Saturday, December 31, 2011

३१ डिसेंबर २०११


असाच अजून एक दिवस उगवेल ...  अगदी असाच मावळेल पण... 
कालसुद्धा असाच उगवला होता ... अन उद्या सुद्धा त्यात काही फरक होईल असे नाही... 
अनादी काळापासून हे असेच होत राहिलेय .. अन जगाच्या सो कॉल्ड अन्तापर्यंत हे असेच राहील... 

मग अट्टाहास कसला हा...सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस.. अन नववर्षाचे स्वागत... 
कित्येक पोस्टस, कित्येक शुभेच्छा, कित्येक SMS या जगाभवती फेऱ्या मारत असतील,
वर्तमानपत्राचे रकाने, अन शुभेच्छापत्रांची दुकाने ओसंडून वाहत असतील ... 
अन कहर म्हणजे बेगड्या मुखवट्यांचे हुकमी हसू घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या कानाला हे शब्द या दिवसभरात स्पर्श करून गेले असतील ... 

मग का अजून एक पोस्ट...  म्हणून सकाळ पासून केलेला कंटाळा... दर वर्षीचे रुटीन म्हणून डायरीवर एक नजर फेकून बंद केलेले शेवटचे पान... 
अन झरकन मनावर एक ओरखडा... रिकाम्या पानाचा... शेवटचे पान... शेवटचा दिवस.. २०११ चा...
शेवटाचा...  समारोपाचा.. गतवर्षाच्या जमाखर्चाचा.. दिवस-रात्रीच्या पलीकडे आयुष्याचा एक कालखंड जो उलटला.. त्याच्या ताळेबंदाचा .. 

अन जेव्हा या विचारासरशी पुन्हा एकदा डायरीची पाने उलटली... त्या क्षणी जाणीव झाली की कृतज्ञता मानावी इतक्या छान गोष्टी या वर्षात पदरी पडल्यात... वर्षाच्या सुरुवातीलाच अनुभवलेले... एक माणूस म्हणून विविध शक्यतांची दारे उघडणारे सेशन ... अन त्याच शक्यतांचा पाठलाग करताना.. स्वता:चा शोध घेत आत आत जाताना... पुन्हा गवसलेले वेडे वेडे व्यसन.. शब्दांनी खेळण्याचे व्यसन... भावनांना जोजावून लाडावून गेयरूप देण्याचे व्यसन ... 

कॉलेजमध्ये असताना ... नंतरच्या काळात नोकरीच्या अधे मध्ये कधी.. कधी आनंदून कधी हिरमुसून...  कधी अंधुक आशेत कधी काळोख्या निराशेत लिहिलेल्या नोंदी जुन्या डायरीमध्ये पाहून, वाचून परत डायरी मिटून ठेवायचे.. अशी किती वर्षे दरम्यान उलटली... बाहेरचा संवाद वाढत गेलेला कामानिमित्त, दैनंदिन जगण्याच्या आमिशात पण आतला संवाद कुठेतरी मनाच्या तळाशी गप्पसा उदास एकटा... 

कित्येक वर्षाने त्या डायरीला एका नवीन रुपात नवीन साजानिशी परत एक गळामिठी दिली ती याच वर्षात.. 
चारोळ्या... कविता.. मुक्तक अश्या विविध रुपात मनातल्या भावना मांडताना आंतरजालावर एक अस्तित्व.. स्वर्णिम सखीचे.. अन या प्रयत्नांना एक आत्मीय सोबत ... तुम्हा सर्वांची ... कौतुक करणारी, कान ओढणारी.. हवीहवीशी वाटणारी.. 

असे हे उमलते सुगंधी स्वत्व सापडणे हे या वर्षाचे किती सुंदर ऋण... या ऋणातून उतराई व्हायचेच नाहीये... पण जाताजाता सरत्या वर्षाला कृतज्ञतेचे एक अर्ध्य नक्कीच... 

उद्या पुन्हा तीच पहाट होईल... तीच सकाळ अन तशीच संध्याकाळ पण होईल... पण या क्षणी थांबून एक धन्यवाद तुम्हासाठी... या आशेसह की येणारे नवे वर्ष सर्वांसाठी उन्नतीचे सौदार्हाचे अन आनंदाचे जावो !!!! 

भक्ती आजगावकर 




Thursday, December 22, 2011

सहेला रे...


ओ SSSS.... सहेला रे... 

मूर्तीवर पळी पळी अभिषेक करणारा हात जरासा थांबला... त्या लाल आवरणात गच्च लपेटलेल्या मनाला एकवार साद घातल्यासारखा तो आवाज.. "सहेला रे".... झटक्यात जाणीव की अजून आत काहीतरी जिवंत आहे... एका क्षणाचीच ... एका क्षणात कंपन पाऊन परत स्थिर होणाऱ्या तंबोऱ्याच्या तारेगत मन परत दगड... पुन्हा अभिषेकाची धार मूर्तीवर त्याच गतीत सुरु झाली... परत तेच नि:शब्द आवर्तन... पुन्हा तोच अडकलेला श्वास ... पुन्हा तेच अंधारे भवताल ... 
आताश्या हे असे का होतेय.. एका शिळेगत जगणे अंगवळणी पडल्यावर पुन्हा ही जाणीव... जिवंत असल्याची पुन्हा एक आठवण ... का.. कशासाठी... ??
" आ... मिल गाये ... सहेला रे......sss " 


"सप्त सुरन की बेल सजाये ...... "
परकरी वयात नवरोबा म्हणून चिडवून घेताना अस्सा राग आलेला सगळ्यांचाच... कसे नाक उडवत चिडवतात सगळे... अन हा पण का असा मागे मागे करतो.. पण, पंडितराव गुरुजींकडे सा गिरवताना, तिरपा डोळा करून भुवई उंचावून पाहिल्या क्षणी ओंजळभर चिंचेचे आकडे दाखवलेस न, त्या क्षणी कुठे तरी रुजवात होती का या नात्याची ... खेळताना, भांडताना बाजू घेताना .. उघडलेल्या तळव्यावर केवड्याची सुरेख पात ठेवताना .. आरशात बघून कुंकू लावताना उमटलेल्या प्रतिमेतून हसू सांडताना ..


