Thursday, October 27, 2011

दिवाळी ...


दिवाळी ...
दिपवाळी .. दीपावली ... दिव्यांच्या ओळी  ... 
      प्रकाशाचा उत्सव ..
          ज्योतींचा महोत्सव ... 

किती उजळून निघतो सारा आसमंत .. लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी .... 
साध्या मातीची पणती ..पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते पराकोटीचा अंधार ... 

अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली इक तळपती झेप ...
एक झळकती ज्योती शलाका ... एक मंद तेवणारी वात.. 
तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत ... 
चिमुकला पण आशादायी ..

हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे ही इच्छा ... 
येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा... 
अन ही दिवाळी तुम्हा साऱ्यासाठी खूप खूप खूप आनंद ... सुख समृद्धी ...अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह .... 


उजळली वात, फाकला प्रकाश 
उटण्याचा गंध भारले आकाश .. 
मांगल्य घेउनी आली ही दिवाळी 
जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी!!! 

- भक्ती आजगावकर 

Tuesday, October 18, 2011

मनस्वी ..

एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ...
आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी...
उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ...
वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ...
मनात निराश.. हतबल झालेली ???
खरेच का ??? हतबल???

तसाच "ती" चा प्रवास...
"मनस्वी ... "
नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना... कौतुकाचे तुषार झेलताना ..
शिस्तीचा अन परंपरेचा हात धरून आखून दिलेल्या मार्गावर चालताना..
नकळत कधी तरी सहेला रे च्या तानेत गुंग होताना... गिरकी मारून समेवर अल्लद परत येताना ...
सह्याद्रीच्या अवाढव्य विस्तारापुढे नतमस्तक होताना .. शिवाजी महाराजांची दमदार ललकारी ऐकून थरारून जाताना..
समुद्राच्या अगणित लाटा पावलावर लपेटताना .. क्षितिजाचे सारे रंग मनात मिसळताना ...
जिभेवर पाणीपुरीची अख्खी पुरी चाखताना...
असे जगण्याचे सगळे धागे घेऊन उभे आडवे महावस्त्र विणता विणता ... साऱ्याचा भावनांचा एक झुला करून त्यावर मनसोक्त झोके घेताना ...
हे विसरून जाते ती...
की तो झुला एक क्षण असाच आभाळात उंच उंच जाईल.... त्या झुल्याला झोका देणारा मायाळू हात अलवार निसटेल.. अन आपण आभाळात...

कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या प्रमाणे चौकट का ही???

आधाराचे सगळेच बंध सुटल्याची ... अधांतरी... कुठे पोहोचणार... कसे पोहोचणार... आधार असेल का त्या .. "त्या"च क्षणाला... कुणाचा आधार... कसा असेल... समजून उमजून घेईल का तो...  की नाकावर आपटणार आपण... एका अनोळखी नात्याची...सप्तपदीची.. अशी जीवघेणी पहिली ओळख...

पण "ती"..  मनस्वीच ती ...
या गदारोळात...  त्याच झुल्यावर अजून ही हसतेय... त्याच आभाळाला अजून खुणावतेय... स्वप्ने समोर दड्लीयेत तिची...
अन साथीला शिदोरी ...
त्या सगळ्या जगण्यावर आसुसून प्रेम करण्याची... स्वतःचे १००% प्रयत्न देण्याची ...
पडलो धडपडलो तरी परत उठून चालू पडण्याची उभारी मनाला देण्याची... नात्यांच्या बंधांवर विश्वास ठेवण्याची ...

त्याच शिदोरीवर अल्लड आयुष्याची एक पाऊलवाट अलगद उतरेल निळ्या आभाळात... तिला हव्या असलेल्या स्वच्छ आभाळात... स्वप्नांच्या रंगीबेरंगी क्षितिजावर...!!!


ताजा कलम : 
ही कहाणी सुफळ संपूर्ण का ??
नाही... अश्या कहाण्या सुरूच राहतात न... 
"ती" चा प्रवास असाच सुरु निरंतर !!! 


भक्ती आजगावकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार!!

Wednesday, October 12, 2011

कोजागिरी पौर्णिमा


"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ... लक्ष्मीची चंचल पाऊले ऐकायला जागे राहणाऱ्या आशादायी मनुजाची ...


कोजागिरी पौर्णिमा ...
पूर्ण चंद्राचे कौतुक आणि उत्सव चांदण्यांचा ...
मोत्यासारख्या लख्ख प्रकाशात न्हायलेल्या रातीचा...
कुटुंबीय, आप्त अन मित्रांसोबत हसत खेळत गप्पा मारत केलेल्या जागरणाचा ...
शुभ्र चांदण्यात चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या नैवेद्याचा ..
आणि सगळ्यांसोबत घालवलेल्या या तास दोन तासाच्या मैफिलीचा ....
सोबत सुरेल आठवणीतल्या कवितांची ... भेंड्या लाऊन म्हटलेल्या चांदण्या रात्रीच्या गाण्यांची ..
पेटी वरल्या एखाद्या सुरावटीची अन ... उत्स्फूर्त अश्या टाळ्यांची सुद्धा...

