Saturday, December 31, 2011

३१ डिसेंबर २०११


असाच अजून एक दिवस उगवेल ...  अगदी असाच मावळेल पण... 
कालसुद्धा असाच उगवला होता ... अन उद्या सुद्धा त्यात काही फरक होईल असे नाही... 
अनादी काळापासून हे असेच होत राहिलेय .. अन जगाच्या सो कॉल्ड अन्तापर्यंत हे असेच राहील... 

मग अट्टाहास कसला हा...सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस.. अन नववर्षाचे स्वागत... 
कित्येक पोस्टस, कित्येक शुभेच्छा, कित्येक SMS या जगाभवती फेऱ्या मारत असतील,
वर्तमानपत्राचे रकाने, अन शुभेच्छापत्रांची दुकाने ओसंडून वाहत असतील ... 
अन कहर म्हणजे बेगड्या मुखवट्यांचे हुकमी हसू घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या कानाला हे शब्द या दिवसभरात स्पर्श करून गेले असतील ... 

मग का अजून एक पोस्ट...  म्हणून सकाळ पासून केलेला कंटाळा... दर वर्षीचे रुटीन म्हणून डायरीवर एक नजर फेकून बंद केलेले शेवटचे पान... 
अन झरकन मनावर एक ओरखडा... रिकाम्या पानाचा... शेवटचे पान... शेवटचा दिवस.. २०११ चा...
शेवटाचा...  समारोपाचा.. गतवर्षाच्या जमाखर्चाचा.. दिवस-रात्रीच्या पलीकडे आयुष्याचा एक कालखंड जो उलटला.. त्याच्या ताळेबंदाचा .. 

अन जेव्हा या विचारासरशी पुन्हा एकदा डायरीची पाने उलटली... त्या क्षणी जाणीव झाली की कृतज्ञता मानावी इतक्या छान गोष्टी या वर्षात पदरी पडल्यात... वर्षाच्या सुरुवातीलाच अनुभवलेले... एक माणूस म्हणून विविध शक्यतांची दारे उघडणारे सेशन ... अन त्याच शक्यतांचा पाठलाग करताना.. स्वता:चा शोध घेत आत आत जाताना... पुन्हा गवसलेले वेडे वेडे व्यसन.. शब्दांनी खेळण्याचे व्यसन... भावनांना जोजावून लाडावून गेयरूप देण्याचे व्यसन ... 

कॉलेजमध्ये असताना ... नंतरच्या काळात नोकरीच्या अधे मध्ये कधी.. कधी आनंदून कधी हिरमुसून...  कधी अंधुक आशेत कधी काळोख्या निराशेत लिहिलेल्या नोंदी जुन्या डायरीमध्ये पाहून, वाचून परत डायरी मिटून ठेवायचे.. अशी किती वर्षे दरम्यान उलटली... बाहेरचा संवाद वाढत गेलेला कामानिमित्त, दैनंदिन जगण्याच्या आमिशात पण आतला संवाद कुठेतरी मनाच्या तळाशी गप्पसा उदास एकटा... 

कित्येक वर्षाने त्या डायरीला एका नवीन रुपात नवीन साजानिशी परत एक गळामिठी दिली ती याच वर्षात.. 
चारोळ्या... कविता.. मुक्तक अश्या विविध रुपात मनातल्या भावना मांडताना आंतरजालावर एक अस्तित्व.. स्वर्णिम सखीचे.. अन या प्रयत्नांना एक आत्मीय सोबत ... तुम्हा सर्वांची ... कौतुक करणारी, कान ओढणारी.. हवीहवीशी वाटणारी.. 

असे हे उमलते सुगंधी स्वत्व सापडणे हे या वर्षाचे किती सुंदर ऋण... या ऋणातून उतराई व्हायचेच नाहीये... पण जाताजाता सरत्या वर्षाला कृतज्ञतेचे एक अर्ध्य नक्कीच... 

उद्या पुन्हा तीच पहाट होईल... तीच सकाळ अन तशीच संध्याकाळ पण होईल... पण या क्षणी थांबून एक धन्यवाद तुम्हासाठी... या आशेसह की येणारे नवे वर्ष सर्वांसाठी उन्नतीचे सौदार्हाचे अन आनंदाचे जावो !!!! 

भक्ती आजगावकर 
4 comments:

 1. पुनः स्वर्णिम सखी

  २०१२ मध्ये सुदधा अशीच लिहीत रहा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  ReplyDelete
 2. आठवणींच्या फुलांनी जसे टांगले दिवस...

  ReplyDelete
 3. नववर्षासाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. माझी आणि स्वर्णिम सखी ची ओळख ह्या २०११ मधली....सखी तुझ्या कविता आणि तू इतकी छान ओळख झाली ती ह्या २०११ मध्येच....तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा!! ह्या नवीन वर्षात अशीच लिहित राहा....

  ReplyDelete