Saturday, June 9, 2012

पहिला पाऊस



पहिला पाऊस थेंब पहिले 
डोळे मिटुनी मला पिऊ दे ..!!
दान मागते पदर पसरुनी 
शाश्वत आशेचा तू वर दे ..!!

तप्त भेगाळल्या पृथ्वीचे 
रुक्ष फिकुटले सारे तन मन .. 
विझव तल्खली वैशाखाची 
मायेची अलगद फुंकर दे ..!!

तुझ्या ऋतूचे बोट पकडुनी 
अंकुरतील कोवळे तराणे .. 
मृदेतल्या या सुप्त बीजांना 
जीवन जल तू ओंजळभर दे ..!! 

नुसत्या आभासांनी तुझिया 
उमलतील या मनी बगीचे .. 
हातामधली स्वप्ने म्हणती 
चैतन्याचा एक बहर दे ..!!


- भक्ती आजगावकर



गत वर्षाचा हळवा पाऊस इथे

4 comments:

  1. आभास हा छळतो तुला! :)
    छान जमलीये!

    ReplyDelete
  2. छळतो मला!!
    पाऊस हा.. :)

    ReplyDelete
  3. मस्तच....:) सखी तुझी कविता वाचून डोळ्यापुढे श्रावण धारा आणि थंड गारवा मनात साचून राहिला आहे....

    ReplyDelete
  4. श्रिया,,, :)
    भरून आलेले आभाळ असेल तर मग जराश्या हिंदोळ्याने श्रावणसरी बरसतात.. अन हलक्याश्या उन्हाच्या तीरीपेने मोहक इंद्रधनू प्रकटते ते असे :) :)

    ReplyDelete