Wednesday, October 17, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ७



दिवस सातवा




हाही दिवस असाच पहाटे उठतो...
आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो..
सकाळीच पूजा, आरती करून शेजारयाना आग्रहाने घरी बोलावतो...
पुन्हा नवीन फुलांची आरास, रांगोळीची नवीन नक्षी, नैवेद्याचे नवीन पान घेऊन सुखावत राहतो ..










स्वयंपाकघरात मात्र आज लगबग ऋषिपंचमीची... ऋषीच्या स्पेशल भाजीची... 
अळूची पाने अन देठ बारीक चिरून , लाल माठाचे खोड व पाने बारीक चिरून, लाल भोपळ्याचे लहान तुकडे, दोडकयाचे तुकडे, मक्याचे दाणे किंवा कोवळ्या कणसाचे मोठे तुकडे. आंबाडी असे सारे जिन्नस आणि नावाला तेल आणि चवीपुरते मीठ घालून चुलीवर शिजवत ठेवले जाते... चुलीच्या मंद आचेवर अन नंतर वैलावर मंद्श्या धगीत भाजी शिजत राहते .. सारे जिन्नस गुण्यागोविंदाने एकजीव होतात.. अंबाडीचा हलका आंबटपणा मुरत जातो भाजीत .. मक्याची कणसे सारा भाजीचा रस पिऊन मऊ शिजून येतात... अशी हि भाजी दुपारी बाप्पाच्या नैवेद्याच्या पानात प्रामुख्याने वाढून घेतो दिवस... गणपतीला नैवेद्य दाखवून झाल्यावर पंगतीत आग्रह करकरून वाढली जाते अन तितकीच चढाओढीने खाल्ली जाते... 
दिवस असा ऋषीपंचमीचा आनंद लुटून घेतो भरभरून ..



पण त्याच वेळेस, आज विसर्जनाचा दिवस हा विचार मनात येताना खट्टू सुद्धा होतो...
संध्याकाळी, शिदोरीचे समान बांधून गणपतीकडे देताना हात जडावतो दिवसाचा..
विसर्जनापुर्वीची आरती जराश्या भरल्या गळयानेच म्हणतो हा दिवस ... टाळ-टाळ्या या लयीत येत असल्या तरी दाटून येणारे कढ मात्र आरतीसोबत मनात जिरवत राहतो...







"गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लौकर या" हे निमंत्रण साश्रू नयनांनी गणपतीच्या पायी रुजू करतो...
"तुझी यथाशक्ती पूजा केलीय ती गोड मानून घे... तुझा शुभाशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे.." इतकेच मागणे मागून पूजा संपन्न करतो...
उत्तर पूजेचे तांदूळ देवाचरणी ठेवताना... मूर्ती हलकेच हलवताना त्याचे हात कंप पावतात ...
पुढच्या वर्षी परत येणार हे ठाऊक असून देखील या साजिरया मूर्तीत जीव गुंतत राहतो त्याचा... 
दाराशी पुन्हा एकदा रांगोळी रेखून, घराकडे तोंड करून बाप्पाला ठेवले जाते... पाय धुवून, हळद कुंकू लाऊन, लांबच्या प्रवासाची शिदोरी हाती देऊन बाप्पाला निरोप दिला जातो अन मग घरची मंडळी बाप्पाला डोक्यावर घेऊन समोरच्या तळ्याचा रस्ता धरतात..




"पायी हळू हळू चाला.. मुखाने मोरया बोला... मोरया बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लौकर या!!" च्या गजरात बाप्पाला मग तळ्याकाठी आणले जाते... रांगेत साऱ्या घराचे गणपती आपापल्या घरी पाहुणचार घेऊन तृप्त होऊन आलेले असतात .. त्यांची पुन्हा एकदा आरती होते... हिरव्या पार्श्वभूमीवर रंगीत गणपतींची ओळ अन त्यांच्या पुढे भावभक्तीत नादावलेली निरांजने हलताना पाहता पाहता अस्पष्ट होतात.. डोळ्यात साठणारया पाण्याने... 






