Monday, November 7, 2011

कवडसे



हे असेच व्हायचे होते का ... 

आपल्याच नकळत श्वासासोबत आपण ही जगत जातो सामोरा आलेला क्षण.. आजूबाजूच्या घटनांना कवेत घेऊन.... धावत कधी .. कधी धडपडत... अन या धडपडीत कधी तरी गवसलेला तू... 

आठवतं का तुला... भांडलोच होतो चक्क आपण..(म्हणजे मी!!).. पहिल्या भेटीत... ते पण एका रिक्षावरून.. वरून कोसळणारा पाऊस अन ऑफिसची महत्वाची मिटिंग .. त्यात एकाच रिक्षामध्ये शिरलेले आपण दोघे.. मी तर पूर्ण आवेशात तुला बाहेर काढायलाच तयार ... "पण ठिकाण एकच न तर एकत्र जाऊ" या तुझ्या बिनतोड उत्तरावर मी गपगार... खरेतर त्या भांडणात जिंकण्यापेक्षा.. त्या क्षणाची गरज म्हणून !!! 

अन त्यानंतर अवचित झालेल्या गाठीभेटी... कधी हो ना करता करता सुरु झालेले कॉफीसत्र ... कधी दिले घेतलेले मोबाईल नंबर्स ...अन फोरवर्डस वाचता वाचता कधीतरी सुरु झालेला संवाद ... अन या सर्वांत तु कधी जगण्याचा एक भाग बनत गेलास हे देखील कळले नाही ... सकाळ तुझ्या गुड मॉर्निंगने झाली नाही तर चुकल्याचुकल्या सारखे व्हावे.. अन दिवसभरात केव्हाही एक हक्काचा श्रोता म्हणून मी तुझ्या आश्रयास यावे... इतके सहज ..इतके सुभग ..सोपे सोपे से होऊन गेले होते .. 

पण हे सारे तुझ्यासाठी एका छान मैत्रीचा भाग होता .. तुझ्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा सहज आविष्कार..!!
 .. 
कधीतरी बोलता बोलता निघालेला तुझ्या लग्नाचा विषय ...अन गोठून गेलेले मी... 
म्हणजे तेव्हाही आपल्यात काय आहे न पुढे काय बदलेल याचा अंदाज नव्हताच म्हणा.. पण तुझ्याशिवाय पुढे काय याचा विचारच येईना..!!
कसलेसे अनोळखी काहूर घेऊन परतलेले मी.. 

स्वत:शीच या सारया गोष्टींचा ताळमेळ मांडायला बसले तर आठवणींचा धबधबाच कोसळला मनभर ... 
कितीतरी जुळलेल्या आवडीनिवडी सहज शेअर केल्यासारख्या... 
गप्पा, गाणी, भटकणे, खाणे.. कविता, गझला, अभंग, दोहे... सूर ताल ठेका लय .. कसले कसलेच वावडे नव्हते... 

उलट श्वासासह निरंतर सुरु असेल असे गाणे जणू जगण्याचाच भाग होते... दिवसाची सुरुवात अन शेवट सुद्धा गाण्यानेच करण्याची कल्पना तुझीच ... त्यावरून दिवसाचा मूड जोखण्याचे कसब असेच मुरत गेलेले तुझ्यात माझ्यात.. अन त्याच शब्दांच्या आश्रयाने त्या त्या दिवसाची मलमपट्टी पण ... आनंदाला आनंदाची दिवेलागण, विजयाला कौतुकाची थाप अन हळव्या दुखऱ्या क्षणाला दूरवरून का होईना पण "मी आहे"चा आधार ... 

कितीतरी अनवट कवितांचा अर्थ असा तुझ्या सोबत बोलता बोलता कळला होता.. 
कितीदा तरी गुलमोहर तुझ्या न माझ्या साक्षीने फुलला होता 
कितीतरी संध्या तुझ्या न माझ्या अश्या सोबतीने भिजल्या होत्या ... 
अन कितीतरी पाऊसरात्री स्वप्नासह रुजल्या होत्या ..

पण.. तरीही तू माझा होतास..? तुला कधीच कळले नाही का रे...? माझे शब्द कधीच बोलले नाहीत तुझ्याशी..?? नजर कधी ओझरते देखील हितगुज सांगून गेली नाही ... ? की हे सारे कवडसेच होते माझ्याच अपेक्षांचे? प्रकाशाची दिशा बदलली कि बदलून जाणारे .. 

तू तर अजून ही तसाच ... तेवढाच ओढाळ...स्नेहाळ... तेवढाच आत्मीय ...

अन मी ..? सलील् सीमेवर उभी ... !!! 


- भक्ती आजगावकर 

10 comments:

  1. sundar... ashach kahi athvani datun alya.

    ReplyDelete
  2. हे ही भलतेच अवघड असते!
    तुझा हा 'सलील-सीमा' शब्द फार आवडतो बुवा आपल्याला! आणि लेखाच्या शेवटी त्याचा वापर करून वाचकाला अगदी तिथेच सोडून, जातेस तू दूर निघून... त्या क्षितिजाच्या टोकावरून हसत बसत... मग न क्षितीज हातात येत, ना तू...
    अगदी काळजाच्या आतून मोती वेचून लिहील आहेस्... अपेक्षांनी प्रकाशाची दिशा बदलली आणि कवडसे पडले! निव्वळ वाह वाह!
    वरती छापलंय खर सगळ, पण ती राधा काही मनातून जात नाहीये... आता किती काळ मला तिची सोबत, काय माहित!

    ReplyDelete
  3. शब्दांच्या निवडीसाठी दाद! बाकी लेख अप्रतिम!!!

    ReplyDelete
  4. tejachya tevhdyach kirnani [read kavadsyane]pan ujalun gelay jeevan....ani tuzya athvanini darvalun taklay pratyek kshan....maza man fakta tuza....chirkal..

    ReplyDelete
  5. योग न मनाली धन्यवाद... :)

    ReplyDelete
  6. सौमिती...
    आठवणीच ग...
    वेडावलेल्या.. लाडावलेल्या...
    सगळ्या दाटून आलेल्या...
    मनाभोवती पिंगा घालत
    शब्दांसोबत जगलेल्या ...

    :)
    भक्ती

    ReplyDelete
  7. अभिषेक... :)
    अवघड .... :) नक्कीच..
    अन सलीलसीमा... शब्दच ओढ लावणारा लोभसवाणा आहे ...
    पाण्याची सीमा... असते का... असलीच तर कुठे... कशी...
    एकूणच निसरडी वाट...
    अन राधा... हो ..एक कृष्ण अंतरी असला...तर राधेची सोबत अखंड असते न... !!!

    ReplyDelete
  8. कृष्ण सखी ...

    ब्लॉग वर स्वागत अन धन्यवाद... :)

    ReplyDelete