Thursday, July 12, 2012

" काही अक्षर क्षण"





पहिला श्रीगणेशा आठवतोय का..
कधी धरली असेल पाटी पेन्सिल हातात ...कसा गिरवला असेल..
आवडीने की आळसावत ...
मुळाक्षरे.. काना मात्रा आकार उकार .. कशी ओळख झाली असेल लिपीशी ...
आडव्या तिडव्या रेषांवरून सुरु झालेला प्रवास वळणदार कधी झाल्या असतील..
आईने गिरवून घेतले असेल ... बाईंनी पेन्सिल पेन पकडायचे कसे हे शिकवले असेल ...
पुढे शाळेत अभ्यास, गृहपाठ, परीक्षेचे पेपर, कॉलेजचे - क्लासचे नोट्स ते आता क्वचित फिल्ड विजीट/ ऑडीटचे नोट्स या अन अश्या वळणावरून येऊन थबकलेले लेखन... आता कितीक दिवस फक्त बोटांच्या टोकांवरून कीबोर्ड वर अन मोबाईलच्या स्क्रीनवर उमटते.. भरभर झरझर...

छान ओळी.. सुरेख विचार .. असे येते त्यातही... अन झटकन शेअर ही होते... एका क्लिक सरशी ...
पण हातावर क्वचित शाईचे डाग वागवत आवडीच्या डायरीमध्ये सुवाच्य अक्षरात अन विविध रंगात आवडलेली कविता लिहून काढणे याची गम्मत त्यात नाही न... 
आज फिरून या सगळ्यांचा पुन्हा धांडोळा घेण्याचे कारण... तर अचानक अनुभवलेले " काही अक्षर क्षण" ...


सखीच्या या साऱ्या पसाऱ्यात आधी मांडले तसेच विशेष सख्य या शब्दांच्या लडिवाळ खेळात तर आहेच ... पण आज भेट झाली ती अक्षरांच्या सोबतीत रमणारे .. अन नुसतेच रमणारे नाहीत तर अक्षरांचा आस, ध्यास अन त्या ध्यासालाच जगण्याचा एक महत्वाचा भाग बनवलेले असे अच्युत पालव सर अन त्यांच्या टीमशी... निमित्त "मान्सून स्पेशल अम्ब्रेला पेंटिंग" या कार्यक्रमाचे .. नावातच "Capture the beauty of rain" असे जिव्हाळ्याचे टाळता न येण्याजोगे आमंत्रण ...


बेलापूर स्टेशनजवळच्या टेकडीचा हिरवाकंच परिसर ... जिथे तिथे डोळ्यांना जाणवणारा हिरवा गारवा ... आकाशाचे मंडप करून ढगांची महिरप लावल्यासारखे ओपन टेरेस ..अन खुणावणारे पेंटिंगचे साहित्य... शुभ्र पांढरी मोठी छत्री.. रंग.. ब्रश.. स्टेनसिल्स..

एक आखीव रेखीव नियोजन, सदैव मदतीस तयार असे सरांचे मदतनीस अन पूर्ण कार्यक्रमभर पालवसरांचा उत्स्फूर्त सहभाग...असा मग सुरु होतो तो एक मनस्वी प्रवास ..


शुभ्र छत्रीचा कॅनवास करून त्यावर पावसाला दिलेली साद.... मनातल्या पावसाला बाहेरच्या अवकाशात आणण्याची धडपड ...


रंगात मनमोकळे होत जाणारे ब्रश... अन समोर रंगत जाणारे भवताल ..

कधी माफक फटकारे...
कुठे झिरमिर शिंतोडे ..

कधी कुठे लागलेली धार,
अन कधी उगाच कोवळे तुषार ..

कधी नुसत्या आठवणींची तल्खली,
कधी कृष्णमेघांचे दाटून येणे...




कधी विझू विझू पाहणारी तहान ..
तर कधी धारांमध्ये भिजणे बेभान..