एकेक म्हणता म्हणता बाप्पांना तळ्यात निरोप दिला जातो...   पाट उचलून काठावर घेऊन जाताना... तळ्यात बाप्पांचे पाय भिजवताना... पुन्हा उचलून पुन्हा एकदा तळ्यात हलकेच सोडताना.. नजर मागोवा घेत राहते...हात आपसूक जोडले जातात अन मनात परत हाच आग्रह बाप्पाला... "पुन्हा या... लौकर या.. आठवण ठेवा ..."
फळांच्या कापलेल्या फोडींचा/ लाह्या साखरदाण्यांचा प्रसाद वाटला जातो.. अन अश्या निरोप समारंभात दिवस उदासून अंधारून यायला लागतो...

घरात पुन्हा येऊन रिकाम्या माटी खाली पाट ठेऊन पुन्हा एक छोटीशी आरती.. बाप्पा त्याच्या मुक्कामी नीट पोहोचावी या कामनेसह...
अन मग उरलेली संध्याकाळ दिवस पुन्हा पाहत बसतो गणपतीसाठीची आरास.. मनात साठवलेले रूप पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून, बाप्पाने पाहुणचार नीट करून घेतला ना या समाधानासह दिवस सुखाने मावळतो...


यापुढचे कोकणातले दिवस .. ते ही स्पेशल..
कोकण किनारयाचे..आसपासच्या स्थलदर्शनाचे..
रेडीच्या प्रसिद्ध गणपतीचे..आरवलीच्या वेतोबाचे.. मालवण - तेरेखोलच्या किल्ल्याचे, सागरेश्वराच्या नितळ किनाऱ्याचे, वेंगुर्ला बंदराचे..
मासळी बाजाराचे.. ताज्या फडफडीत माश्यांचे.. कोळणीशी घासाघीसीचे.. आणि तापल्या तव्यावरच्या ताज्या तुकडीचे..
हॉटेल बांबूचे..त्यातल्या खमंग कुरकुरीत बोंबील, कोळंबीचे ... पण त्या बद्दल पुन्हा कधीतरी ...
...

असे हे दिवस... आल्यापासून गणपतीचा जल्लोष होईतो कापरासारखे उडून जातात...
लॅपटॉप, प्रॉजेक्ट्स, डेडलाइन्स, ईमेल्स, मिटींग्स या साऱ्या कल्लोळातून बाहेर, जरा मोकळी हवा.. एक मुक्त श्वास..
आपल्याच माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण ... एकमेकांना सावरत सांभाळत जगलेले काही क्षण .. कुटुंबाचे .. मोठ्या कुटुंबाचे ..


काय नेमके भावते ... गणपती उत्सव..देव - देवत्व .. पण इतकी निस्सीम भक्ती उरलीय का आपल्यात अजून ...??
पण वाडवडिलांनी उभे केलेले विश्व, त्यांच्या जगण्याचा महत्वाचा भाग असलेले स्थळ-काळ रितीभाती काही कालावधीसाठी तरी निदान मागे वळून पहाव्यात.. त्याच्या विश्वाचा भाग असलेले काही क्षण त्याच स्वरुपात अनुभवावेत.. त्या निमित्ताने त्यांच्या जगण्याचा एक अंश आपल्या जगण्यात उतरावा ... ह्याच एका सुत्राने सारा कोकणचा चाकरमानी न चुकता दरवर्षी गावी परतत असावा का.... आम्ही पण त्याच एका भावनेची नाळ जोडून पुन्हा मागे वळतोय का... ??? की प्लास्टिक थर्माकोलचा कणभर ही वापर न करता संपूर्णपणे नैसर्गिक रीतीने साजरा केलेला उत्सव, कानठळ्या बसवणाऱ्या डीजे पासून दूर, तमाम गर्दी गोंधळापासून दूर असा शांत माहोलाचा उत्सव म्हणून ..?? एका कुटुंबाचा एक गणपती असावा.. घरे वेगळी झाली तरी या निमित्ताने माणसे अन त्यांची मने जवळ यावीत.. किल्मिष दूर होऊन तिथे समईसारखा नातेसंबंधांचा आणि संस्कारांचा मंद उजेड पडावा म्हणून .. काही असो .. पण या कोकणच्या गणपती उत्सवाची भुरळ पडते मनाला ...
तसेही बुद्धीचा, विद्यांचा, कलेचा अधिपती म्हणूनच पाहतो न आपण गणपतीकडे... त्यानेच ही बुद्धी दिली असावी !!
शतकानुशतके ती झिरपत राहिली असावी कोकणच्या मातीत... चाकरमान्याच्या रक्तात ..
म्हणूनच देहाचा कण कण गजर करतो ... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लौकर या !!!!

