Well Differentiated Squamous Carcinoma
तळपत्या उन्हात हातात पडलेला तो रिपोर्ट
छोट्याश्या माऊथ अल्सर वरून,
बायोप्सीच्या शक्यतेवरून उडी मारून
कन्फर्म झालेला आजार
कॅन्सर ... आपल्या माणसाच्या आजाराचे हे निदान ..
क्षणभर ... दिवसभर चुकवलेली नजर...
कुठेतरी दिशाहीन झाल्याची जाणीव
तरीही विचलित न झालेला चेहरा
एका नव्या लढाईसाठीची जणू सुरुवात...
डॉक्टर, टेस्टस, एक्सरेज,
एम आर आय सी टी स्कॅन
विविध चाचण्यांच्या जंजाळात
गुंतवून ठेवलेले दुखरे मन ..
मग एक लांबलचक कॉरीडॉर
वेटिंगरूम सारखा थबकलेला
अंतरा अंतरा वर एकसारख्या खुर्च्या
वाट पाहून पाहून दमून विसावलेल्या
एक स्तब्धता
गोठून राहिलेली आसमंतात .
एक हुंकार ... हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर चालू असलेला हमिंग साऊंड ..
अविरत ... एकटाकी शब्दातीत आकार
गडद काळोखालाही मागे टाकेल असं कोरडाठाक प्रकाश
लुकलुकणारे..आपल्याच गतीत मग्न असणारे यंत्रावरील दिवे
वर खाली होणारी , सतत धावणारी ती रेषा ...
यांत्रिकतेने दाखवते हृदयाची भाषा...
तासतास उलटतात ..
ऑपरेशन थियटर बाहेर आपण बसून असतो सुन्न
धारदार सुरीच्या पात्याने सारे पोट ढवळून काढावे
अशी असह्य कळ सांभाळत ..
"no liability" फॉर्मवर सह्या करतानाची थरथर
डॉक्टर ने समजाऊन दिलेले कॉम्प्लीकेशन्स
एकीकडे त्याचा अर्थ लावत असताना
दुसरीकडे हिंदकळत्या भावनांना दिलासा देण्याचा कमजोर प्रयत्न...
मग एक लढाई फत्ते होते...
एक खूप थकलेले, खूप सोसलेले कृश शरीर
त्या स्ट्रेचरवरून बाहेर येते...
अर्धवट शुद्ध.. अर्धवट गुंगीतही आलबेल असल्याचा इशारा करते...
आणि त्यानंतर सुरु होते ती खरी लढाई...
लांबलेले दिवस दिवस...
जागलेल्या रात्री...
औषधे ... गोळ्या...
न सोसवेल अशी तोंडाच्या कॅन्सरची लढाई...
वेदनेशी नवीन ओळख...
सावरण्याचा .. साह्ण्याचा रोज नवा एक अध्याय
रुग्णाचा ... आणि त्याच्या आसपासच्या लोकांचाही
शरीराबरोबर हळव्या झालेल्या मनाचा...
या सगळ्यात आधी कधी न समजलेले आपणच
दिसत जातो स्वत:ला? कळत जातो आपसूक ??
जगणे हे फुलांच्या पायघड्यांवरून चालावे इतके सोपे नव्हतेच कधी
पण अश्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत
किती वेळा वाकतो.. मोडतो.. तडफडतो...
रागावतो... वैतागतो.. क्वचित उलट बोलतो सुद्धा ...
सावरण्याच्या क्षीण प्रयत्नात कितीदा,
मनाच्या जखमा घेऊन वणवणतो ...
कितीदा सुरुवात करून पुन्हा पुन्हा त्याच गर्तेत सापडतो...
आशा निराशेच्या सावल्यात किती काळ भिरभिरतो...
पण काळ तर चालत राहतो...
अन त्याच चालणाऱ्या काळाने अलगद बोट धरून एका सीमा रेषेवर उभे केलेय आज...
डिसेंबर १२ मध्ये सुरु झालेला हा प्रवास... आज जानेवरी १४ च्या उंबरठ्यावर येऊन
आश्वासक झालाय...
PET टेस्ट च्या आशादायी निकालाने आज असे जाहीर केलेय की
" no active traces of disease in the floor of mouth or elsewhere in body to suggest disease recurrence"
आज "World Cancer Day" आहे ..
आणि मुहूर्त आहे तो एका वर्षभराचे सावट हटण्याचा
मळभ दूर होऊन आभाळ स्वच्छ होण्याचा....
वेदनांची गट्टी इतक्यात सुटणारी नसली तरी अंतर्यामीची भीती लुप्त होण्याचा...
या मुहूर्तावर एक आशा करतेय...
तमाम कॅन्सरग्रस्त लोकांना असे डॉक्टर भेटोत.. जे माझ्या आईला भेटले...
आसपासच्या जवळच्या आणि संवेदनेने - समवेदनेने ओळखीचे झालेल्या अनोळखी लोकांचा खूप महत्वाचा असा आधार मिळो, जसा मला मिळाला...
आणि या रोगाशी लढण्याचे शारीरिक आणि मानसिक बळ मिळो ...
लढाई जिंकण्यासाठीच लढायची इर्षा मिळो....
" आमेन "
छायाचित्र आंतर्जालाहून साभार
- भक्ति आजगांवकर
विशेष आभार डॉ. शिशिर शेट्टी आणि जाणता अजाणता सह्वेद्नेत सामील झालेल्या तुम्हा सर्वांचे ...
Thank You!!!