Friday, November 9, 2012

मिझोरम - A Walk in Clouds

A Walk In Cloud....

गत वर्षीची कोजागिरी अशी जगजीत सिंगजींच्या गझलेत चिंब भिजलेली होती... "हाथ छुटे भी तो रिश्ते नाही तोडा करते" असे म्हणता म्हणताच हात सोडवून गेलेले ...
अन या वर्षीची कोजागिरी.... ती मात्र " बादल पे पाव है.. या छुटा गाव है " ही अशी...
पार त्या टोकाला... बांगला देशाच्या ही पलीकडे... मिझोरम... 




कामापुरती धावती भेट असली तरी .. मुंबई-कोलकाता- सिलचर -तुरियल अश्या मजल दरमजल प्रवासात एकूणच आपण शब्दशः ढगात तरंगत असतो ... 

एकतर आपण तरी विमानाचे पंख लेऊन ढगांच्या उंचीवर ..नाहीतर वळणा वळणाने दाट झाडीतून चढण-उतरणीवरून धावणाऱ्या रस्ताभर ढगच आपल्या उंचीवर :) 



एका टेकडीवर आपले गेस्ट हाउस असते अन आजूबाजूला हिरवीगार शाल पांघरून उभ्या डोंगरांमध्ये निळ्या आकाशाखाली ढग आरामात तरंगत असतात ... आपल्याला वाटेवर अडवतात ...  
नजर धुंद करून पुढचा रस्ता अंधुक करतात... हलकेच स्पर्श करून अंगांगावर शिरशिरी आणतात... लख्ख सूर्यप्रकाशात समोरच्या दृश्याचे एक झकास चित्र बनवतात आणि मावळत्या संध्याकाळी साध्याश्या विजेच्या दिव्यांना अप्रतिम कोंदण देऊन माहोल बनवतात ...


मुंबई सारख्या एका "मेट्रो" शहरात राहताना जाणीव सुद्धा होत नाही... 


इतका वेगळा भाग, लोक -समाज,
चालीरीती राहणीमान.. 
चेहऱ्याची ठेवण.. माणूस म्हणून वाढतानाची जडण घडण.. 
पण तरी माणूसच... तो पण हिंदुस्तानी...

वेगळ्याच लयीत ऐकू येणारी अडखळणारी हिंदी .. पण संवादाची खूप हौस.. टुमदार दिसणारी बांबूची चिमुकली तरी हवेशीर घरटी.. 
गोंडस चेहऱ्याची शाळेत जाणारी मुलं... 

तितक्याच तन्मयतेने कामात बुडालेली, पिल्लू पाठीला बांधून राबत असणारी स्त्री..








भाताची तरारलेली रोपे ... आणि जिथे तिथे पोफळी सुपारी बांबूंचे उंच उंच आभाळात शिरलेले भाले ..
घरासमोरच्या छोट्याश्या तळ्यात बहरलेली कमळे ..आणि डौलाने पोहणारी बदके..
हिरव्या चौकोनात मस्त चरणाऱ्या गायी अन इथे तिथे दुडदुडणारी बकरीची पिल्ले..

इतकेच नाही तर..


आपल्याकडची बहरलेली जास्वंद... कुठेतरी वळणावर शुभ्र केशरी सडा घालणारा प्राजक्त..
इथे कोकणातल्या सारखी पसरलेली लाजाळू .. बुलबुल - हळद्याची मंजुळ शीळ ..
आणि देशाच्या दुसरया टोकाला बांधणारे आपले बाँलीवूड.... येत जाता ऐकु येणारी हिंदी गाणी...
आणि एक.... कोजागिरी चा पूर्ण चंद्र :) 



इतक्या कमी वेळात एखादा गाव एखादे राज्य समजणे शक्य नाही... जेव्हा "काम" हेच अश्या धावत्या भेटीचा हेतू असतो तेव्हा तर नक्कीच नाही...
पण आपल्या देशाचा एक सुंदर भाग... "आपलाच आहे" ही भावना घेऊन मग तिकडचा एक ढग आपल्या सोबत इथे येतो तरंगत..
तेव्हा देशाबद्दलची एक जाणीव मनात लकाकते .. विविधतेमधल्या एकतेची ...
कितीही नाजूक असले तरी जोडलेल्या बंधांची...
:)


काही अजून क्षणचित्रे ... 






- भक्ती आजगांवकर

मिझोरमची अधिक माहिती इथे 

8 comments:

  1. Too good, Perhaps I should learn something from you. How to make things interesting in life. For anyone else this would have been just a business visit but you made it live and entertaining

    ReplyDelete
    Replies

    1. कौतुकाबद्दल धन्यवाद प्रदीप
      आणि ते वातावरणच खूप छान होते .. मी फक्त शब्दात अन चित्रात उतरवलेय
      :)

      Delete
  2. मस्त गं फ़ोटो आणि शब्द दोन्ही :)
    Lucky you to get to a place like this and that too for work ;) ha badal tula nakkich aawdla asel. :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अपर्णा ताई ...
      बदल... :)
      कामासाठी फिरावे लागते...ते आवडते कारण बरेच काही नवीन पाहायला मिळते.... अन आवडत नाहीही कारण मग मनाजोगते फिरायला मिळत नाही :P

      Delete