एव्हाना या साऱ्या अनुभव विस्तारात, देवीचे आगमन ही झालेय... दिव्यत्वाचा शक्तीचा जागर सुरु झालाय..
तेव्हा ह्या आदिमायेच्या जागराच्या कामना ...  
" या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता..नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:"

  


अन या कामनेसह ..
इति कोकणस्य दिवस पुराणं संपूर्णम .. !!! :)



- भक्ती आजगांवकर






दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ५
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६

Friday, October 12, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६

दिवस सहावा...




अन मग हा उत्सवी दिवस उजाडतो भल्या पहाटेच...

मूर्ती स्थानापन्न होते सजवलेल्या माटीच्या मखरात...मागे रंगवलेले चित्र आता अजूनच पूर्ण वाटते...






गणपतीच्या आसपास सारवणाचा एक हात नव्याने अन मग सुरेखशी रांगोळी उमटते आसनाभोवती, आजूबाजूला अन उंबरठ्यावर... घरासमोर ..

 "उठी उठी गोपाला" अशी आर्जवी सूर आसमंतात घुमत कानात रुंजी घालतात...
 रंगीबेरंगी फुले सकाळीच उमलून येतात .. बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी..

समया आपल्या वाती तेजस उजळतात .. लामणदिवे स्निग्ध प्रकाशाने मूर्तीला न्हाऊ घालतात ... उदबत्यांचा मधुर सुवास मंद मंद पिंगा घालतो...







आन्हिकं अन तयारी आटपून नव्या कपड्यानिशी सारेच तयार गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी ..

त्याआधी हरतालीकेला दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग उत्तरपूजा केली जाते... अन समोरच्या तळ्यात विसर्जन ....





मग गुरुजी येऊन यथासांग पूजा सांगून मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करतात ..
मंत्रोच्चारणाने गणपतीची खोली भारून जाते... टाळ अन टाळ्यांच्या संगतीने प्रथमेशाची आरती सुरु होते ...

इथे स्वयंपाकघरात नैवेद्याच्या जेवणाची लगबग कधीची सुरु झालेली असते ..
पाच प्रकारच्या भाज्या, गोडे वरण, सुगंधी भाताच्या मुदी, घरी कढवलेले तूप, वर तुळशीचे पान अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदक...
नारळाचे खोबरे, गुळ, वेलची, जायफळ याने सिद्ध सारण अन तांदळाच्या पीठाची शुभ्र उकड...
 या दोन्हीचे मन लाऊन बनवलेले सुबक मोदक .. मोद देणारे... गणपतीचे खास आवडते... पारीच्या नीटस पाकळ्या काढून अन हलक्या हाताने त्या पाकळ्या वर जोडून सुंदर मोदक करणे हे आता आजच्या पिढीकडे पण पोहोचलेले..

नैवेद्याची पाच खाशी केळीची पाने मांडून, गणेशाचे २१ मोदकांचे अन त्या सोबतच उंदीर मामांचे, गायीचे पान मांडून रीतसर आचमन करून नैवेद्य दाखवला जातो... अन दिवस मग पंगतीला बसतो ..वाफाळत्या मोदकाच्या शेंडीला जरा हलवून धारेला जागा करत सारणावर साजूक तूप अलगद बसते... अन आग्रह करकरून पानात वाढले जाते...

