Showing posts with label तजेला. Show all posts
Showing posts with label तजेला. Show all posts

Tuesday, August 2, 2011

"कॅफे कॉफी डे"


सार्‍या कॉफीप्रेमी अन "कॅफे कॉफी डे" प्रेमींसाठी समर्पित ....  

अलगद निसटुनी डोळ्यामधुनी हृदय तरंगे कॉफी वरती  
कितीक स्वप्ने आयुष्याची फेसावर उमलती न विरती !!!

गंध कडक हा एक्स्प्रेसो चा कडू घोटासह दु:ख जरी 
कॅपुचिनो ची सदैव सोबत साखर दुध न क्रीमसोबती !!! 

लॅंटे चा एक घोट मनस्वी गंध चव कॉफीची खरी 
पंचेद्रीयांनी उपभोगावी स्वर्गच जणू धरेवरती !!! 

अशी शिकवते एकच कॉफी जगण्याची रीत ही न्यारी 
माहोल "कॅफे कॉफी डे" चा मिठ्ठाससे क्षण स्मरती !!!  

- भक्ती आजगावकर


Sunday, July 10, 2011

कॉफी ..!!!


काही काही कनेक्शन्स अगदी जुळून आलेले असतात न... जणू एकमेकासोबत असावे असेच... असेच एक गहिरे नाते... आपण अन कॉफी यांचे ..  

धुंद कोसळता पाउस.. खोलीचा आवडता कोपरा.. आभाळ दाखवणारी फ्रेंच विंडो .. द्रुत लयीत आलेली शुभा मुदगल यांची तान.... नी हातात दरवळत्या कॉफीचा मग ... 
स्वर्ग स्वर्ग धरेवर म्हणतात .... तो अजून वेगळा असतो का.. 

आठवणींच्या लडी एकवार उलगडू लागल्या की किती विविध रंगी गुंता होत जातो स्वत:भवती...  किती तलम रेशमी धागे उलगडत जातात बांधून ठेवलेले ते क्षण, ते बंध, ते स्पर्श... 

किती अन कशी, ही अशी कॉफी साथ करत राहते आपल्याला.. आपल्या जगण्याचा एक भाग बनत..

कधी परीक्षेच्या रात्रींत डोळे फाडून अभ्यास करताना... वेलदोड्याच्या वासासोबत आईची माया जाणवून देणारी... 
कधी कॉलेज मधून लेक्चर बंक करून अश्याच पावसात घेतलेली... मैत्रिणींच्या घोळक्यात ...गप्पात ... सगळ्यांच्या हातात फिरत हाती रिकामा मग कधी आला हे सुद्धा न कळलेली ... अन मग कॉलेज च्या कट्ट्यावर सवयीची होऊन गेलेली .. 
कधी सगळ्यांना चुकवून, धडधडत्या हृदयाने अन थरथरत्या हाताने पकडलेला तो सिसिडी चा मोठ्ठा कप... "हातातून तो कप सुटेल की ओंजळीतून हृदय" अशी त्या कॉफीवरच्या क्रीमच्या नक्षीत हरवलेली ...
कधी एकटेपणात त्याच घोटाघोटातून "प्रिय" च्या सुगंधी आठवणी जागवणारी ...मनात रुंजी घालत सारी संध्याकाळ श्यामविरही करणारी... 

इतकी जिव्हाळ्याची साथ देते कॉफी... शेवटच्या थेम्बा पर्यंत ... डोके भन्नाट उलट सुलट फिरत असताना अन टोकाचे विचार आजूबाजूला पिंगा घालत असताना .. जिवलग मित्रासारखी सोबत करणारी.. समजावणारी ..अन संपता संपता आपले विश्व ताळ्यावर आणणारी सुद्धा...  किती पेल्यातली वादळे याच कॉफीमग मध्ये शमतात.. 

अशी प्रत्येकासाठीच आठवणीनी मधुर बनलेली कॉफी ... या कॉफी पुराणात सरतेशेवटी आठवतोय तो शांताबाई यांनी केलेल्या एका जपानी हायकुचा भावानुवाद .... 

"कॉफी हाउस
प्रत्येक टेबल भवती 
स्वतंत्र पाऊस ..." 

एकच कॉफी हाउस पण प्रत्येक टेबल वर नवीन माणसे...  अन त्यांना भिजवणारे त्यांचे क्षण .. अनुभव, त्यांच्या आठवणी, स्वप्ने.. गप्पा ..अन अजून कितीतरी शेअरिंग ... असा हा प्रत्येकाचा स्वतंत्र पाऊस ... 

