोगरा आणि सोनचाफा काय आठवण करून दिलीस गं, आजचा दिवस आता या आठवणींच्या गावाला जाईल असे दिसतेय!!!

  ReplyDelete
 9. सहजच //
  "तन्वी" .. ताई म्हणायचा मोह होतोय... पण तरीही :)

  धन्यवाद ग.. अन असे सुगंधी गाव प्रत्येकाच्याच आठवणीत असावेच न नेहमी ...
  तुमच्या साऱ्यांचेच ब्लॉग इतके छान आहेत न... माझे तर अजून पूर्ण वाचून देखील झाले नाहीयेत.. खूप नव्याने सुरुवात केलीय मी.. ती ही आताश्या...
  प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार ..

  ReplyDelete
 10. सुंदर...!!! निव्वळ निशब्द झाले वाचता वाचता...!!!

  ReplyDelete
 11. सौमिती... :)
  ब्लॉगवर स्वागत न धन्यवाद...
  एका भक्तीकडून दुसरया भक्ती ला... :P

  तुझा पण ब्लॉग इंटरेस्टिंग वाटतोय :) पाहते ह्म्म्म... :)

  ReplyDelete