आरतीच्या सुरेल आवाजावर, गणपतीच्या आसपास वावरत, आल्यागेल्याना प्रसाद वाटत रेंगाळत राहतो हा दिवस...
समयीचे तेल पाहत, नवीन उदबत्या लावत, मूर्तीकडे डोळे भरून पाहत वेळ कसा सरतो तेही कळत नाही...


मूर्तींचे दागिने- भिकबाळी, चांदीच्या दुर्वांचा हार, लालचुटुक जास्वंदीचे फुल, नवीन आणलेल्या कंठ्या, हातातले गुळ भरलेले चांदीचे मोदक, संध्याकाळचे नवीन फुलांचे हार, दुर्वांच्या जुड्या विसावतात गणपतीच्या अंगाखांद्यावर .. मूर्ती अजून तेजस अजून राजस वाटत राहते.. आपली आपलीशी वाटत राहते...

अन मग दिवस वाट पाहतो ती सर्व घरात जाऊन पहिल्या दिवशी भजन करणाऱ्या मंडळींची... कान कानोसा घेत राहतात टाळ मृदुंगाच्या आवाजाचा... अन वाडीतील एकेक घरी गणपतीसमोर भजन करून भजनी मंडळी आपल्या घरी ठाकतात ... इतक्या सारया माणसांचे एका तालात एका सुरात भजन सुरु होते... टाळ मृदुंगाचा ठेका, टाळ्यांचा गजर आणि रंगणारया आरतीबरोबर आणि "घालीन लोटांगण वंदिन चरण" च्या टिपेला पोहोचणारया तालासोबत दिवस खुश होऊन जातो... भजनकरींना आग्रहाने आलेपाक वाटतो ... स्वत: वाडीतल्या बाकी घरात जाऊन भजनात सामील होतो...

संपूच नये असे वाटते का या दिवसाला..??? उत्सवी मंगल भावना घेऊन तृप्त असतो हा दिवस...








- भक्ती आजगांवकर

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ५

Tuesday, October 9, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग 5


दिवस पाचवा..


हा दिवस गाजवत येतो तयारी हरतालिकेची अन गणपतीची .. सुरु होतो तोच वाजत गाजत ..
पुन्हा एकदा वारी बाजाराची... तयारी हरतालिकेची..


साजिरया मुर्त्या अन पूजेचे सामान, उपासाची शहाळी, फळे यांच्या खरेदीची लगबग...
आणि त्या बरोबर खरेदी कोकणातल्या खासमखास गणपतीच्या माटी (माटवी)ची ..
गर्दीने फुललेल्या बाजारात सर्वत्र साम्राज्य या माटीच्या सामानाचा...





न पाडता उतरवलेले नारळ, मुळासकट असलेले हळदीचे रोप, लाल माठाचे मूळ, तेरड्याचे रोप, विड्याची पाने, सोललेल्या सुपारया यांच्या सोबत हिरव्या-भगव्या सालासकट सुपारया, कमळाची नाजूक फुले, विविध प्रकारची रानफुले, केळी, काकड्या, चिकू यांच्या सोबत फुल-पत्री-फळे-शहाळी यांची बाजारात रेलचेल असते.. सोबत हरिणीची नाजूक फुले..   
जड पिशव्यांनी अन माटीच्या सजावटीच्या चर्चा करत घरी येतो दिवस...

घरातल्या पुरुष माणसांची जेवणं आटपली की मग दिवस सुरु करतो हरतालिकेच्या पूजेची तयारी ...
सकाळपासूनचा निर्जळी उपास .. 
घराभोवतालची पाच तऱ्हेची पत्री जमा करणे.. पूजेच्या जागेवर नवीन सारवण, सुबकशी रांगोळी अन मग.. पाटावर महादेवाची पिंडी, हरतालिकेच्या सुंदर मूर्त्याची मांडणी, त्यांची हळद कुंकू, महादेवाचे कापसाचे पांढरे अन देवींच्या हळद कुंकवाने रंगलेल्या वस्त्रांनी, फुल-पत्रीनी, दुधाच्या नैवेद्याने यथासांग पूजा झाली कि मग उतरत्या उन्हाच्या साक्षीने उपासाची शहाळी आणि केळ्याचे थोडे खाणे ... 
अन मग पुन्हा दिवस रमतो तो भिंतीवरच्या चित्राला फाईन टच द्यायचा .. 