अश्या तुमच्या आठवणींचा पाऊस एव्हाना तुमच्याही भोवती सुरु झाला असेल न..  

सो Enjoy.. तुमची कॉफी अन तुमचा पाऊस माझ्यासोबत !!! 
:) 

- भक्ती आजगावकर 

फोटो आंतरजालाहून साभार 

Tuesday, June 28, 2011

तुमचे सुद्धा होते का असेच...




एक दिवस असा छान उगवतो... 
ट्रेन मध्ये वाऱ्याची खिडकी, ऐसपैस जागा अन हातात आवडीचे पुस्तक...  
गाडी, क्षण अन आपले विचार  .. सारेच एका दिशेत एका वेगात धावत असतात... 
समांतर .....
जाणीवच नसते आपल्याला..
आजूबाजूच्या कोलाहलाची.. गर्दीची...किती स्टेशन्स मागे गेले त्याची ..  
आपण मग्न असतो आपल्याच विश्वात ...


अन मग एक जादू होते... 
अचानक कुठूनसा मोगरयाचा वेडा सुवास भरून टाकतो आपले भवताल ... 
डझन दोन डझन गजरे घेऊन आलेली असते एक गजरे विकणारी बाई ... 
अन तिच्या हातात ते गजरे घमघमत असतात...


वेडावून टाकणारा ... जुन्या आठवणी जागा करणारा.. मोगरा... 
कधी देवाच्या पायाशी वाहिलेली मोजकी फुले.. कधीतरी आईच्या अंबाड्यावर माळलेला गजरा.. 
दिली-घेतलेली मोगऱ्याची अर्धोन्मीलित कळी... 
किती सुगंध मनात एकत्र जागवतो हा मोगरा... 
मनात आठवणीचे तरंग उठवत अल्लद पुढे जाणारा..  

मागचा पुढचा काही विचार न करता आपण विकत घेतो ते गजरे...
अन भरून घेतो अवघ्या श्वासात ... हुंगून घेतो भरभरून ... 
पुन:प्रत्ययाचा आनंद घेत... विसावतो त्या क्षणावर .. अलवार .. 

अन मग पुढच्याच वळणावर नवीन बाई ... हातात सोनचाफा दाखवत... 
आपण हसून दाखवतो तिला हातातले गजरे... अन हलकासा नकार... 
कळत नाही तेव्हा...त्या क्षणाला... की कसला जीवघेणा नकार दिला असतो आपण स्वतःलाच !!

बाई पुढे सरकते... डब्बाभर हिंडून त्या फुलांचा सौदा करते...  
अन आपला जीव वर खाली... पर्समधून नाणी काढून हातात खेळवत आपण नजर लावून असतो.. 
की कधी तिचे लक्ष जातेय... अन कधी मी चुकीची भरपाई करतेय ... 

पण असे व्हायचेच नसते.. 
तिचे काम संपवून ती विसावते एका कोपऱ्यात... आवराआवर करून निवांत वारा खाते... 
सगळी फुले निमूट तिच्या पिशवीत आपला गंध आवरून सावरून बसतात... 

अन आपल्या हातातल्या नाण्यांना मग काडीची किंमत उरत नाही...
हिरमुसून परत जातात ते पर्स मध्ये.... 
ओंजळभर मोगऱ्याचे गजरे घेऊन सुद्धा सोनचाफा बाजी मारून गेलेला असतो... 
मनातला सल निवळता निवळत नाही...

असे का होते.. तुमचे सुद्धा होते का असेच... 

ता. क. : आपले स्टेशन येते... आपण उतरायला दरवाज्यापाशी जातो... 
तिथे एक वेडा अर्धामुर्धा सोनचाफा टाकून गेलेली असते  ती बाई... 
तिच्या लेखी त्याला भाव नसतो येणार .. पैश्यात... :)  
आपण उचलतो तो वेड्यासारखा ... तो अर्धामुर्धा चाफा अन पूर्ण वेडे आपण ... 
येतो घरी एकमेकांना साथ करत.... खुशीत...  :)


Sunday, June 12, 2011

वर्षा



वर्षाऋतूच्या या नव्याकोरया थेंबाची नक्षी ..
नव्या कोरया पानांवर...
गोऱ्या गुलाबी गोंडस नवपालवी सारखा मनाचा तजेला कायम राहो !!!

-भक्ती आजगावकर