Monday, June 20, 2011

काय पाठवू म्हणे ...काय पाठवू म्हणे ...
पाठवून दे खुशालीचे एक पत्र ..
एखादे मोरपीस पुस्तकात दडवलेले ..
एखादा मोती ... खोल कुठे मनाच्या तळाशी लपलेला ..

पाठव बासरीची ती धून... जी वाऱ्यावर लहरत तुझा आठव देईल..
दे एखादी लाट .. जी समुद्राच्या गाजेसारखी झंकारत राहील..

पाठव ती सुरावट.. जी आकाशाला गवसणी घालून तंबोऱ्याच्या तारांवर रुळली
अन पाठव ती कविता.. जी तुझ्या नि माझ्या शब्दाशब्दात जुळली

पाठव तो श्वास.. जो गंध भरला मरवा होऊन माझ्याभवती दरवळला
अन तो आभास.. जो काळोखाच्या क्षणीही तुझा भास होऊन सोबत वावरला

पाठव ते क्षण जे एकत्र घालवले ..
अन ते ही .. जे विलग होऊन तुझी वाट बघण्यात गेले

पाठवून दे तुझे अवघे असणे जे माझ्या आयुष्याची आस आहे
अन पाठव माझे ही जगणे जे सतत तुझ्या आसपास आहे

पाठवून दे न एक स्वप्नीलसा होकार ...
सारे आयुष्य तरंगेल त्यावर...
एका आयुष्याचाच प्रश्न...
काही श्वासांचेच तर अंतर..  

अन...
जर नसेलच ह्यातील काहीही तुझ्याकडे ...
तर मग पाठव एक सोपा नकार..
कसल्याही किल्मिषांची पुटे न चढवता ...निराकार ..
मी प्रयत्न करेन मग शोधायचा...
की पुढे कसे भागावा आयुष्याचा शुन्याकार...
पण शून्याला भाग जात नाही.. असे तूच म्हणाला होतास ना...  !!!

- भक्ती आजगावकर


7 comments:

 1. सुंदर.. अप्रतिम !!

  चला, तुझा ब्लॉग सुरु झाला तर एकदाचा :)

  ReplyDelete
 2. ए खरंच खुप छान आहे गं ही कविता! मला जाम आवडली ! :)

  ReplyDelete
 3. खूपच छान..... मस्त मस्त

  ReplyDelete
 4. जर नसेलच ह्यातील काहीही तुझ्याकडे ...
  तर मग पाठव एक सोपा नकार..
  कसल्याही किल्मिषांची पुटे न चढवता ...निराकार ..
  मी प्रयत्न करेन मग शोधायचा...
  की पुढे कसे भागावा आयुष्याचा शुन्याकार...
  पण शून्याला भाग जात नाही.. असे तूच म्हणाला होतास ना... !!!


  वाह वाह... लाजवाब !!

  ReplyDelete
 5. :)

  तुमच्या शुभेच्छा अन् प्रतिक्रिया ...सूचना सगळे नेहमीच स्वागतार्ह आहे ..

  ReplyDelete