माटीच्या तयारीचा ... आंब्याचे टहाळे आणून धुवून पुसून लहान मोठे वर्गीकरण करून ठेवायचा..
केळीच्या सोपाचे धागे काढून त्याने मग या सारया वस्तू माटीला बांधायचा मोठा कार्यक्रम पार पाडतो हा दिवस....




पण अजून संपत नाही हा दिवस...
खरेतर संध्याकाळचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथे गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात येणारे गणेश .. 
उन्हे सरता सरता हाक येते ती मूर्तीशाळेत जायची... वाडीतले सारे गणपती हे एकमेकांच्या सोबतीने एकत्रच येतात घरी मुर्तीशाळेतून...
नागपंचमीच्या सुमारास गणपतीचा आसनाचा पाट न्हेऊन दिला जातो पारंपारिक मूर्तीशाळेत.. मूर्तीची रचना, आकार, रंगसंगती सारे मूर्तिकार स्वत: ठरवतो... परंपरेनुसार, रूढीनुसार वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा...अजून ही तशीच... अजून गणपतीचे सुपर मार्केट उघडले नाहीयेत इथे ..


विड्याची पाने, सुपारी, गणपतीचे रेशमी वस्त्र या तयारीनिशी मग मूर्तीशाळेत अवतरतो दिवस...  सुंदर सुंदर मूर्त्यांच्या रांगांतून, विविध रूपातल्या गणेशमूर्ती हारीने मांडून ठेवलेल्या असतात ..  आपापल्या पाटावर स्थानापन्न .. नवी वस्त्रे नवे रंग मिरवीत.. कुठे मोर, कुठे उंदीर, कुठे नंदी तर कुठे आपल्या सिंहासनावर आरूढ.. कधी मोरपिसाच्या कोंदणात, कधी जास्वंदफुलाच्या मखरात ..  स्नेहाळ डोळ्यांनी जग पाहत आपल्या आगमनाची वर्दी तृतीयेलाच धाडतात ...



अन मग तो दिवस, विडा, सुपारी पाटावर ठेवत, रेशमीवस्त्राने गणेश मूर्ती आच्छादत घरी घेऊन येतो... अन नव्या नवलाईच्या मूर्तीचे जवळून निरीक्षण अन कौतुक करत संध्याकाळ निवते..




मग दिवस लांबवतो स्वत:चे तास...  बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी...
तांदळाच्या आसनावर गणपतीचा नारळ, तश्याच आसनावर महादेवाचा नारळ आणि हळदीचे, माठाचे मूळ, तेरडा, कांगला(गौरीचे हात म्हणून ज्याची फुले ओळखली जातात) वगैरे सारे रोप-पत्री एकत्र करून त्यावर फोटो बांधून, मंगळसुत्रासोबत उभी करायची गौर... 


समोर समया, लामणदिवा, तुपाचे निरांजन, आरतीचे ताम्हण, धुपारती, उदबत्तीचे झाड असे सारेच आप आपल्या जागी जाऊन आलबेल बसते..

देवांना वस्त्र, समयांना वाती, हळद कुंकू अबीर गुलाल, गंध, फुले, दुर्वा, बेल, तुळशी, हार.. फळांचा नैवेद्य.. सकाळच्या ताज्या नैवेदयाची काही तयारी.... अश्यात कधी घड्याळाचे काटे धावत राहतात त्या दिवसाला हि कळत नाही..
दमला भागला दिवस अंथरुणावर पडतो तो देखील उद्या पहाटे लौकर उगवायचे हे मनाशी ठरवूनच... 






- भक्ती आजगांवकर 

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४

Thursday, October 4, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४

दिवस चौथा




हा दिवस तसा आरामाचा...
सुशेगात उठण्याचा...
कामाची घाई विसरून चहा पार्टी करण्याचा.. 