....

पण.. अशी ही पहिलीच कोजागिरी नाही का...
दूर... एकांतात... आपल्या माणसांपासून दूर वेगळ्याच शहरात ...
आपल्याच आभाळात फुलून आलेल्या या पूर्ण चंद्राचे ..शरद पौर्णिमेचे कौतुक फक्त मनातल्या मनात...
आभाळ तेच... चांदणे तेच... चंद्र ही तोच... अन पौर्णिमा ही तीच..
पण घर... आपली गच्ची... आपली माणसे... अन कोजागिरीचा सोहळा ... हे सगळेच दूर...
फोन वर शुभेच्छा देता घेताना... वरकरणी हसून एखादा smily वाक्यात पेरताना ... स्वत:ला समजावणीचा सूर स्वत:चाच...
पण अंतर्यामी कोजागिरीची साद का अपूर्ण... का मनातल्या भावनांचे सावट या शुभ्र चांदण्यावर ही पडलेले..

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...
अपने रात की छत पर कितना तनहा होगा चांद... !!!



शब्दसुरांच्या चांदण्याची अशी बरसात करून..कालच काळाच्या पुढे निघून गेलेले जगजीतजी यांची आठवण आल्याशिवाय ही रात्र सरत नाहीये.. गीत - गझलांची ही कोजागिरी मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांवर अशीच बरसत राहील हे नक्की..
जगजीतजी...तुम्हाला चांदण्यांचीच श्रद्धांजली !!!


- भक्ती आजगावकर

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...

छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!


Sunday, October 2, 2011

We must Learn to walk alone ...!!




We must Learn to walk alone ...!!  



जीवनात किती वाटा किती प्रवाह येऊन मिळतात ..
एका उत्कट बेभान लाटेला आभाळ मोकळं पुढे जायला ...
क्षितिजावर रेंगाळणारे लखलखते तारे, अगणित नक्षत्रे आतुर आपल्याला कवेत घ्यायला..
सळसळत्या प्रवाहासोबत वाहत जातो आपण.. वेडावत जातो.. वागवत जातो अंगांगावर सूर्यास्ताचे अगणित वेडे रंग...
सोनेरी, केशरी, पोवळी, गुलाबी आणिक निळे जांभळे रंग नेऊन सोडतात एका गडद काळोखी छायेत...
या साऱ्याच वाटांवर सोबती नाही मिळत नेहमीच... म्हणूनच ... we must learn to walk alone ...!!!

बहराच्या जडभाराने झुकलेली गुलमोहराची फांदी खुणावते तेव्हा तो बहर अनुभवावा एकट्यानं ...
सहज वळणावर भेटावं रातराणीच्या सुगंधानं अन श्वासभर हुंगून घ्यावं ते ही एकट्यानं...
घरी जाताना अचानक क्षितिजावर सूर्याचे सहजी अस्त होणं समजून घ्यावं एकट्यानंच ...
दाटून येणारा आवंढा अन भिजू भिजू पाहणारे डोळे या सोबत मनात रुंजी घालणारं "थोडासा बादल थोडासा पानी... और इक कहानी ...दो नैना औsssर इक कहानी" या सोबत गहिवरून यावं तेही एकट्याने...

आणि एका क्षणी वेड्या सलीलसीमेवर उभं राहून जन्म मृत्यूची ओढाताण भोगावी ती ही एकट्याने.. फक्त एकट्यानेच !!!

" देखिये तो लगता है,
जिंदगी की राहों में इक भीड चलती है ...
सोचीये तो लगता है, भीड मे है सब तनहा !!!
देखिये तो लगता है...
जितने भी ये रिश्ते है.. कांच के खिलोने है,
पल मे टूट सकते है...
इक पल मे हो जाये... कौन जाने कब तनहा !!!

देखिये तो लगता है,
जैसे ये जो दुनिया है.. कितनी रंगी महफिल है..
सोचीये तो लगता है,
कितना गम है दुनिया मे.. कितना जख्मी हर दिल है
वो जो मुस्कुराते थे,
जो किसी के ख्वाबोंमे अपने पास पाते थे
उनकी नींद टूटी है
और वो है अब तनहा ..."
- One of the master pieces from Jawed Akhtar

शेवटी ज्याचं त्याचं गाणं एकट्यानचं म्हणायचं.. उत्कटतेनं ओसंडून जगण्यावर असं प्रेम करायचं आणि आठवणींचा गोफ विणत राहायचं ... रिक्त मनात स्वतचं अस्तित्व सांभाळत... एकट्यानं !!!!

-हिंदी कविता सौजन्य : जावेद अख्तर (Title song of Hindi Serial तनहा )
-
- भक्ती आजगावकर