Tuesday, October 18, 2011

मनस्वी ..

एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ...
आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी...
उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ...
वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ...
मनात निराश.. हतबल झालेली ???
खरेच का ??? हतबल???

तसाच "ती" चा प्रवास...
"मनस्वी ... "
नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना... कौतुकाचे तुषार झेलताना ..
शिस्तीचा अन परंपरेचा हात धरून आखून दिलेल्या मार्गावर चालताना..
नकळत कधी तरी सहेला रे च्या तानेत गुंग होताना... गिरकी मारून समेवर अल्लद परत येताना ...
सह्याद्रीच्या अवाढव्य विस्तारापुढे नतमस्तक होताना .. शिवाजी महाराजांची दमदार ललकारी ऐकून थरारून जाताना..
समुद्राच्या अगणित लाटा पावलावर लपेटताना .. क्षितिजाचे सारे रंग मनात मिसळताना ...
जिभेवर पाणीपुरीची अख्खी पुरी चाखताना...
असे जगण्याचे सगळे धागे घेऊन उभे आडवे महावस्त्र विणता विणता ... साऱ्याचा भावनांचा एक झुला करून त्यावर मनसोक्त झोके घेताना ...
हे विसरून जाते ती...
की तो झुला एक क्षण असाच आभाळात उंच उंच जाईल.... त्या झुल्याला झोका देणारा मायाळू हात अलवार निसटेल.. अन आपण आभाळात...

कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या प्रमाणे चौकट का ही???

आधाराचे सगळेच बंध सुटल्याची ... अधांतरी... कुठे पोहोचणार... कसे पोहोचणार... आधार असेल का त्या .. "त्या"च क्षणाला... कुणाचा आधार... कसा असेल... समजून उमजून घेईल का तो...  की नाकावर आपटणार आपण... एका अनोळखी नात्याची...सप्तपदीची.. अशी जीवघेणी पहिली ओळख...

पण "ती"..  मनस्वीच ती ...
या गदारोळात...  त्याच झुल्यावर अजून ही हसतेय... त्याच आभाळाला अजून खुणावतेय... स्वप्ने समोर दड्लीयेत तिची...
अन साथीला शिदोरी ...
त्या सगळ्या जगण्यावर आसुसून प्रेम करण्याची... स्वतःचे १००% प्रयत्न देण्याची ...
पडलो धडपडलो तरी परत उठून चालू पडण्याची उभारी मनाला देण्याची... नात्यांच्या बंधांवर विश्वास ठेवण्याची ...

त्याच शिदोरीवर अल्लड आयुष्याची एक पाऊलवाट अलगद उतरेल निळ्या आभाळात... तिला हव्या असलेल्या स्वच्छ आभाळात... स्वप्नांच्या रंगीबेरंगी क्षितिजावर...!!!


ताजा कलम : 
ही कहाणी सुफळ संपूर्ण का ??
नाही... अश्या कहाण्या सुरूच राहतात न... 
"ती" चा प्रवास असाच सुरु निरंतर !!! 


भक्ती आजगावकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार!!

8 comments:

  1. खर आहे ..."ती" चा प्रवास असाच सुरु निरंतर !!!
    रच्याक ,छान लिहल आहेस ग

    ReplyDelete
  2. छान लिहील आहेस... गुंग होऊन वाचत बसलो...

    ReplyDelete
  3. नदीच्या दिशेने जरी वाट गेली
    तिलाही असे सागराची क्षुधा
    इथे प्राण माझे तळाशी निमाले
    तुझी आर्जवे कोण ऐकी आता......

    ReplyDelete
  4. Khupch chan... maala bhavnar.. bhabad... :)

    ReplyDelete
  5. अभिषेक .. :)
    Anonymous ब्लॉगवर स्वागत अन धन्यवाद ...

    ReplyDelete
  6. दीपक....

    किती सुंदर... किती तंतोतंत ...
    चार ओळीत पूर्ण अर्थ :)

    ReplyDelete
  7. I am not new to blogging and really value your blog. There is much prime subject that peaks my interest. I am going to bookmark your blog and keep checking you out. Wish you good luck.

    Some people are too smart to be confined to the classroom walls! Here's a look at other famous school/college dropouts.
    Check out here for Smart People

    ReplyDelete