Friday, March 8, 2013

पदर ...


पदर ...
नक्षीदार पदर ...
रेशमी साडीचा...बुट्टीदार काठाचा .. जरतारीच्या मोराचा
वयात येताना आपसूकच चापून-चोपून खांद्यावर विसावलेला...
सौभाग्याचे लेणे होऊन आदरार्थी डोक्यावरून दुसरया खांद्यावर रुळलेला ..
आपल्याच जीवाच्या गोळ्याला पाजताना कधी अलगद मायेची पाखर झालेला..

अश्या पदराचे किती पदर येऊन चिकटलेले बाईपणाला
देवीपणाची झूल पांघरून पुतळा करून ठेवणारा ...
कधी गर्भातच नशिबाची रेघ पुसणारा ...
उंबरठ्याआड चेहरा लपवत जगणारा ..
जातायेता कधी कुत्सित नजरांनी थेट पदराच्याही पलीकडे स्पर्श करू पाहणारा ..
नाहीतर मग त्याच हातानी पदर फेडून स्त्रीत्वाचा मानभंग करणारा ...

ह्या अश्या निर्वस्त्र देहाकडे उठलेल्या तुझ्या नजरेला कधी हे कळलेच नाही की,
दोन चार शारीरिक भिन्नत्व ... काही हार्मोन्सचा फरक .. या पलीकडे तुझ्या आणि माझ्या देहात काडीमात्र फरक नाही...
सांगाडा, देह, रूप, रंग अश्या वरवरच्या गोष्टींपलीकडे ..
एक मेंदू, एक हृदय, एक मन... तुलाही आहे... मलाही ...
जाणीवा, अस्मिता, स्वप्न आशा.. या सारयांची गोळाबेरीज करून जे जगणे होते.. तेही तुझ्याच सारखे...
घर अंगण कुटुंब गोतावळा... त्यातही तसूभर फरक नाही... नव्हताच..
मग हे अवडंबर कशाचे...
आदिम काळापासून जेव्हा त्या पदराचे अस्तित्वच नव्हते...
त्याही काळी तू होतास...अन मी ही होतेच ...
कदाचित त्याच काळात परस्पर सन्मानाचे युग असावे..
शारीर जाणिवांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती.. एक माणूस म्हणून जगण्याचे भान असावे ... असावे का? 


आता या क्षणाला... या युगात ..
अश्या विविध अर्थी पदराचे कितीसे पापुद्रे अजून ओरबाडावे लागतील..
किती देहांना अजून विदेही व्हावे लागेल...
की मग या समाजपुरुषाला जाग येईल... कधी ?? 


कधी, तू आणि मी मधले हे बाईपणाचे अंतर मिटेल ..
दुय्यम असल्याची... "भोग्य" अशी वस्तू झाल्याची जाणीव मिटेल ..
एक माणूस म्हणून लिंगनिरपेक्ष जगण्याची अपेक्षा करता येईल...
कधीतरी येईलच ...
त्यावेळी हा असा "एखादा"च दिवस विशेष करावा लागणार नाही...

जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा ३६५ दिवसांसाठी ...

- भक्ती आजगांवकर

छायाचित्र आंतरजालाहून साभार


12 comments:

  1. Apratim...Tulahi Khup Khup Shubhecha... 365 Divsansathi... :)

    ReplyDelete
  2. :)
    शुभेच्छा तुलाही प्रीती ...

    ReplyDelete
  3. छान झालय नक्कीच!
    अर्थात अशे ३६५ दिवस असतील तर ३६५ पोस्टा पडल्या तर किती आनंदच!
    मोझार्ट बाबा भेटले चुकून फिरता फिरता, वरून पोस्ट पडली, म्हणून देतोय इथे
    https://www.youtube.com/watch?v=7lC1lRz5Z_s

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अभिषेक...

      ३६५ दिवसांचा बेत.. तुमच्या आनंदांत आम्हाला आनंद :)

      मोझार्टची सिम्फनी सिम्पली ग्रेट ... सुरावटीवरून जीव तरंगत जातो... मस्तच !!!

      Delete
  4. Replies
    1. धन्यवाद इंद्रधनू ... :)

      Delete
  5. अतिशय आवडली पोस्ट !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तन्वीताई !!

      Delete
  6. वाह! अगदी नेमकेपण आहे शब्दाशब्दांत! भावली गं!

    ReplyDelete