Sunday, July 10, 2011

कॉफी ..!!!


काही काही कनेक्शन्स अगदी जुळून आलेले असतात न... जणू एकमेकासोबत असावे असेच... असेच एक गहिरे नाते... आपण अन कॉफी यांचे ..  

धुंद कोसळता पाउस.. खोलीचा आवडता कोपरा.. आभाळ दाखवणारी फ्रेंच विंडो .. द्रुत लयीत आलेली शुभा मुदगल यांची तान.... नी हातात दरवळत्या कॉफीचा मग ... 
स्वर्ग स्वर्ग धरेवर म्हणतात .... तो अजून वेगळा असतो का.. 

आठवणींच्या लडी एकवार उलगडू लागल्या की किती विविध रंगी गुंता होत जातो स्वत:भवती...  किती तलम रेशमी धागे उलगडत जातात बांधून ठेवलेले ते क्षण, ते बंध, ते स्पर्श... 

किती अन कशी, ही अशी कॉफी साथ करत राहते आपल्याला.. आपल्या जगण्याचा एक भाग बनत..

कधी परीक्षेच्या रात्रींत डोळे फाडून अभ्यास करताना... वेलदोड्याच्या वासासोबत आईची माया जाणवून देणारी... 
कधी कॉलेज मधून लेक्चर बंक करून अश्याच पावसात घेतलेली... मैत्रिणींच्या घोळक्यात ...गप्पात ... सगळ्यांच्या हातात फिरत हाती रिकामा मग कधी आला हे सुद्धा न कळलेली ... अन मग कॉलेज च्या कट्ट्यावर सवयीची होऊन गेलेली .. 
कधी सगळ्यांना चुकवून, धडधडत्या हृदयाने अन थरथरत्या हाताने पकडलेला तो सिसिडी चा मोठ्ठा कप... "हातातून तो कप सुटेल की ओंजळीतून हृदय" अशी त्या कॉफीवरच्या क्रीमच्या नक्षीत हरवलेली ...
कधी एकटेपणात त्याच घोटाघोटातून "प्रिय" च्या सुगंधी आठवणी जागवणारी ...मनात रुंजी घालत सारी संध्याकाळ श्यामविरही करणारी... 

इतकी जिव्हाळ्याची साथ देते कॉफी... शेवटच्या थेम्बा पर्यंत ... डोके भन्नाट उलट सुलट फिरत असताना अन टोकाचे विचार आजूबाजूला पिंगा घालत असताना .. जिवलग मित्रासारखी सोबत करणारी.. समजावणारी ..अन संपता संपता आपले विश्व ताळ्यावर आणणारी सुद्धा...  किती पेल्यातली वादळे याच कॉफीमग मध्ये शमतात.. 

अशी प्रत्येकासाठीच आठवणीनी मधुर बनलेली कॉफी ... या कॉफी पुराणात सरतेशेवटी आठवतोय तो शांताबाई यांनी केलेल्या एका जपानी हायकुचा भावानुवाद .... 

"कॉफी हाउस
प्रत्येक टेबल भवती 
स्वतंत्र पाऊस ..." 

एकच कॉफी हाउस पण प्रत्येक टेबल वर नवीन माणसे...  अन त्यांना भिजवणारे त्यांचे क्षण .. अनुभव, त्यांच्या आठवणी, स्वप्ने.. गप्पा ..अन अजून कितीतरी शेअरिंग ... असा हा प्रत्येकाचा स्वतंत्र पाऊस ... 

अश्या तुमच्या आठवणींचा पाऊस एव्हाना तुमच्याही भोवती सुरु झाला असेल न..  

सो Enjoy.. तुमची कॉफी अन तुमचा पाऊस माझ्यासोबत !!! 
:) 

- भक्ती आजगावकर 

फोटो आंतरजालाहून साभार 

9 comments:

  1. परत एकदा कॉफी हाउस मध्ये गेल्यासारखे वाटले. छान.

    ReplyDelete
  2. हायकू मस्त! हम्म, बरेच दिवस कॉफी नाही प्याली ... हि आठवण झाली!

    ReplyDelete
  3. धन्यवाद इंद्रधनू ..मैथिली.. अभिषेक अन् मिलींदजी ... :)
    Hope coffee is not too dull not too strong!! :)

    ReplyDelete
  4. स्वागत अपर्णा.. :)

    ReplyDelete
  5. it was really refreshing, rich, aromatic, balanced, sweet, bright n creamy....just like cuppa cafe..d way i love....amazing writing dear...u really gotta skill...

    ReplyDelete