कधी आर्जवाचे येरे येरे पावसा ...
अन कधी निकराचे रेन रेन गो अवे ...

मनभरचे सारेच राग-रंग असे हातातून रंगात उमटायला उत्सुक ...



अश्या साऱ्या कल्लोळात एकेक छत्री रंगत होती... नहात होती पावसात ... आतल्या बाहेरच्या...

असा मनाचा... हाताचा...ब्रशचा .. रंगांचा अन पावसाचा संवाद सुरु झाला अन विविध रंग इंद्रधनुष्य उमटले छत्र्यांवर...

पुढचा कार्यक्रम या सगळ्या इंद्रधनुष्याच्या ओळखींचा... स्वत करून दिलेली अन बाकी गर्दीला पटलेली.. वाहवा अन छान हम्म चे अल्लद उद्गार .. :)





अन मग सुरु झाला तो खरा खुरा पाऊस ... आपली इतकी रूपे पाहायला धावत आला.. उराउरी भेटायला... भिजवायला ... भिजायला...






मागच्या हिरव्याकंच झाडावर अन इथे डवरलेल्या छत्र्यांच्या रांगेवर... घाबरून मिटून छत्र्या आडोश्याला लपल्या तश्या पालवसरांनी एकेकाला हात धरून पावसात भिजवलेले...


पुन्हा एक नवीन अध्याय... बरसणाऱ्या पावसात अजून एक छत्रीचे सर्वांग रंगारंगात नाहताना... प्रत्यक्ष पालव सरांच्या हातून...











"येरे येरे पावसा... तुला देतो पैसा..." लहानपणी कधी मित्रांसोबत तर कशी खिडकीच्या गजात बसून एकट्याशी मनात म्हटलेले गाणे समोर गर्दीत उमटले अचानक..अन इथे गालावर हलकेच हसू..



गाणे उलगडत गेले अलगद ... "ये ग ये ग सरी... माझे मडके भरी... " अन गर्दीला जोर चढला ...एकावर एका आवर्तनं रंगली वेगवेगळ्या सुरात तालात अन झोकात नटरंगच्या गाण्यांनी थिरकणाऱ्या पावलांना साथ सोबत केली...

हा ही जल्लोष मग जरा आवरला तो वाफाळत्या चहाच्या कपने.. घुटक्याघुटक्याने चहा संपवताना मग परत रंगल्या गप्पा .. पावसाच्या...

आणि मग त्या थोडक्या ब्रेकच्या पलीकडे सुरु झाली ती एक एक्स्पर्टच्या माहीर हाताची जादू.... अन जेव्हा ती सुरु झाली तेव्हा आता पावेतो अंतरंगाच्या उर्मीने रंगलेल्या छत्र्या झळाळून उठल्या त्या अश्या...



वर्षानुवर्षाची तपस्या... सराव.. आणि कलेप्रतीचा अतूट श्रद्धा... ती मग अश्या एका स्ट्रोक मधून... ब्रशच्या एकेका हालचालीतून उमटत गेली प्रत्येक छत्रीवर... कधी सहीनिशी.. कधी नुसत्याच रंगांच्या वळणावळणातून .. कधी कवितांच्या ओळी.. कधी अक्षरांच्या नुसत्याच रचनेतून.. अश्या प्रत्येक छत्रीला मिळत गेला मग एक जादुई स्पर्श... "अच्युत पालव" स्पर्श ...


अश्या पावसाच्या रंगात गंधात भिजून एक दिवस असा रंगीत होत गेला... तो त्यावरचे आठवणींचे रंग कधीच फिके न होण्यासाठी..

या पावसाच्या रंगानुभवासाठी पालव सर अन टीम ला विशेष धन्यवाद... :)


- भक्ती आजगावकर


सोहळ्याच्या अन्य प्रकाशचित्रांसाठी पिकासाची ही लिंक पहा..
विडिओ युट्यूब वर पाहण्यासाठी ही लिंक पहा..