तळ्याच्या काठावर बसून शांतता अनुभवण्याचा..
फिश- थेरपी करून घेण्याचा.. 
बसल्या बसल्या मस्त पक्षीनिरीक्षणाचा ...
लांब टांगा टाकत चालणाऱ्या टिटवीचा... मनमोहक गिरक्या घेऊन पुन्हा आपल्या झाडावर येणाऱ्या वेड्या राघूंचा.. 
संथ तळ्यावर अवचित झेप घेऊन मासा पकडण्यात तरबेज खंड्याचा... जोडीजोडीने येऊन फुलातल्या मध पिणारया शिंजीरांचा ..

कुहूकुहू साद घालणाऱ्या कोकिळाचा .. आणि ठिपकेदार अंग मिरवत झाडावर कावळ्यांच्या घरट्याचा माग घेणाऱ्या कोकिळेचा..
तळ्यात अंघोळ करून नंतर उन्हात पंख चमकावणाऱ्या हळद्याचा .... आणि पुन्हा पुन्हा तळ्यात डुबक्या मारून मग झाडावर झगा फलकारत बसलेल्या पाणकोंबडीचा ...
दिसलेल्या एका घरट्याचा ...अन त्यात कोण राहून गेले असेल या कुतूहलाचा देखील..

चालता चालता खाली वाकून, थोडे झुकून पाहिलेल्या किड्या-कीटकांचा... नवनवीन रान-फुलांचा.. वेगवेगळ्या रंगाच्या ढंगांच्या फळांचा.. बियांचा.. पानांचा.. ...कोवळ्या उन्हात चमकणारे चतुरांचे पंख पाहण्याचा...
स्वयंपाकघरातून उठणाऱ्या हाकेचा..अन "आले ग" म्हणत पाय अजून जिथल्या तिथे रमण्याचा.. 
चूल पेटवताना झालेल्या पुरेवाटीचा .. वाटण घाटण - फोडण्या अश्या मदतीचा..अन स्वयंपाक घरात लुडबुड करता करता केळफुलातून गणपती साकारण्याचा..  

निवांत जेवण, शेजारयांची हालहवाल, खाली बागेतून आंब्याच्या झाडांची विचारपूस अश्या आळसावलेल्या क्षणांचा ..
आंब्याच्या झाडाला असलेल्या आवडत्या आडव्या फांदीवर विसावण्याचा...
लहानपणी घेतलेल्या झोक्यांची आणि तिथे बसून मारलेल्या खूप साऱ्या गप्पांची आठवण ताजी करण्याचा ..


अन मग गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु करण्याचा.. 

पूर्वापारच्या समया, लामणदिवा, निरांजन, तांब्या, ताम्हण, पळी-पंचपात्रे यांना कपाटातून काढून धुवून पुसून लख्ख करण्याचा ..
गणपतीच्या नैवेद्याचे लाडू पेढे बनवायचा... भजन मंडळींसाठी आलेपाक बनवून ठेवायचा...

 
तेव्हाच लगबग सुरु होते ती गणपतीच्या मागची भिंत रंगवण्याची.... कोणते चित्र... कशी चित्ररचना... रंग रंगोटी कशी...
मातीच्या भिंती असलेल्या कौलारू घरात, शेणाने सारवलेल्या जमिनीवर.. नव्या पिढीचे लॅपटॉप आणि त्यातल्या गुगलवर चित्राच्या शोधात जग धुंडाळण्याचा ..  

मग तो दिवस.. खलबते करून शेवटी एक चित्र निवडायचा... अन भिंतीवरच्या गेल्या वर्षीच्या चित्रावर जड अंत:करणाने पांढरया रंगाचा ब्रश फिरवायचा.. 

मग भिंतीचे मोजमाप.. त्यावरच्या खाणाखुणा... पहिल्या चाचपडत्या रेघा ...अन मग सरसर उतरत जाणारया चित्राचा तो दिवस ...
घरातल्या लहान मोठ्या प्रत्येकाचाच हात त्याला लागलेला...
कधी चित्र काढताना.. कधी रंगवताना.. कधी शेडींग करताना .. चेहरयावरचे प्रकाश सावलीचे खेळ दाखवताना ..
चित्रातले आसन.. दाग दागिने.. चित्राचे बाकीचे बारीक-सारीक तपशील भरताना.... घरातल्या सगळ्यांचा हात लागतो त्या भिंतीला ..  नव्या चित्राने झळाळतो मग हा दिवस .. 


















