Showing posts with label श्रावण. Show all posts
Showing posts with label श्रावण. Show all posts

Sunday, July 3, 2011

पाऊस ...

पाऊस ...

अस्सा भरारा वारा सुटतो अन् सारा आसमंत वादळून जातो ..
आपण वेड लागल्या गत पाहत राहतो...
पाऊस ... वेडा पाऊस...
चिंब करणारा.. स्वप्ने जागवणारा...
वाट पाहायला लावणारा... अन् न चुकवता “प्रिय”च्या आठवणी घेऊन येणारा...
दुरून आकाशवाट चालून येतो अन् भिजवतो...
अन् आपण भिजत राहतो..
धारांमधे ... आठवणीच्या गारांमधे ...

कसे सांगणार... कसे उत्तर देणार ...
"You are enjoying rain without me... :( "
"अरे वेडू ... I am missing YOU... with Rain!!"
:)

असे हे आठवणींचे आवर्त सुरू होते.. सार्‍या भावनांचा कल्लोळ ..
अन् ते शमवायची ताकद सुद्धा त्या पावसाकडे..
किती वाट पाहावी.. किती झेलावे ... किती भिजावे…अंतर्बाह्य …

कुणी धाडिले हे घनु जांभळे
कुणी वेढिले हे ऋतू कोवळे
नभातून वाहे व्यथा मुक्त हळवी
डोळ्यातूनी अन् हसू साकळे !!!

"तू न मी" हातात हात घेऊन तळव्यावर पाऊस झेलताना
ठाऊक असतील त्याला.. कोसळणार्‍या सार्‍या रात्री..
पापण्यांवर आणून परतवलेला सारा पाऊस..
बरसलेल्या सार्‍या आठव सरी

पण या वेळी मात्र पाऊस तुझा न माझा असणार न...
तुला स्पर्श करून माझ्याकडे येईल तो... चिंब करायला..
तुझे श्वास घेऊन येईल.. मृदगंध होऊन भारायला..
अन् तू होऊनच बरसेल.... अंतर्बाह्य …

:)

- भक्ती आजगावकर




Wednesday, June 15, 2011

श्रावणरात




चिंब नाहलेली एक ओली श्रावणरात 
वेड लावीत मनाला रिमझिम बरसात 
एक वणवा पेटला उभ्या तनात मनात 
गोड स्वप्नाच्या आशेत माझी निरांजनी वात ..!! 

दूर मनाच्या रानात दाटे हळदीचे ऊन 
तेव्हा अनोखी लकेर उठे कोण्या पाव्यातून
माझे सर्वांग आतुर भरतीच्या लाटातून 
वार्‍यासवे तुझा स्पर्श भिने रंध्रारंध्रातून ..!!

निंब कदंब तरुच्या पागोळ्यांची वेडी माया 
थेंबाथेंबाचा आरसा रूप तुझेच पहाया 
येई भिजले पाखरू तुझा निरोप द्यावया 
तव स्मृतीची झुळूक मोहरते सारी काया ..!!

नागिणी सम वेढे रात्र डंख तुझ्या आठवांचा 
स्वप्नवत आरशात खेळ चाले चेहऱ्यांचा
कधी दाटे सभोवार गंध धुंद सुगंधाचा 
जाई पैल आकाशाच्या माझा झोका झोपाळ्याचा ..!!

काय आगळीक घडे का हे मन बहकले 
वाट रोजचीच तरी थबकती ही पाऊले 
आता पावेतो असे ना कधी आगळे घडले 
तुझ्या सोबतच माझे मन दूर रे चालले ..!! 

- भक्ती आजगावकर



जालरंग प्रकाशना तर्फे प्रकाशित झालेल्या ऋतू हिरवा २०११ या अंकात हि सामील झालीय... त्याची लिंक ...
http://varshaavisheshaanka2011.blogspot.com/2011/06/blog-post_2719.html