चिंब नाहलेली एक ओली श्रावणरात
वेड लावीत मनाला रिमझिम बरसात
एक वणवा पेटला उभ्या तनात मनात
गोड स्वप्नाच्या आशेत माझी निरांजनी वात ..!!
दूर मनाच्या रानात दाटे हळदीचे ऊन
तेव्हा अनोखी लकेर उठे कोण्या पाव्यातून
माझे सर्वांग आतुर भरतीच्या लाटातून
वार्यासवे तुझा स्पर्श भिने रंध्रारंध्रातून ..!!
निंब कदंब तरुच्या पागोळ्यांची वेडी माया
थेंबाथेंबाचा आरसा रूप तुझेच पहाया
येई भिजले पाखरू तुझा निरोप द्यावया
तव स्मृतीची झुळूक मोहरते सारी काया ..!!
नागिणी सम वेढे रात्र डंख तुझ्या आठवांचा
स्वप्नवत आरशात खेळ चाले चेहऱ्यांचा
कधी दाटे सभोवार गंध धुंद सुगंधाचा
जाई पैल आकाशाच्या माझा झोका झोपाळ्याचा ..!!
काय आगळीक घडे का हे मन बहकले
वाट रोजचीच तरी थबकती ही पाऊले
आता पावेतो असे ना कधी आगळे घडले
तुझ्या सोबतच माझे मन दूर रे चालले ..!!
- भक्ती आजगावकर
जालरंग प्रकाशना तर्फे प्रकाशित झालेल्या ऋतू हिरवा २०११ या अंकात हि सामील झालीय... त्याची लिंक ...
http://varshaavisheshaanka2011.blogspot.com/2011/06/blog-post_2719.html
खूप सुंदर कविता.... :)
ReplyDelete