" आ ssss आ ... मिल गाये... जनम जनम का संग ना भूले... "


लाल आलवण मानेभवती घट्ट लपेटून घेत पाऊले आपसूक घाटावरच्या मंदिराकडे वळली...एकेक चिरा ढासळत असलेल्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यात उदास एकच दिवा जळत होता... तो ही अधुरा, भवातालचा अंधार विझवायला... वाऱ्याच्या झोताबरोबर झगडण्याची त्याची अपुरी धडपड... अन या कशाचाच मनावर न उमटणारा ओरखडा.. 


"सहेला रे ssss .. सहेला रे..." 

मोरपीस फिरवल्यागत एक शहारा अंगभर उमटून गेलेला.... आंब्याच्या आडव्या फांदीवर बांधलेल्या झोक्यावर झोके घेताना... सुरात सूर मिसळून गाताना... पहिल्यांदा हातावर ठेवलेला हात लाजून काढून घेताना... किती क्षण ... किती ताना ... किती झोके.. तुझे माझे.. 
गाणे शिकण्यासाठी तुझा इंदूरला जायचा निर्णय... अन वेड्यागत वाडाभर भिरभिरून शेवटी माजघराच्या उंबरठ्यावर अडखळलेले पाऊल... किती आणिक काय बोलू असे झाले असताना तुझे दिलाश्याचे शब्द... "तुझ्यासाठी आहेच मी ..नेहमीच असेन. येईन न परतून लगेच...!!" आभाळभर भरारी घेणाऱ्या गाण्याला गवसणी घालायचे तुझे स्वप्न अन माजघरातून पडवीत, अंगणातल्या मोहरलेल्या तुळशीपासून मागल्या दारच्या बहरणाऱ्या शेवग्यापर्यंत माझे जगणे तुझ्या शब्दाभवती पिंगा घालणारे.. हिरव्या काकणातून अन गर्भरेशमी लुगड्यावरून हळुवार हात फिरवताना लाजून चूर झालेले... 

" जनम जनम का संग ना भूले... अब के मिले तो बिछुर न जाये... "

पुन्हा पुन्हा ही रात्र येते.... दिवसच्या दिवस अख्खा एका आवर्तनासारखा संपतो... तारीख बदलते.. ऋतू बदलतात... अवचित पुन्हा जुन्या आठवणीचे दोन चार शिंतोडे तेवढे मनावर पडून जातात... पण ही रात्र... डोळे रोखून पाहत असल्यासारखी... सावज हेरून दबा धरून बसल्यासारखी.. दर दिवसाच्या शेवटी पुन्हा एकदा कोंडीत पकडणारी... अंतहीन ...कोरडीठाक .. माहेरी असताना आजीच्या मऊ लुगड्याची शिवलेली गोधडी पांघरली की साऱ्या आयुष्यावर एक सुरक्षित माया जाणवे... आजकाल सारे आयुष्यच उघड्यावर पडलेय का..?? अन त्याचेही काही सोयरसुतक वाटू नये हे का... ??? 

श्वासाची एक अखंड माळ कळतनकळत चालू राहावी अशी... एखादी उचकी.. एखादी कळ.. एखादीच वेदना..जगण्याशी बांधून ठेवणारी एक तरी खूण.. रंगाच्या गंधांच्या या पसाऱ्यात इतके अलिप्त रंगगंधहीन होऊन जावे जगणे... सुरांच्या अविनाशी सागरातून तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी एकही धून हाती लागू नये ... ???

"सहेला रे ..." माळेचे मणी ओढत रात्र संपलीय ... पुन्हा एक आवर्तन सुरु... पुन्हा एका चौकटीचा प्रवास सुरु ... दुसऱ्या रात्री पर्यंतचा!!! 

"आ मिल जाये... सहेला रे... "

दीपदानाचा दिवस आठवतोय का ??... घाटावरच्या देवळात साऱ्या गाभाऱ्यात, मंडपात अन घाटावरही.. जिथे तिथे पणत्यांच्या चिमुकल्या वाती अंधारावर राज्य गाजवताना... देवळाच्या आवारातल्या दीपमाळा तेजाळत आकाशाकडे उन्नत पाहताना...अन घाटावर पायऱ्यावर बसून लाटांवर दिवे सोडून देताना...
सोबत होतास न तू... आहेस... अजून आहेस... 
आश्वासक सोबत... 

या लाटा अजून हेलकावताहेत.. त्या पणत्या वाहत दूर किनाऱ्याला लागल्यात का... तुझ्या किनाऱ्याला?? 
थंडगार पाण्याचा स्पर्श पावलाला... आत्म्याला त्या परमात्म्याचा स्पर्श असाच होत असावा का ?? 
"सहेला रे ... अब के मिले तो बिछुर न जाये... !!! "


ही रात्र संपलीय आता ... सहेला रे...सहेला रे... !!! 


- भक्ती आजगावकर 


छायाचित्र आंतरजालाहून साभार!! 

प्रेरणा : गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची "सहेला रे" ही अप्रतिम कलाकृती 
इथे ऐका...