- भक्ती आजगांवकर


दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३

Wednesday, October 3, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३

दिवस तिसरा


हा दिवस शुभ्र सकाळचा...

किलबिल पक्ष्यांच्या आवाजाने जागा होणारा... शेजारच्या गोठ्यातल्या गाईच्या घुंगुरवाळा आवाजाचा...

सकाळी सकाळी अंगणात घातलेल्या सड्याचा ... अन उंबरठ्यावर रांगोळीच्या सुबक ओळींचा..





देव्हारयातल्या गणोबाला-बाळकृष्णाला न्हाऊ माखू घालण्याचा... अन शांत सुंदर वातीच्या निरांजनाचा..हवेत अलवार विरणारया उदबत्तीच्या वलयांचा ...










घरासभोवतालच्या जास्वंदी, चाफा, शंकासूर, मोगरा, सोनटक्का आणि अश्याच वेगवेगळ्या फुलांचा ...










अंगणातल्या झाडावर गिरक्या मारणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांचा ...
ऐटीत फिरणाऱ्या चतुरांचा ..
शोधक नजरेने टिपलेल्या फुलपाखरी अळ्यांचा, सुरवंटाचा, अन कुसुर्ड्याचा पण ..

जरा अंगण उतरून समोरच्या तळ्यावर मारलेल्या फेर फटक्याचा ...


दाडोबाचे तळे किती भरलेय...मागच्या वर्षीच्या खंड्याची जोडी अजून तिथेच आहे का हे शोधण्याचा...



वेड्या राघुंच्या कमानदार भराऱ्या पाहण्याचा.. मागच्या माडांवर पोपटांचा थवा किती कलकलाट करतो ते ऐकण्याचा..

तळ्यातले मासे अजूनही त्याच लडिवाळपणे पायाभोवती जमतात का हे पाहण्याचा...






तळ्यामागच्या शेतातली सापाची जोडी अजून आहे का, बेडूक अजून फुगलाय का हे जाणण्याचा ..








सकाळ सकाळी वाफाळत्या चहाचा...
आणि थोडक्याच वेळात चुलीवर रटरटणाऱ्या भाताच्या पेजेचा ..
तोंडाला पाणी सुटेल अश्या लोणच्याच्या मोठ्या फोडीचा ..

हाच दिवस... वेंगुर्ल्याचा बाजारात जायला तयार होण्याचा...
सारया सामानाची यादी करण्याचा... अन यादीत कोकण स्पेशल भाज्या लिहिण्याचा ..
सगळ्या भावंडाच्या बाजार मोहिमेचा..

पण अर्ध्या रस्त्यात (वेंगुर्ल्याचा वर्ल्ड फेमस) नानाच्या भज्यांचा आस्वाद घेण्याचा ..



मग मजल दरमजल करत पायी पायी बाजारात जाण्याचा ..


अन मग कोकण स्पेशल भाज्या, वस्तू आणि गणपतीच्या आगमनासाठी सुसज्ज झालेल्या मंडईचा ..

वाली, कच्ची केळी, दोडका, भेंडी, केळफुले, पडवळ, कारले, भोपळ्याचा खापा, चवळीच्या पानांचे वाटे, लाल माठ, अळू
शहाळी, नारळ, फणस, पपनस, वेलची केळी, कमळ, तेरडा, जास्वंद, चाफा, चमेलीचे गजरे, अबोलीचे वळेसर, कन्हेर, डेह्लीया, दुर्वा बेल, कोकम, कोकमतेल, सुपारी, चिंच, भात, कुळीथ, पोहे, काजू, खाजे अश्या सारया कोकण स्पेशल वस्तूंनी बहरलेल्या बाजाराचा...







मग सारया मंडईतून आपल्या यादीतील वस्तू घेत फेरया मारण्याचा..
पण यात मासळी बाजार वर्ज्य बर का..
श्रावण - अधिक मास असे सोवळे महिने लांबले तरी मासळीबाजारात चुकूनही न जाण्याचा..




दिवस.. घरी परत येऊन पुन्हा एकदा घरात रमायचा..
उतरती उन्हे घराच्या कौलावरून सरकू लागली कि दाटून येणाऱ्या अंधारासोबत आठवणी झेलण्याचा...
याच घरा-दाराने माझ्या आजीला - पणजीला वावरताना पाहिले असेल...
माप ओलांडून घरात येताना... खळखळून कधी हसताना.. कधी गुपचूप अश्रू टिपताना..
या वस्तूंना, वास्तूला त्यांचा मायेचा स्पर्श झाला असेल ...
बाबा - काका - आत्या .. यांच्या जन्माच्या, वाढण्याच्या कितीतरी क्षणाच्या मूक साक्षीदार म्हणून या भिंती उभ्या असतील ... कितीक वेळा या सर्वाना वाढताना, धडपडताना, पडताना अन सावरताना हि पाहिले असेल... आजोबांच्या कामाच्या समाजकार्याच्या कहाण्यांनी हि कौले फुशारली असतील... या सारयाच अंगावर रोमांच उभे करणाऱ्या क्षणांचा ...

असा हा दिवस ... हलके हलके संध्याकाळच्या कातरवेळेत विरघळणारा  ....

- भक्ती आजगांवकर

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २ 

Monday, October 1, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २


दिवस दुसरा...




मुक्कामाला पोहोचण्याचा...
श्वास भरून कोकणचा वारा पिऊन घेण्याचा ...
खाली वाकून लाल मातीला स्पर्श करून नाळ पुन्हा पुन्हा जोडून घेण्याचा...








नुसत्या लवलव पापणीने सभोवतालचा हिरवा गारवा अनुभवण्याचा ..
झिरमिर पाऊस आणि श्रावणाचे ओसरते ऊन दोन्हीचा मिलाफ समोरच्या डोंगररांगांवर झेलण्याचा..







घराच्या उंबरठ्यावर क्षण दोन क्षण हळवे होण्याचा..

गेल्या वर्षी दिलेल्या निरोपानंतर पुन्हा कौलारू घर डोळ्यात साठवून घेण्याचा...
सामान ठेवताक्षणी अंगण, पडवी, माजघर, मधलेघर, धान्याची खोली, स्वयंपाकघर, मागची खोली, मागचे अंगण, परसातली आंब्याची वाडी...सगळ्या-सगळ्याची एक प्रदक्षिणा करण्याचा..




दारातला भू-भू कुठे.. घरातल्या माऊ किती यांची गणना करण्याचा ...
शोधक नजरेने अंगणातले पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा ...
राघू, मैना,, टिटवी, कोकीळ, कोकिळा, हळद्या, शिंजीर, शिंपीण, खंड्या, कोतवाल यांच्या आवाजावरून फांद्यावर त्यांचा शोध घेण्याचा...



जुने घर किती आपले आपले तरी किती श्रांत-क्लांत दिसते ... शुभ्र पांढरया केसांच्या आजीने दरवाजात उभे राहून आपली वाट पहावी..  प्रेमाने कुशीत घ्यावे.. सुरकुतले हात चेहऱ्यावरून मायेने फिरवावे तसे.. हे अनुभवण्याचा ..


हाच दिवस...
मोठ मोठे रुमाल तोंडावर बांधून अरेबियन ललना होण्याचा...
सगळ्या खोल्या, भिंती, पार कौलापर्यंत साफ सफाईचा ..
माजघर, मधली गणपतीची खोली, पडवी नव्याने रंगवण्याचा ..
सारे सामान सारया जागा धुवून पुसून लख्ख करण्याचा ..
मागील वर्षाची सुट्टी संपता संपता झालेली चूल पेटवण्याची सवय, अजून ताजी आहे का ते जोखण्याचा... विहिरीचे पाणी शेंदता येतेय का ते आजमावण्याचा...
अन दमून भागून उभा दिवस काळोखात आडवा होण्याचा...











- भक्ती आजगांवकर